भद्रावती (वि.प्र.) : “शिक्षण हे डीग्रीसाठी घ्यायला नको तर, शिक्षणातून माणूस घडला पाहीजे. मातृभाषेचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. समाजाला पुढे नेण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये निश्चितपणे आहे आणि शिक्षक हा समाजाला पुढे नेऊ शकतो. आई संस्कार देवून आपल्या मुलांना घडवित असते तर कवींच्या शब्दांची शक्ती मात्र मानवाला घडविण्याचे कार्य पिढ्यान पिढ्या करीत असते.” असे मार्मीक प्रतिपादन सुप्रसिध्द साहित्यिक व प्रख्यात कवयीत्री विदर्भकन्या डॉ. प्रतिमा इंगोले यांनी स्मृतिगंध काव्य संमेलनाच्या निमित्ताने केले.
स्व. विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठान भद्रावतीच्या वतीने आयोजित सातव्या विदर्भस्तरीय स्मृतिगंध काव्यसंमेलनाच्या संमेलनाध्यक्ष पदावरून अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर संमेलनाच्या उद्घाटक सुप्रसिध्द कवयीत्री डॉ. संध्या पवार नागपूर, प्रमूख अतिथी ज्येष्ठ साहित्यिक आचार्य ना. गो. थुटे वरोरा, अनंत भोयर प्रसिध्द ग्रामिण कथाकार काटोल, डॉ. प्रकाश महाकाळकर गटशिक्षणाधिकारी भद्रावती, अमीत गुंडावार सामाजिक कार्यकर्ते भद्रावती ईत्यादी मान्यवर उपस्थित होते. भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर हे विशेष अतिथी म्हणून या संमेलनाला आवर्जुन उपस्थित होते.
“नव शिक्षित महिला आज घरचे दारचे करतांना थकून जात आहेत. त्यांची स्थिती मजूर स्त्रियांपेक्षा फारशी वेगळी नाही. पुरूष मात्र त्यांच्याकडून जुन्याच अपेक्षा बाळगून आपल्या पुरूषत्वाला कवटाळून बसला आहे. सावित्रीने स्त्रियांना शिक्षित करून दिलेल्या वारशाची ही शोकांतिका असल्याचे नमूद करून डॉ. इंगोले पुढे म्हणाल्या की, आज स्मृतिगंध सारख्या साहित्य संमेलनाची खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे. आधुनिक काळातील सावित्री नव्या ज्योतिबाने आखून दिलेल्या सोनरी वर्तुळात हरवून गेली असतांना, या संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष म्हणून महिलेची निवड होते आणि या संमेलनाचे उद्घाटन देखील एक महीलाच करते हा अपूर्व संयोग असल्याचे स्पष्ट करून त्या पुढे म्हणाल्या की, स्त्रि पुरूष समानतेच्या निव्वळ गप्पा न हाकता, मानवी देहाची जाणीव मीटल्या गेली पाहीजे.
संमेलनाच्या आयोजकांनी स्त्रियांना प्रतिनिधित्व देवून खऱ्या अर्थाने माणूसपणाचे सुचक संकेत दिले असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जुन नमूद केले.”
या संमेलनाचे निमित्ताने उद्घाटनपर मनोगत व्यक्त करतांना प्रख्यात कवयित्री संध्या पवार म्हणाल्या की, “समाजपरीवर्तनासाठी साहित्यिकांची फार मोठी गरज असून, माणूसपण हे कधीही वाटल्या जात नाही. साहित्य हे मानवी जीवनातले माणूसपण जोपासण्याठी कार्य करते.” असे मर्मग्राही प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी केले.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये संमेलनाध्यक्ष डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रीत कवींचे बहारदार कविसंमेलन संपन्न झाले. विदर्भातील प्रतिभाशाली कवींनी आपल्या सादरीकरणाने काव्यरसिकांची मने जिंकली. या प्रसंगी काव्यमंचावर डॉ. संध्या पवार, आचार्य ना.गो. थुटे, डॉ. विजय सोरते, अनंत भोयर या मान्यवरांची उपस्थिती होती. संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात ज्येष्ठ गझलकार लोकराम शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली स्मृतिगंध गझल मैफिल संपन्न झाली. याप्रसंगी राम रोगे, नांदाफाटा, सुरेश शेंडे गडचिरोली या मान्यवर गझलकारांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. मैफिलीमध्ये विदर्भातील प्रथीतयश गझलकारांचा समावेश होता. सर्वच गझलकारांच्या बहारदार सादरीकरणाने संमेलनात रंगत भरली. संमेलनाच्या चवथ्या सत्रामध्ये प्रख्यात कवयित्री गीता देव्हारे- रायपुरे चंद्रपूर, यांच्या अध्यक्षतेखाली खुले कवी संमेलन पार पडले. यावेळी काव्यमंचावर ज्येष्ठ कवी दिपक शीव, सिमा भसारकर, गोपाल शिरपूरकर, आरती रोडे, वसंत ताकघट या मान्यवर कवींची प्रमुख उपस्थिती होती. खुल्या कवी संमेलनात देखील नवोदितांनी आपल्या काव्य सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली.
उद्घाटन सत्राचे सुत्रसंचालन डॉ. सुधीर मोते भद्रावती यांनी केले. इरफान शेख चंद्रपूर, यांच्या सुत्रसंचलनाने निमंत्रीतांच्या कवीसंमेलनात जान फुंकली. गौतम राऊत ब्रम्हपुरी यांच्या बहारदार सुत्रसंचलनाने गझल मैफिल सजली तर खुल्या कविसंमेलनात देवेंद्र निकुरे ब्रम्हपुरी यांच्या सुत्रसंचलनाने रसिकांची मने जिंकली. संमेलनाचे संयोजक प्रवीण आडेकर, समन्वयक अनिल पिट्ट्लवार, व डॉ. ज्ञानेश हटवार यांनी आभार मानले.