बाल सुसंस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतील - डॉ. ज्ञानेश हटवार
बल्लारपुर (का.प्र.) - भद्रावती तालुक्यातील सागरा येथे गुरुदेव सेवा मंडळा तर्फे बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले . बाल सुसंस्कार शिबिराचे हे 'अकरावे' वर्ष आहे. या बाल संस्कार शिबीरात मार्गदर्शन करताना डॉ. ज्ञानेश हटवार यांनी "बाल सुसंस्कार शिबिरातून उद्याचा आदर्श नागरिक घडेल व ते देशाची धुरा सांभाळतील. आजच्या धकाधकीच्या जिवनात अशा सुसंस्कार शिबीराची नितांत आवश्यकता आहे. गुरूदेव सेवा मंडळ अशा सुसंस्कार शिबीराचे नियमित आयोजन करते हे फार स्तुत्य आहे "असे प्रतिपादन केले.
गुरुदेव सेवा मंडळ सागऱ्याच्या वतीने बाल संस्कार शिबिराचे आयोजन 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2022 पर्यंत सहा दिवसीय निवासी बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मुलं म्हणजे देवाघरची फुलं, ही पवित्र आहेत, पवित्रच राहिली पाहिजेत, त्यांच्यात कुठल्याही विकार येता कामा नये, या उदात्त विचारांनी प्रेरीत होवून गुरूदेव सेवा मंडळ सागरा या शिबीराचे आयोजन सतत करत आहे. हे 11वे वर्ष असून यात विविध वयोगटातील 105 मुले , मुली सहभागी झालेत.
बालकांच्या ठिकाणी सामूहिक जीवन जगताना सद्गुण संवर्धन मुलांच्या अंगी प्राप्त व्हावेत म्हणून सुसंस्कार शिबिराचे आयोजन गुरुदेव सेवा मंडळ सागराच्या वतीने आयोजित करण्यात आले . या निवासी सुसंस्कार शिबिरात बौद्धिक, कला, हस्तकला, कराटे, स्वसंरक्षण, संस्कार याचबरोबर व्यक्तिमत्व विकास अशा विविध विषयांवर तज्ञ मार्गदर्शकांचे व्याख्यान आयोजित केले होते.
सामुदायिक प्रार्थना मंदीर परिसर सागरा येथे हे शिबीर घेण्यात आले. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचार सामान्य जनापर्यंत पोहचावा व गाव समृध व्हावा हा या शिबीरामागचा हेतू असल्याचे आयोजन समितीने सांगितले. या शिबीरात चंद्रपूर जिल्ह्यातील व जिल्ह्या बाहेरील बरेच विद्यार्थी, विद्यार्थीनी सहभागी झालेत.