राममंदिर आणि शंकराचार्य .!

मुंबई (जगदीश काशिकर) : “शंकराचार्यांनी घातला प्रतिष्ठापना कार्यक्रमावर बहिष्कार.” अशी बातमी प्रसारमाध्यमे चालवत आहेत. या बातम्या पाहून सोशल मीडियावर काहीजण उतावीळपणे आणि शाब्दिक पथ्य न पाळता व्यक्त होत आहेत हे पाहून काही मुद्दे समोर ठेवू इच्छितो. शक्य झाल्यास शांत डोक्याने वाचा, समजून घ्या. 
१. कोणीही “बहिष्कार” घातलेला नाही. चार पैकी तीन पीठांच्या शंकराचार्यांनी २२ तारखेच्या सोहळ्यात आपल्याला उपस्थिती लावता येणार नसल्याचे सांगितले आहे. यांतील ज्योतीर्पीठ बद्रीनाथ जगद्गुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी त्यांना निमंत्रणच मिळालं नसल्याचं सांगितलं आहे. शृंगेरी आचार्यांनी जाणार अथवा नाही याबाबत स्पष्ट भूमिका मांडल्याचं माझ्या वाचनात नाही. “आम्ही जाऊ शकत नाही” म्हणजे “बहिष्कार” होत नाही. सर्वच आचार्यांनी आपले शुभाशीर्वाद असल्याचं आणि कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 
२. धार्मिक बाबींत ही पीठे सर्वोच्च असल्याने त्यांचे काही ठराविक प्रोटोकॉल आहेत. ज्याची पूर्तता शक्य नसल्याने ते या कार्यक्रमात जाऊ शकत नाहीत. कोणताही विवाद स्वतःहुन उपस्थित न करता कार्यक्रमापासून दूर राहण्याचा त्यांचा निर्णय खरंतर स्वागतार्ह आहे. पण यात मीडियाने मसाला न शोधला तरच नवल! म्हणून मग “बहिष्कार कथा” सुरू झाल्या; जो की घातलेलाच नाही! 
३. “या शंकराचार्यांचे राम मंदिराबाबत योगदानच काय?” हा प्रश्न काही अतिउत्साही लोक विचारत आहेत. त्यांनी स्वतःच याबाबत आधी अभ्यास केला असता तर प्रश्नच पडला नसता. पुरी पीठाधीशांच्या योगदानवर पूर्वीच लिहिलं आहे. द्वारका आणि बद्रीनाथ असे संयुक्त जगद्गुरुपद भूषविलेले ब्र. स्वरूपानंद सरस्वती महाराज यांचं पदयात्रा ते तुरुंगवास आणि संत एकत्रीकरण ते न्यायालयीन लढाई असं प्रदीर्घ योगदान राम जन्मभूमीबाबत आहे. राजकीय मतभेद असल्याने ते विहिंपच्या सहभागाच्या बाजूने नव्हते. मात्र याने त्यांचं योगदान कमी होत नाही. जमल्यास यावर सविस्तर लिहीन.
४. “या शंकराचार्यांचे हिंदुत्वाबाबत योगदानच काय?” हा प्रश्न विचारणाऱ्या किती महानुभावांनी आधी स्वतः याबाबत माहिती घेतली? चारही पीठाचे शंकराचार्य गोरक्षण ते अखंड भ्रमण करून जनसंपर्क असं धर्माचं कार्य करत असतात. आपल्याला त्यांच्या त्यांच्या संकेस्थळावरदेखील याची माहिती मिळेल. दुसरं म्हणजे; हा प्रश्न उपस्थित करताना आपण स्वतः असं नेमकं काय कार्य करत आहात ज्याच्या बळावर आपण त्यांना हा प्रश्न विचाराल? प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करूया?
५. घरातल्या दोन ज्येष्ठ मंडळींत काही विसंवाद झाले की आपण ते मिटवण्याचा प्रयत्न करतो किंवा ते शक्य नसल्यास मौन बाळगतो की चौकात जाऊन त्याबाबत दवंडी पिटतो आणि त्यांना अद्वातद्वा बोलतो? उत्तर प्रत्येकाने आपापलं शोधायचं आहे. एकीकडे कोणी एक आमदार रामायणातल्या संदर्भांचं विकृतीकरण करताना “दुर्लक्ष करूया” म्हणून भूमिका घेणारे आपण आपल्याच धर्मातल्या सर्वोच्च पदांबाबत मात्र टीका करत इतकी अमर्याद भाषा वापरावी? मला तरी याचा मेळ लागत नाही. 
मुळात आपण प्रत्येक बाबीवर व्यक्त झालंच पाहिजे का? पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर भव्य मंदिर उभं राहतंय. आपण हा निर्भेळ आनंद साजरा करूया की! सर्वोच्च धार्मिक पदांवरील व्यक्ती काय सांगतात त्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा तोच वेळ वैयक्तिक उपासनेत घालवूया की! इथे अनर्गल भाषेत काही मजकूर खरडण्यापेक्षा तोच वेळ रामाचं नाव घेण्यात व्यतीत करूया. प्रसारमाध्यमं जाणीवपूर्वक एखादा माहौल बनवतात तेव्हा त्याचा बळी आपण झालंच पाहिजे असा काही नियम नाही ना? मा. पंतप्रधान यम नियम पालन करत पुढील नऊ दिवस अनुष्ठानात व्यतीत करणार आहेत. त्यांचे समर्थक, पाठीराखे, हिंदुत्ववादी म्हणून तरी त्यांचा आदर्श समोर ठेवूया. पटलं तर आज, आत्ता, ताबडतोब या विषयावर व्यक्त होणं थांबवूया. अगदीच अनिवार इच्छा झाली तर त्या त्या वेळी रामनामाची एक माळ जपूया! अत्यावश्यक असल्याने या विषयावर व्यक्त झालो. तरीही ही पोस्ट लिहिल्याचं प्रायश्चित्त म्हणून एक माळ जास्तीची जपणार आहे. तुम्हालाही पटतंय का बघा! 
समस्तामधे सार साचार आहे।
कळेना तरी सर्व शोधुन पाहे॥
जिवा संशयो वाउगा तो त्यजावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥
वैद्य परीक्षित शेवडे : आयुर्वेद वाचस्पति यांचे मनोगत .!

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.