आ.मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे पार्कची निर्मिती .. पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी झाडे लावावे .!
चंद्रपूर (वि.प्र.) : चंद्रपूर येथील नाना- नानी पार्क पर्यावरणाच्या संवर्धनात महत्वाची भूमिका निभावेल. यासोबतच लहान-थोरांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणारे केंद्र ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
वन विभागाद्वारे आयोजित चंद्रपूर येथील नाना-नानी पार्कच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री प्रा.डॉ. अशोक उईके, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन, उपवनसंरक्षक पीयूषा जगताप, उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, लॉयड्स मेटल्सचे मधुर गुप्ता, तुलसी गुप्ता, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश देवतळे, मनोज पाल, प्रदीप किरमिरे यांच्यासह वन विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, परिसरातील नागरिक उपस्थित होते.
वन मंत्री असताना आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी नाना-नानी पार्क करिता दोन कोटी रुपये मंजूर करण्यासाठी पुढाकार घेतला होता. या पार्कचे लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहताना आ. मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केले.
पुढे बोलताना आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले, क्लायमेट चेंज ग्लोबल वार्मिंग मध्ये वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी आहे. यासाठी सर्व एकत्र येऊन चंद्रपूर जिल्ह्यात काम करीत आहोत. यातूनच बॉटनिकल गार्डन, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम, एपीजे अब्दुल कलाम उद्यान निर्माण झाले. याच कार्यात आता नाना-नानी पार्कची भर पडत असल्याचा आनंद आहे. चंद्रपूर शहरात 15 उद्यान तयार झाले आहेत. हे सर्व पार्क शहरातील श्वास घेण्याजोग्या जागा ठरत आहेत. शहर वेगाने पुढे जाताना शहराचा पर्यावरणीयदृष्ट्या विकास व्हावा यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. 'सी फॉर चंद्रपूर' आणि 'सी फॉर क्लायमेट चेंज' चे मोठे केंद्र व्हावे या हेतूने चंद्रपूरमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात आली. चंद्रपूरचे नाव जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी हा महत्वाचा पुढाकार आहे, असेही ते म्हणाले.
ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्ष लागवड व संवर्धन ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. हे पार्क कुटुंबांसाठी आनंद केंद्र निश्चित बनेल, असा विश्वास आ . सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी झाडे लावावे असे आवाहन देखील केले.
मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन स्थापन करण्यासंदर्भात अप्पर सचिवांची महत्त्वाची बैठक सोमवारी ..!
आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यानंतर उचलले पाऊल .. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत होणार बैठक ..!
मुल : चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात शासकीय तंत्रनिकेतन स्थापन व्हावे, यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. यासंदर्भात आता राज्य सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत उद्या, सोमवार, दि. २७ जानेवारी २०२५ ला बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत शासकीय तंत्रनिकेतन स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा होणार आहे.
आमदार श्री. मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मुल येथील शासकीय तंत्रनिकेतन आता दृष्टिपथात आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीत आ. श्री. मुनगंटीवार देखील उपस्थित होते. मंत्री महोदयांनी शासकीय तंत्रनिकेतन स्थापन करण्याच्या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तसेच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुलच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा प्रस्ताव मांडण्यासंदर्भात सूचना व निर्देश दिले होते.
आता यासंदर्भात आणखी एक महत्त्वाचे पाऊल पुढे पडले आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी २७ जानेवारीला बैठक बोलावली आहे. या बैठकीला आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचीही उपस्थिती राहणार आहे. मुंबई येथे मंत्रालयात सायंकाळी ५ वाजता होऊ घातलेल्या या बैठकीला विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.
वाघांचा जिल्हा म्हणून नावलौकिक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षण घ्यावे. जिल्ह्याचा नावलौकिक देशात वाढवावा. यासाठी जिल्ह्यातील मुल येथे नवीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी पाठपुरावा करून हा विषय लावून धरला. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आ. श्री. मुनगंटीवार यांनी मुल येथे शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने त्यांनी तंत्रशिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश दिले होते, हे विशेष.
अनेक तालुक्यांमधील तरुणांना होणार लाभ :
मुल येथे शासकीय तंत्रनिकेतनची स्थापना झाल्यानंतर मुलसह पोंभूर्णा, सावली, सिंदेवाही आणि चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना लाभ होणार आहे. मुल येथे यापूर्वीच शासकीय कृषी महाविद्यालय सुरू झाल्याने शहराच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान मिळत आहे. शासकीय पॉलिटेक्निक सुरू झाल्यास मुल हे शिक्षणासाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.