गोंडपिपरीचे नगरसेवक व भाजपचे गटनेते चेतनसिंह गौर यांचा राजीनामा .!
बल्लारपुर (का.प्र.) : लोकनेता काय असतो आणि कसा असावा, याचा प्रत्यय नागपूरच्या राज भवनमधील मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर आला. भाजपचे बलाढ्य नेते, राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यभरात एक नाराजीची लाट पसरली. ही लाट एकट्या भाजप पक्षातच नव्हती, तर विरोधी पक्षातील नेतेही मुनगंटीवारांना डावलण्यात आल्याने अजूनही 'शॉक'मध्ये आहेत.
काल (18 डिसेंबर) काँग्रेसचे नेते, आमदार विजय वडेट्टीवार आणि सुधीर मुनगंटीवार विधान भवन परिसरात आमनेसामने आले. यावेळी वडेट्टीवार यांचे सुधीर मुनगंटीवार यांच्याप्रती असलेले प्रेम आणि मैत्री दोघांनाही लपवता आली नाही. समोरासमोर येताच दोघांची गळाभेट झाली. आपण विरोधी पक्षात आलो आहोत, याचे दुःख कमी पण भाजपचे सरकार असताना मुनगंटीवार मंत्रिमंडळात नाहीत, याचे दुःख जास्त, असे वडेट्टीवारांच्या व्यवहारावरून दिसून आले. हा प्रसंग विधानभवन परिसरात उपस्थित प्रत्येकाने अनुभवला. यावेळी पाहणाऱ्यांच्या डोळ्यांच्या कडाही ओल्या झाल्या.
सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत जे झाले, त्यानंतर राज्यभरातील लोक हळहळले. आता त्याहीपेक्षा पुढे जाऊन मुनगंटीवारांसाठी राजीनामा सत्र सुरू झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील नगरसेवक आणि भाजपचे गटनेते चेतनसिंह गौर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला आहे. 'पक्षाने भाऊंना वगळ्यामुळे आता येथे राहण्याची इच्छा नाही', असे गौर यांनी म्हटले आहे.
राजीनामा पत्रात चेतनसिंह गौर म्हणतात, सुधीर मुनगंटीवार हे सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आले. यावेळी जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मान त्यांनी पटकावला. सोबतच विदर्भातून सलग सातव्यांदा निवडून येण्याचाही विक्रम त्यांनी आपल्या नावे केला. पक्षाने जेव्हा जेव्हा जी जबाबदारी दिली, तेव्हा तेव्हा त्यांनी ती ताकदीने स्वीकारली. राज्याचे अर्थमंत्री, प्रदेशाध्यक्ष, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि इतरही खात्यांना त्यांनी लोकप्रियता मिळवून दिली. आपल्या कामाचा ठसा त्यांनी जनमाणसावर उमटवला.
लोकनेते, विकासपुरूष आणि चंद्रपूर जिल्ह्याचे तारणहार असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. हा पक्षाचा निर्णय धक्कादायक आहे. आमच्यासारख्या हजारो तरूणांना नवी दिशा देण्याचं काम सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. भारतीय जनता पक्ष काय आहे, हे त्यांनी आम्हा तरुणांना शिकवलं. शपथविधीचा दिवस उजाडेपर्यंत त्यांचं नाव यादीत आहे, असं सांगण्यात आले. पण प्रत्यक्ष शपथविधी होत असताना त्यांच्या नावाचा उल्लेख कुठेही नव्हता.
चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात भाजपच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. झुंझार नेतृत्वावर झालेला अन्याय आमच्या पचनी पडलेला नाही. माझ्यासारख्या अनेक तरुणांना त्यांनी समाजकारण आणि राजकारणाचे धडे दिले. त्यांना डावलण्यात आल्यामुळे आता या पक्षात काम करण्याची इच्छा राहिलेली नाही, असेही चेतनसिंह गौर यांनी म्हटलेले आहे.