वंदे मातरम् च्या जयघोषाने राष्ट्रप्रेम जागृत होते – ना. सुधीर मुनगंटीवार ..!
बल्लारपुर (का.प्र.) - १४ ऑगस्ट २०२२ ला मंत्री पदाची शपथ घेतल्यावर दुरध्वनी व भ्रमणध्वनीवर बोलण्यास सुरूवात करताना हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणण्याचा निर्णय घेतला. वंदे मातरम् हा मंत्र इंग्रजांना देशाबाहेर काढण्यासाठी अतिशय प्रेरक मंत्र म्हणून प्रसिध्द होता. त्यामुळेच वंदे मातरम् च्या जयघोषाने राष्ट्रप्रेम जागृत होते, असे उद्गार विमलादेवी मेडीकल कॉलेजमध्ये झालेल्या सत्कारप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वने व सांस्कृतीक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल महाविद्यालयातर्फे ना. मुनगंटीवार यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
सर्वप्रथम महाविद्यालयातर्फे आयोजित रक्तदान शिबीराचे उदघाटन ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी व कर्मचा-यांनी रक्तदान केले. त्यानंतर ना. मुनगंटीवार यांची महाविद्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनींनी तुकाराम महाराजांच्या पारखीची प्रतिकृती करून सादर केली. त्यानंतर एक अभिनव प्रयोग म्हणून ना. मुनगंटीवार यांची वृक्षतुला करण्यात आली. यामध्ये विविध प्रजातींचे रोपे ठेवण्यात आली. याप्रसंगी ना. मुनगंटीवार यांचा भव्य सत्कार करण्यात आला व त्यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमीत्त एक मोठा केक कापण्यात आला. यावेळी सांस्कृतीक कार्यक्रम सादर करण्यात आला. ज्यामध्ये विद्यार्थी, विद्यार्थीनींनी देशप्रेमावर आधारित नृत्ये सादर केली.
यावेळी पुढे बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले की, महाविद्यालयाचे स्थापनाकर्ते इंदरसेन सिंग हे माझ्याशी अनेक वर्षांपासून जुळलेले आहेत व अतिशय प्रामाणिकपणे या महाविद्यालयाच्या जडण-घडणीमध्ये त्यांनी कार्य केले आहे. गेल्या १२ वर्षांपासून कुठल्या न कुठल्या निमीत्त्याने त्यांच्या महाविद्यालयात बोलाविणे आले, परंतु कामाच्या व्यस्ततेमुळे येणे झाले नाही. आज इथे आल्यावर या संपूर्ण १२ वर्षांची कसर माझ्या सत्काराने आपण भरून काढली. ज्यामुळे मी अतिशय भारावून गेलो आहे. कुठल्याही ऊर्जेपेक्षा विद्यार्थ्यांचा चेह-यावरचे हास्य हे सर्वात ऊर्जावान असते. बि.ए.एम.एस. डॉक्टर्सची पदे त्वरीत भरण्याचे आदेश आरोग्यमंत्री श्री. तानाजी सावंत व मी दिलेले आहेत. आपले प्रेम असेच आयुष्यभर मिळावे अशी इच्छा ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजू ताटेवार यांनी तर संस्था अध्यक्ष इंदरसेन सिंग यांनी प्रमुख भाषण केले. आरोग्य भारतीच्या किरण बुटले यांनी यथोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला वनविकास महामंडळाचे पूर्व अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूरचे माजी उपमहापौर राहूल पावडे, चंद्रपूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, संस्थेचे सदस्य राहूल सिंग, सौ. सिंग, भाजपा नेता रामपाल सिंग, नामदेव डाहूले, अनिल डोंगरे, आरोग्य भारतीच्या किरण बुटले, प्रसिध्द उद्योजक रोशन चढ्ढा, महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.