शिक्षकाच्या माठातील पाणी पिल्यामुळे शिक्षकाने केलेल्या अमानुष मारहाणीमुळे दलित विद्यार्थ्यांचा मृत्यू..!
घटनेच्या निषेधार्थ आमदाराचा राजीनामा
बल्लारपुर (का.प्र.) - राजस्थानमध्ये बरन जिल्ह्यातील अत्रू येथील शाळेतील शिक्षकाच्या पाण्याच्या माठातील पाणी पिल्यामुळे इंद्र कुमार या दलित विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर, आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशात घडत असलेल्या अशा घटनामुळे संताप व्यक्त केला जात होता. या विद्यार्थ्याचा त्यानंतर मृत्यू झाल्यामुळे अत्रू येथील आमदाराने राजीनामा दिला आहे. शिक्षकाने केलेल्या या मारहाणीत विद्यार्थ्याच्या कानाची नस फुटली आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शनिवारी सकाळी 11 वाजता दलित विद्यार्थी इंद्र कुमारचा मृत्यू झाला. त्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली. दलितांच्या समस्या कधी सुटणार असा सवाल केला जाऊ लागला. त्यानंतर आता तेथील आमदार पानचंद मेघवाल यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आमदार पानचंद मेघवाल हे काँग्रेसचे आमदार असून बिरन जिल्ह्यातील अत्रू मतदारसंघातून ते आमदार होते. ही घटना घडल्यानंतर याचे देशभर पडसाद उमटले होते. त्यानंतर मेघवाल यांना ही घटना सहन न झाल्याने आपला राजीनामा दिला. त्याचबरोबर मारहाण केलेल्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की, "जालोरमधील 9 वर्षीय दलित विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे मला खूप दुःख झाले आहे त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. दलित आणि वंचित समुदायांवर सतत अत्याचार आणि अत्याचार केले जात आहेत हे पाहून मला खूप दु:ख होत आहे." असं ते म्हणाले.
