शेगांव (वि.प्र.) - सद्गुरु गजानन महाराज यांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर आपल्या अनेक भक्तांना दर्शन दिले. त्यापैकी एक होते यादव गणेश सुभेदार. श्री गजानन विजय या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक २० मध्ये दासगणू महाराजांनी या प्रसंगाचे सुंदर आणि अगदी तंतोतंत वर्णन केले आहे.
हिंगणी हे गाव वर्धा जिल्ह्यात असून वर्धा-नागपूर रोडवर सेलू-घोराड फाट्यावरून दहा किलोमीटर अंतरावर असून ते वर्धा येथून साधारण २७ किलोमीटर अंतरावर आहे. हिंगणी येथील सुभेदार हे श्री. गणेश उपासक घराणे. श्रीमंत जानोजीराव भोसल्यांच्या कारकिर्दीत ह्या घराण्यातील कर्तबगार रघुनाथराव या पुरुषास केळझर परगण्याचे देशपांडे पद आणि सरदेशमुखी मिळाली. सन १७७५ सालात रघुजी भोसले यांच्या कारकिर्दीत देवगड प्रांताची सरदेशमुखी आणि त्या प्रांताच्या सुभेदारीवर रघुनाथराव यांची नेमणूक झाली. या वेळेपासून या वंशाच्या हिंगणी येथील शाखेला सुभेदार असे उपनाव लागले आणि बाकी शाखांना देशपांडे हे उपनाव पूर्वीप्रमाणे कायम राहिले. गणपतराव बाजीराव सुभेदार यांची पत्नी अन्नपूर्णाबाई यांच्या उदरी चैत्र शुद्ध पंचमी, सन १८८६ ला यादव गणेश-सुभेदार जन्मास आले. यादवराव यांच्या जन्मानंतर बारा दिवसांनीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांची इस्टेट इंग्रज अंमलदारांनी कोर्ट ऑफ वॉर्डच्या वहिवाटीखाली ठेवली. यादवराव यांचे पोषण त्यांच्या मातोश्री अन्नपूर्णाबाई यांनी केले. त्या अतिशय कर्तबगार होत्या. त्यांनी आपली इस्टेट कोर्ट ऑफ वार्ड मधून सुटेपर्यंत स्वतःच्या हिमतीवर शेती आणि घरकारभार अतिशय दक्षतेने केला. सन १९११ साली राजे पंचम जॉर्ज नागपुरात आले तेव्हा यादवराव सरकारी निमंत्रणावरून समारंभास गेले होते. तेथे त्यांना वडिलोपार्जित राखीव जागा मिळाली. पुढे महात्मा गांधींच्या आदेशानुसार त्यांनी असहकार चळवळीच्या वेळी दरबारी मानकऱ्याचे त्यागपत्र सरकारकडे पाठवले. यादवराव यांचा सामाजिक कार्यात नेहमी सहभाग असे - १९०७ साली हिंगणा येथे शिवाजी उत्सव, १९०८ मध्ये कृषीक मंडळाची स्थापना, १९१३ मध्ये कोटेश्वर येथे पहिले मोठे शेतकरी प्रदर्शन, लोकमान्य टिळकांच्या होमरूल चळवळी मध्ये सहभाग इत्यादी.
१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात झाशी वरून निसटून आलेले ब्रह्मीभूत ब्रह्मचारी महाराज (पानेट) हे देखील हिंगणीला काही दिवस होते. यादवरावांना संतांविषयी अतीशय आदर होता.
यादवराव सुभेदार हे गजानन महाराजांचे परमभक्त. अनेकदा त्यांना महाराजांचे दर्शन आणि प्रत्यक्ष सहवास घडलेला असल्याकारणाने त्यांना महाराजांच्या बाबतीत म्हणजे त्यांची शरीरयष्टी, त्यांचे तेजस्वी नेत्र, त्यांच्या भावमुद्रा, बोलण्याची पद्धत इतकेच नव्हे तर त्यांचा स्वर, आवाज सर्व परिचित असे होते.
यादवराव यांचा कापसाचा मोठा व्यापार होता. एका वर्षी या व्यवसायात त्यांना दहा हजार रुपयांचा तोटा झाला. ह्या चिंतेने ते क्षीण झाले, त्यांना सारखी चिंता वाटत होती. पण व्यापार सोडवेना आणि फायदा देखील होत नव्हता.
दासगणू महाराजांनी २० व्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे, समोर आलेल्या भिकाऱ्याचे निरीक्षण केल्यावर त्यांना महाराजांचे हे सर्व गुण त्याच्यात दिसले. त्यामुळे त्यांनी ठरवले की नुसता उहापोह न करता या भिकाऱ्याला दोन पैसे देऊन टाकावेत. भिकारी रुपये घेऊन क्षणार्धात बाहेर निघून गेला. तेथील काम उरकून पाठोपाठ यादवरावही निघाले. त्यांनी त्या भिकाराचा तपास केला, पण गावात त्याचा थांगपत्ता लागला नाही. शेवटी त्यांनी निश्चय केला की हा भिकारी दुसरा तिसरा कोणी नसून हे शेगावचे श्री. गजानन महाराजच असावेत. ते जर खरोखरच महाराज असतील तर आज व्यापारात आपल्याला निश्चित फायदा होईल. वर्ध्याच्या बाजारात कापसाच्या गाड्या विकण्यासाठी आल्याच होत्या. खरोखर त्या दिवशी कापसाला खूप चांगला भाव येऊन अपेक्षेपेक्षाही जास्त पैसा मिळाला. यादवराव सुभेदारांना आता खात्री पटली की तो भिकारी नसून हे शेगावचे योगीराज गजानन महाराज होते. ते आपल्या भक्तांचे रक्षण करतात, फक्त त्यांच्याविषयी दृढनिष्ठा असणे महत्त्वाचे आहे.
महाराज आपल्या भक्ताला कसे सांभाळतात, त्याचे रक्षण कसे करतात हे यावरून लक्षात येते. आपल्या भक्ताने केलेले नवस तो फेडत नाही, याची महाराज त्याला आठवण करून देतात. एवढेच नव्हे तर मी तुझे आराध्यच आहे, ही जाण भक्ताला करून देतात. यादवरावांसाठी महाराजांना वर्ध्याला जावे लागले आणि आपल्या चिंतेत असलेल्या भक्ताला ह्यातून सोडवण्यासाठी त्याच्यावर कृपा करावी लागली. यावरून महाराज कृपाळू आणि भक्तांना सांभाळणारे आहेत तसेच यादवराव हे देखील त्या योग्यतेचे भक्त आहेत हे सिद्ध होते.
यादव गणेश सुभेदार आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तांची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.