बेरोजगारी बाबतची मोदी सरकारची आश्वासने खोटी - महेश तपासे

उज्वला योजनेतील लाभार्थ्यांनी गेल्या पाच वर्षात एकदाही सिलेंडर नव्याने भरला नाही .. सीएनजी - पीएनजीमध्ये वर्षभरातील ही जवळपास नववी दरवाढ ..

मुंबई (जगदीश काशिकर)  - महागाई, बेरोजगारी आणि डॉलर या तीन गोष्टींनी मोदीसरकारच्या कार्यकाळात उच्चांक गाठला असल्याने तरुणवर्ग हवालदिल झाला आहे त्यामुळे बेरोजगारी बाबतची मोदींची आश्वासने खोटी ठरली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. ज्या उज्वला योजनेचा गवगवा मोदी सरकारने केला त्या योजनेतील ४.१३ कोटी लाभार्थ्यांनी गेल्या पाच वर्षात एकदाही सिलेंडर नव्याने भरला नाही तर ७.६७ कोटी लाभार्थ्यांनी पाच वर्षात केवळ एकदाच सिलेंडर भरला आहे. तर काल सीएनजी दरात ६ रुपयांनी तर पीएनजी दरात ४ रुपयांनी दरवाढ करण्यात आली आहे. वर्षभरातील ही जवळपास नववी दरवाढ आहे असेही महेश तपासे म्हणाले. 

राज्यात शिंदे - फडणवीस यांचं सरकार आल्यास ३२ दिवस उलटून गेले आहेत. या दिवसात साडेसातशे जीआर काढण्यात आले आहे म्हणजे सरासरी २३ जीआर दिवसाला काढण्यात आले आहेत. या सरकारचं संविधानिक अस्तित्व किती आहे हे सुप्रीम कोर्टात ठरत आहे मात्र या सरकारला राज्यातील गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यायला वेळ नाही तर दुसरीकडे राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना पीएचडी शिक्षणासाठी ८५ कोटीची आर्थिक मदत मिळावी म्हणून आदिवासी संशोधन केंद्राने निवेदन दिले आहे मात्र या निवेदनाची फाईल धूळखात पडली आहे. ती पहायला वेळ नाही ही फार मोठी शोकांतिका आहे असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".