नागपुर (वि.प्र.) - डॉ.रमणिक एस. लेनगुरे यांनी कोरोना महामारीच्या काळात भारतात जेव्हा दि. 25 मार्च 2020 पासून लॉकडावून झाले तेव्हापासून ते दि. 20 डिसेंबर 2022 पर्यंतच्या काळात कोरोना या एकाच विषयावर रोज एक कविता याप्रमाणे मानवतेला प्रेरणा देत कोरोना या विषयावर 1000 कविता लिहिल्या आणि विविध ऑनलाईन माध्यमाव्दारे जनमानसापर्यंत पोहाचवीत कोरोना काळात लढयासाठी त्यांच्या आशा पल्लवीत केल्या. त्यांचे हे कार्य आजही निरंतर सुरू आहे. या मानवतेला प्रेरणा देणा-या कार्यामुळे त्यांची अनेक नामवंत संस्थाकडून प्रशंसा करण्यात आली. व त्यांच्या कार्याची अनेक वर्ड बुक ऑफ रेकार्ड मध्ये नोंद घेण्यात आली आहे. या प्रेरणा देणा-या कार्यामुळेच त्यांनी रेणुका कॉलेजचे नाव जागतिक पातळीवर उंचावले.
त्यांनी लिहिलेल्या 1000 कवितापैकी 100 कवितांचे, राष्ट्रीय नामवंत भाग्योदय पब्लिशिंग हाउस, जयसिंपूर येथून प्रकाशित झालेल्या ”कोरोना संघर्षातील जीवनगाणे“ नामक कविता संग्रहाचे राष्ट्रीय सेवा योजना कॅम्प, वेळाहरी, नागपूर येथे मान्यवरांच्या हस्ते ई-प्रकाशन करण्यात आले.
यावेळी रेणुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, मा. श्री हिमांशू गेडाम सर, रेणुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, मा. मंजुषा गेडाम मॅडम, रेणुका कॉलेजच्या प्राचार्य, डॉं. ज्योती पाटील मॅडम, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. डॉं. अतुल महाजन, सांस्कृतिक विभाग प्रमुख, डॉं. कैलाश फुलमाळी, ग्रंथपाल प्रा. डॉं.रमणिक लेनगुरे, महाविद्यालयीन सर्व कर्मचारी व विद्यार्थी गण उपस्थित होते.

