श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी - पुष्प - तिसावे - श्री इच्छाराम शेठजी अग्रवाल

शेगांव (वि.प्र.) - इच्छाराम अग्रवाल हे बंकटलालांचे चुलत भाऊ. बंकटलाल यांच्या घराशेजारीच त्यांचे घर होते. यांनाही महाराजांच्या भोजनासाठी नैवेद्य आणावा अशी इच्छा झाली. सोमवार दिनांक ०४/०३/१८७८, सोमवती अमावस्येचा दिवस. इच्छाराम यांचे सोमवारचे व्रत होते. ते शंकराचे निष्ठावंत भक्त होते. आपल्या घरी महाराजांच्या रूपाने साक्षात शंकरच आले आहेत अशी श्रद्धा त्यांच्या अंतकरणात उमटली होती. महाराज म्हणजे योगेश्वरच. त्यांच्यासाठी भोजनाचा प्रसाद आणावा अशी इच्छा त्यांच्या मनात उत्पन्न झाली. अस्तमानी महाराजांची पूजा करून उद्यापन समाप्ती करावी असे त्यांनी ठरविले. स्नान करून व पूजेचे सर्व साहित्य घेऊन इच्छाराम यांनी महाराजांची पूजा केली आणि त्यांना विनंती केली "महाराज, आपले भोजन जरी झाले असले तरी आपण मी आणलेला हा नैवेद्य ग्रहण करावा. आपण जेवल्याशिवाय मी अन्नग्रहण करणार नाही. आज माझा उपवास आहे. आपण सर्वांचे मनोरथ पूर्ण केले परंतु माझ्या मनातील संकल्प पूर्ण होणे मात्र बाकी राहिले आहे. तेव्हा माझी इच्छा पूर्ण करावी ही आपल्या चरणी विनंती."महाराजांची परवानगी मिळताच इच्छाराम शेठजींनी परातीतून नैवेद्य आणला. लोक कुतूहलाने पाहू लागले. 

आंबेमोहोर तांदळाचा! दोन मुदी भात साचा!
नानाविध पक्वानांचा! थाट केला तयाने!!०२/११४!!
जिलेबी राघवदास मोतीचूर! करंजा अनारसे घीवर!
शाखांचे नाना प्रकार! वर्णन करावे कोठवरी!!०२/११५!!
अगणित चटण्या कोशिंबिरी! वाडगा दह्याचा शेजारी!
तुपाची ती वाटी खरी! ओदनाच्या सव्य भागा!!०२/११६!!
चार मनुष्यांचे अन्न! ऐसा नैवेद्य परिपूर्ण!
समर्थांपुढे आणून! ठेवला इच्छारामाने!!०२/११७!!

अशाप्रकारे चार माणसे भोजन करून तृप्त होतील एवढा नैवेद्य इच्छाराम यांनी महाराजांपुढे आणून ठेवला. त्या नैवेद्याकडे पाहून महाराज स्वतःचीच बोलले,"गणप्या खा! अघोऱ्या जेव! खातो खातो म्हणतोस तर खाता".
असे स्वतःशीच बोलून महाराज भोजनात बसले. ताटातील अवघ्यांना त्यांनी खाल्ले. इतकेच नव्हे तर मीठ व लिंबूही फस्त केले. इच्छाराम शेठ यांच्या आग्रहाखातर महाराज जेवले खरे परंतु आग्रहाचा प्रकार किती वाईट आहे? हे दाखवण्यासाठी त्यांनी एक लीला केली. त्यांनी जेवलेले अन्न उलटी द्वारे बाहेर टाकले. वास्तविक पाहता त्यांना अति भोजनामुळे उलटी झाली नव्हती. मात्र योगेश्वर आला हा प्रकार केवळ समाज प्रबोधनासाठी करावा लागला. त्यांच्या अंगी कोणतेही व कितीही अन्नपचविण्याचे सामर्थ्य होते परंतु आपल्या येथे आग्रह करण्याची असलेली चुकीची पद्धत त्यांना दाखवून द्यायची होती.
आपल्या अवास्तव आग्रहामुळे अन्नाची किती नासाडी होते हे आपण लग्न समारंभ आणि इतर सर्व कार्यक्रमांमधून प्रत्यक्ष पाहतोच. जे खऱ्या अर्थाने महाराजांचे भक्त आहेत त्यांनी महाराजांच्या या लीले कडे जाणीवपूर्वक पहावे. अन्नाचा अवमान करू नये आणि पुण्य करू जाता पदरी पाप पाडून घेऊ नये. महाराज सप्तर्षींपैकी एक आहेत. ते केवळ जगाच्या उद्धारासाठीच प्रगट झाले आहेत. त्यांनी साध्या साध्या कृतीतून सर्व मानव जातीला बोर केला की जेणेकरून तो आपल्याही पचनी पडेल. कुस्ती भातशीते खाऊन त्यांनी "अन्न ब्रम्हेती व्यजानात्" अन्न हे ब्रह्म आहे असा बोध केला. तर इच्छाराम यांच्या उदाहरणावरून अति आग्रहाचा किती वाईट परिणाम होतो हे दाखविले आहे.
"अन्नम् न परिचक्षीत्" अन्नाचा त्याग करू नका किंवा अन्नाची निंदा करू नका. अशी वैदिक तत्वे त्यांनी आपल्या कृतीतून मांडली आहेत. महाराजांची प्रत्येक कृती बोलकी आहे व तसेच त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये रहस्य दडलेले आहे. आपण त्या कृतीचे चिंतन केल्यास त्यातील रहस्याची उकल आपोआप होईल. "निसर्ग धर्माचे पालन करा" असे महाराज स्पष्टपणे सांगतात. त्याचा अर्थ निसर्गधर्माप्रमाणे जीवन जगा. जेवढे पाहिजे तेवढेच अन्नग्रहण करा.
श्री इच्छाराम शेठजी आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तांची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.


Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.