झरपट नदीची पाहणी करुन नदी पुनरुज्जीवनासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश .!
चंद्रपूर (वि. प्र.) : चंद्रपुरातील महाकाली यात्रा ३ एप्रिलपासून सुरू होत असून, या यात्रेला मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या श्रद्धेने हजेरी लावतात. यात्रेच्या पार्श्वभूमीवर झरपट नदीचे पवित्र तीर्थ म्हणून महत्त्व आहे, परंतु सध्या तिची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे नदीचे खोलीकरण, सौंदर्यीकरण आणि पुनरुज्जीवन करणे अत्यावश्यक आहे. यातून गोंड राजवंशाचा इतिहास आणि वारसा जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. झरपट नदीच्या पुनरुज्जीवनातून गोंड राजवंशाचा गौरव अधोरेखित होईल. असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी झरपट नदीची पाहणी करुन नदी पुनरुज्जीवनासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित विभाग प्रमुखांना बैठकीत दिलेत. यावेळी, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, भाजपा महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, डाॅ.मंगेश गुलवाडे, सुरज पेद्दूलवार, प्रज्वलंत कडू, राजीव गोलीवार, किरण बुटले, सविता कांबळे, विशाल निंबाळकर,चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र वराडे, उपअभियंता श्री. सय्यद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. अमरशेट्टीवार, निरीचे वरिष्ठ वैज्ञानिक डाॅ.अतुल मधुरे,माजी नगरसेवक तथा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "प्रदूषण नियंत्रण मंडळ विभागाकडून या प्रकल्पासाठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी आणि प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी चर्चा झाली आहे."
नदी पुनरुज्जीवनाच्या पहिल्या टप्प्यात यात्रेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना राबविण्यात येणार आहेत, तर नंतर दीर्घकालीन आणि स्थायी स्वरूपात नदीच्या पुनरुज्जीवनाची योजना आखली जाईल. गोंड राजवंशाच्या ऐतिहासिक वारसाला अधोरेखित करून, त्याचा गौरव टिकवण्यासाठी ही पुनरुज्जीवन मोहीम संपूर्ण ताकदीने आणि समर्पणाने राबवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे बैठकीदरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, आणि इतर संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश दिले. आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, 3 एप्रिल 2025 पासून ते 12 एप्रिलपर्यंत ही यात्रा चालणार आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्वप्रथम नदीचे जल परीक्षण करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या दोन दिवसात यात्रे संदर्भातील सर्व रस्त्याची पाहणी करावी. सहा दिवसात रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करावे. तीन दिवसात शॉर्ट टेंडर काढून 15 दिवसात रस्ते बांधून तयार करावे. वेकोलीने 15 मार्चपर्यंत पाणीपुरवठा सुरू करावा. नीरी विभागाने नदीच्या वरच्या बाजूस बंधारा बांधावा. सिंचाई विभागाने नदीचा नकाशा उपलब्ध करून द्यावा. 15.2 किलोमीटरची नदी, तिच्या उगमाविषयी माहिती घेत युद्ध पातळीवर काम सुरू करावे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधून काम पूर्णत्वास न्यावे. मिशन मोडमध्ये झरपट नदीचे सौंदर्यीकरण कामाला सुरुवात करावी. इतर विभागाने संबंधित जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. या ठिकाणचा बंधारा दुरावस्थेत असून पुढील वर्षी बंधाऱ्याचे नवीनतम बांधकाम करण्यात येईल. तसेच नदीचे सौंदर्यीकरणाचे कार्य देखील हाती घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
भाविकांसाठी सुधारित सुविधा :
यात्रेदरम्यान येणाऱ्या भाविकांसाठी स्नानगृह उभारावे त्या ठिकाणी चार ट्युबवेल पंप कार्यान्वित करावे. महानगरपालिकेने बंधाऱ्याचे गेट दुरुस्ती, झरपट नदी परिसरातील कचऱ्याची साफसफाई, गायमुख दुरुस्ती, बंधारा बांधकाम, तसेच अंचलेश्वर मंदिर ते नदीपात्रा दरम्यान टाइल्स लावण्याचे कार्य हाती घ्यावे. नदीपात्र व परिसरातील साफसफाईचे अंदाजपत्रक तयार करावे. झरपट नदी परिसराचा विकास व सोयीसुविधांकरिता नाविन्यपूर्ण योजनेमधून 1 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करु असे आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले.
पाहणीदरम्यान दिलेले आवश्यक निर्देश :
प्राथमिक टप्प्यामध्ये नदी परिसरातील जलपर्णी वनस्पती काढुन नदीपात्रातील साफसफाई व स्वच्छता करावी. नदीपात्रात येणारे सांडपाणी बंद करावे. 31 मार्चपर्यंत नदीचं पात्र स्वच्छ पाण्याने वाहते करावे. योग्य ठिकाणी गट्टू बसवावे. दोन टप्प्यांमध्ये काम करावे. सर्वप्रथम पहिल्या टप्प्यातील कामाला प्राधान्य द्यावे, याकरिता निधी उपलब्ध करण्यासाठी आपण पाठपुरावा करु असेही आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.