बल्लारपुर (का.प्र.) - मा.मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे साहेब,माननीय उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस साहेब स.न.वि.वि! आपल्याला महाराष्ट्रातील सामान्य जनतेकडून खुले पत्र लिहीत असतांना माझ्याही मेंदूत प्रश्नांचे काहूर माजले आहे.महत्वाचे म्हणजे राज्यात विविध नाट्यमय घडामोडीत महाराष्ट्राचे सत्तांतर झाल्यानंतर सामान्य जनतेच्या मानस पटलावर अनेक प्रश्न बिंबित झालेत.त्याचे उत्तर मिळेल;हेच या खुल्या पत्राचे प्रयोजन आहे. सत्तांतरच्या नाट्यमय घडामोडीत मुंबई,सुरत,गुहाटी, मुंबई या प्रवासादरम्यान आपल्या दोघंही महानुभवांकडून बंडखोरीची विविध कारणे मीडियावर सांगितली जात आहे.त्यातील महत्वाचे कारण म्हणजे "हिंदुत्व" ! म्हणजेच उभ्या महाराष्ट्रात आपण दोघांना सोडलं तर कुणाकडेच "कट्टर हिंदुत्वाचा" दाखला मिळणार नाही,हे मलाही मान्यच.पण मा.ना.देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आणि आपल्या गटातील ४० आमदारांच्या व्यतिरिक्त काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना अशा इतर छोट्या मोट्या पक्षात हिंदू नाहीत,हेच तुम्हाला मांडायचं आहे का?या पुरोगामी महाराष्ट्रात महाविकास आघाडी किंवा इतर पक्षांनी हिंदू विचारांची कधी आणि कशी गळचेपी केली,हे सांगू शकाल का?या सर्व बंडाला शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असेल तर पक्षासाठी महान त्याग देऊन 'उप' मुख्यमंत्र्यांची शपथ घेणारे ना. देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ साली पहाटे ४ वाजता राष्ट्रवादीच्या समर्थनात आणि अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली होती तेव्हा त्यांचे कट्टर हिंदुत्व आणि महान त्याग कुठे होता?
बरं,म्हणे बाळसाहेबांचं हिंदुत्व जपणार... म्हणजे नेमकं राज्यात काय करणार आहात..?असे असंख्य प्रश्न आहेत.उरला हिंदुत्वाचा विषय तर छत्रपती शिवरायांनी 'हिंदवी' स्वराज्याची स्थापना केली,'हिंदूराज्याची नव्हे' हे सतत लक्षात असू द्या.त्यांच्या उभ्या हयातीत त्यांनी महाराष्ट्राला जातिवाद विरहित 'सुराज्य' स्थापन केले...अठरापगड जातींना जोडून अभेद्य आणि समर्पित मावळ्यांची फौज उभी केली.त्यात मांग,महार,मेहतर,भंगी,तेली,तांबोळी,माळी, कुणबी अशा दुर्लक्षित समाजाला समान संधी दिली.महत्वाचं म्हणजे त्यांच्या राज्यकारभारात अनेक महत्त्वाच्या पदावर मुस्लिमांची नेमणूक करण्यात आली होती...त्यांनी जातीय द्वेषातून एकही मुस्लिम राज्यावर स्वारी केली नाही.एकही मशिदीवर वर्क दृष्टी टाकली नाही...मात्र हिंदुत्व हिंदुत्व करत या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला 'प्रायव्हेट लिमिटेड करण्याचा' प्रयत्न राजकीय स्वार्थासाठी होतांना दिसत आहे.महाराजांनी ज्यांच्यावर 'विश्वास' टाकला होता त्यांनी महाराजांच्या निर्वाना नंतर 'शिवशाही' म्हणजेच समता,स्वतंत्र आणि बंधुतेच्या राज्याला 'मूठमाती' देऊन पेशवाई आणली.कट्टरता काय असते,जातीयता काय असते,श्रेष्ठ कनिष्ठ काय असते हे छत्रपती महाराज यांच्या नंतर महाराष्ट्राला पुन्हा अनुभवण्याचे दुर्दैव लाभले...त्यामुळे आपली कट्टरता 'पेशवाईची' की छत्रपती शिवाजी महाराजांची हेही एकदा स्पष्ट झालं पाहिजे. आपण दोघेही महान व्यक्तीव जनप्रतिनिधी आहात. आपल्याला जनतेनी निवडून देतांना 'हिंदू-मुस्लिम' हा विचार करून निश्चितच निवडून दिला नसेल,त्यात काही मुस्लिम,बौद्ध,शीख,जैन,इसाई,मारवाडी, अशाही मतदारांनी मतदान केलं असेल,नाही का?आणि भारतीय संविधान सर्व जाती, धर्म,पंथ यांच्या आदराची शिकवण देतो.त्यातच प्रत्येक धर्मियांना आपापल्या धर्मा नुसार आचरण करण्याचे स्वतंत्र बहाल करतो.मग धर्माचा एवढा डांगोरा पिटण्याचे कारण काय?तुम्हाला कोणी म्हंटले तुम्ही हिंदू नाहीत म्हणून..? उरली गोष्ट 'कट्टर हिंदुत्वाची' ते काय असेल,हे तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला समजावून सांगणे हे तुमचे प्राथमिक कर्तव्य नाही काय..?खरंतर भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याचे तुम्हाला अजून मान्य नाही का?कोणताच लोकप्रतिनिधी,आमदार,खासदार,मंत्री,प्रधानमंत्री त्या-त्या पदावर असतांना कोणत्याच धर्माचे प्रतिनिधित्व करत नाही,तो देशाचे,राज्याचे व संबंधित निर्वाचन क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतो; यासारखी छोटी बाब तुमच्या ध्यानी नसेल काय..? असो! या सत्तांतरात मुंबई सुरत,गुहाटी,गोवा, मुंबई या प्रवासा दरम्यान चार्टर प्लेन, हॉटेल खर्च तुमच्या सोबतच्या 'प्रामाणिक' आमदारांचे "मानधन" कुणी दिले? या सर्व सत्तानाट्यात एकूण किती खर्च आला? याचे उत्तर मिळवण्यासाठी माझ्यासह महाराष्ट्रातील लाखो लोक आतुर आहे...
आपण कट्टर आहात, आणखी कट्टर बना 'मोठे संत' ही बना. पण छत्रपती शिवरायांच्या सुराज्याला,शाहू,फुले आंबेडकरांच्या पुरोगामी प्रणित लोकशाहीतील 'शिवशाहीची' 'पेशवाई' करू नका एवढीच दोघां महाधिराज्यांना नम्र विनंती आहे. -✒️..नरेंद्र सोनारकर!
