संजय गांधी निराधार योजनेचे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढा - सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर शहरातील 1300 लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबित असल्याच्या मुद्याकडे वेधले लक्ष .!

चंद्रपूर (वि.प्र.) : चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांचे अनुदान अजूनही प्रलंबित आहे. विशेषतः चंद्रपूर शहरातील 1300 लाभार्थ्यांचे अर्ज निकाली निघालेले नाहीत. हे सर्व प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढा, असे निर्देश राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी ही सूचना दिली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, भाजपा महामंत्री डॉ.मंगेश गुलवाडे,तहसीलदार सीमा गजभिये, छबुताई वैरागडे, शालुताई कुंदोजवार, साक्षीताई कार्लेकर, आदी उपस्थित होते.
आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘राज्य शासनाने निराधार योजनेतील लाभार्थ्यांना नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑफलाइन स्वरूपात अनुदान वितरित केले होते. मात्र, डिसेंबर 2024 पासून ऑनलाइन वितरणाला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे एकूण 62 हजार 204 लाभार्थी आहेत. तर श्रावणबाळ योजनेचे 1 लक्ष 7 हजार 175 लाभार्थी आहेत.’ 1500 रुपयाच्या मागे केंद्र शासनाचे 300 रुपये चार महिन्यापासून अप्राप्त आहेत, याकडे आ. श्री. मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.
मुल तालुक्यातील 236 लाभार्थ्यांची प्रकरणे निकाली काढण्यात आली असून फेब्रुवारी 2025 अखेरपर्यंत 178 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. बल्लारपूर येथे 204 तर चंद्रपूर शहरातील 1300 अर्ज प्रलंबित आहेत. ते अर्ज त्वरित निकाली काढण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, असे निर्देश आमदार श्री. मुनगंटीवार यांनी दिले. बल्लारपूर, मुल, पोंभुर्णा आणि चंद्रपूर शहरातील निराधार आणि श्रावणबाळ योजनांच्या लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळावे यासाठी प्रशासनाला गतिमान कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेत.
जानेवारी 2025 पर्यंत 88 हजार 655 लाभार्थ्यांपैकी 56 हजार 422 लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. मात्र, 32 हजार 233 लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न नसल्याने त्यांना अनुदान मिळू शकलेले नाही. राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या नव्या धोरणांची आखणी करणे आवश्यक असल्याचे आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले. 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत मार्च 2025 अखेरपर्यंत सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढले जातील, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आश्र्वस्त केले आहे.

निराधारांच्या पाठीशी सदैव !

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार असताना विधानसभेत निराधारांसाठी ठामपणे आवाज उठवला होता. अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी निराधारांना मिळणाऱ्या 600 रुपयांच्या अनुदानात वाढ करून ते 1200 रुपये केले. पुढे राज्य सरकारने यामध्ये अधिक वाढ करत अनुदान 1500 रुपये पर्यंत केले.आ. सुधीर मुनगंटीवार हे नेहमीच निराधारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत,हे विशेष.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.