श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी - पुष्प पन्नासावे - विष्णूचा सावजी

शेगांव (वि.प्र.) - मलकापूर येथे महाराजांचे एकनिष्ठ भक्त विष्णूसा बाळकृष्णसा सावजी (महाजन) राहत होते. त्याकाळी हे घराणे वैभवसंपन्न होते. सर्व सुखसोयी, अमाप संपत्ती असूनही या माणसात अहंकाराचा लवलेश नव्हता. अनंतजन्मीच्या पुण्याईने संतप्रेम पदरी पडले होते. धार्मिक वृत्ती, सरळ साधा स्वभाव आणि धर्मकार्यात रुची असून संताविषयी मनात खूप आदर होता. त्यांना देशाविषयी फार प्रेम होते हे त्यांच्या घराण्यातील लोकांकडून कळते. नानासाहेब पेशवे भूमिगत होते तेव्हा काही दिवस त्यांचा येथे मुक्काम होता.
मलकापूर हे गाव मुंबई नागपूर रेल्वे लाईन वर शेगावच्या पश्चिमेस ७२ किलोमीटर अंतरावर आहे. हे तालुक्याचे ठिकाण असून येथे फार मोठी बाजारपेठ आहे. मलकापूर हे ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचे गाव आहे. या गावाबाबतीत साडेपाचशे वर्षांपूर्वीचे संदर्भ सापडतात. ६ मे,१९०८ रोजी लोकमान्य टिळक व दादासाहेब खापर्डे हे सावजींच्या आग्रहावरून मलकापूरला त्यांच्या घरी गेले होते अशी दादासाहेब खापर्डे यांच्या रोजनिशीमध्ये नोंद आहे.
विष्णूसा सावजी यांच्याकडे श्री गजानन महाराज अनेकदा गेलेत. श्री गजानन महाराजांना आपल्या घरी आणून त्यांना आसनावर विराजित करून त्यांची पूजाअर्चा करून आपले जीवन धन्य करणारा हा भक्त. संतांच्या आगमनाच्या माध्यमाने हा परमार्थीभक्त आपल्या घरी भोजनाच्या पंक्ती उठवायचा. श्री गजानन महाराजांप्रमाणेच मराठवाड्यातील न्हावा येथील श्री रंगनाथ महाराजांवर देखील विष्णूसा सावजींची श्रद्धा व भक्ती होती. अशा या दोन थोर संतांची आपल्या घरी भेट घडवून आणावी, असे त्यांच्या मनात आले. त्याप्रमाणे त्याने रंगनाथ स्वामींना आणण्यासाठी माणसे पाठवली. दोन संतांच्या आगमनाप्रीत्यर्थ सर्व तयारी झाली. श्री रंगनाथ महाराज बाहेर छावणी टाकून बसले व श्री गजानन महाराज वाड्यात उतरले. वाड्यामध्ये दोन्ही संतांची पती-पत्नी या उभयतांनी षोडशोपचारे पूजा केली. रंगनाथ महाराज वस्त्र परिधान करीत असत तर श्री गजानन महाराज दिगंबरावस्तेत राहत. पूजेनंतर श्री रंगनाथ महाराज आपल्या छावणीवर आणि गजानन महाराज वाड्यातच थांबले.
दुसऱ्या दिवशी श्री रंगनाथ महाराज वाड्यात आले ते हातात हार घेऊनच. वाड्यात येऊन त्यांनी आपल्या हातातील फुलांचा हार श्री गजानन महाराजांच्या गळ्यात टाकला. भक्तांनी या दोन्ही संतांच्या नावाचा जयजयकार केला. मात्र हे दोन्ही संत एकमेकांशी काहीच बोलले नाही.
"मुकेपणाचे बोलणे ज्याचे तोची जाणे!
अनुभवाचिया खुणे अनुभवी जाणे!!"
असा हा दोन संतांचा मुक संवाद. तेथे शब्दही थिटे पडावेत. शब्दांच्या पलीकडचा हा संवाद. श्री गजानन महाराज मलकापूर येथे विष्णुचा सावजींकडे चार वेळा गेल्याचे संदर्भ सापडतात. अशाप्रकारे महाराजांनी वारंवार विष्णूसाकडे जाऊन त्यांच्या श्रद्धा भक्तीचा जणू दाखला दिला आहे.
श्री गजानन महाराजांची अकोलेकरांवर विशेष कृपा होती. तेथे महाराजांचे अधूनमधून जाणे येणे होते. अकोल्यात असंख्य भक्त होते. त्या भक्तांमध्ये प्रामुख्याने बच्चुलाल अग्रवाल, बापूराव सावरगावकर, जीजीबाई पंडीत, देसाई, महाजनी, विष्णुपंत, खटाऊ शेठ, कोल्हटकर, व्यंकटराव देसाई, दिगंबर, गोपाळ खुशाल देशपांडे, गंगाधर देवराव कुलकर्णी, दामू अण्णा दीक्षित अशी कितीतरी नावे सांगता येतील.
विष्णूसा सावजी यांना सेप्टिक झाल्याने देवळाली येथे ऑपरेशन होऊन दिनांक १०/०५/१९१२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. सावजी यांचा जुना वाडा जेथे महाराज जात असत, ती सावजी गल्ली (सध्या पानट गल्ली) येथे होता. 
महाराजांचे भक्त विष्णूसा बाळकृष्ण सावजी व त्यांची पत्नी यमुनाबाई हे दोघेही महाराजांचे निष्ठावंत भक्त होते.
श्री विष्णूसा सावजी आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.


Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.