निर्दयी मातेचा प्रताप..!
भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती येथील एका मंदिर परिसरात दि.८ नोव्हेंबर रोजी सकाळी नवजात अर्भक आढळून आल्याने खळबळ माजली आहे.
भद्रावती शहरातील ऐतिहासिक चंडीका मंदिर परिसरात दि. ८ ला सकाळच्या सुमारास एक पुरुष जातीचे नवजात अर्भक आढळून आले. या लावारीस अवस्थेत असलेल्या अर्भरकाभोवती मुंग्या लागलेल्या होत्या. या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून अर्भकाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आले. तेथे तपासणी करून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपुर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती कळताच नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. पोलिस अर्भकाच्या अज्ञात निर्दयी कृर मातेचा शोध घेत आहेत.