भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील विज्ञान विभागाचा विद्यार्थी वेदांत विनोद बाळेकरमकर या विद्यार्थ्याने नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन करत 720 पैकी 615 गुण प्राप्त केले आहे. त्याने आपला वैद्यकीय प्रवेश निच्छीत केला आहे . या विद्यार्थ्यांने बाराविच्या परीक्षेत 95% गुण प्राप्त करुन भद्रावती तालुका प्रथम स्थान प्राप्त केले आहे. पहिल्याच प्रयत्नात हे सुयश प्राप्त केल्याने त्याचेवर सर्वच स्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. भद्रावती पंचायत समितीमधील विलोडा येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक श्री. विनोद बाळेकरमरकर यांचा वेदांत हा मुलगा आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात घवघवीत यश मिळवून उत्तीर्ण झाला असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
त्याला नीट परीक्षेत ७२० पैकी ६१५ गुण मिळाले आहेत. त्याने हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळविले आहे. भद्रावती च्या इतिहासात त्याच्या या यशाने उच्चांक गाठला आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे. वेदांत हा मुळातच हुशार आणि मेहनती विद्यार्थी आहे. विशेष म्हणजे त्याने ऑनलाईन क्लासेस घरूनच अटेंड केले व हे यश प्राप्त केले . त्याने मार्च २०२२ च्या बारावी विज्ञान परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे. तसेच २०२० च्या दहावीच्या परीक्षेतही ९७ टक्के गुण मिळवून त्याने यशाचा उच्चांक गाठला होता. आपल्या यशाबद्दल सांगताना "अभ्यासातील सातत्य, चिकाटी व परिश्रम करण्याची तयारी असल्यास यश प्राप्त करता येते . मला एम्स ला वैद्यकिय शिक्षण घ्यायचे असल्याचे तो म्हणाला ". साधारण परिस्थितीत त्याने हे सुयश प्राप्त केले. तो आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, आजोबा आणि गुरुजनांना देतो. त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. संताजी स्नेही मंडळ भद्रावती च्या वतीने त्याच्या या घवघवीत यशाबद्दल त्याचे आईवडीलांसह अभिनंदन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष श्री. किशोर गाठे, सचिव श्री. सुरेश मस्के, डॉ. सुधीर मोते, डॉ. ज्ञानेश हटवार श्री. विजय मदनकर आदी समाजबांधव उपस्थित होते.

