शेगावपासून साधारण 23 किलोमीटर अंतरावर पूर्णा नदीच्या काठावर असलेले विटखेड हे छोटेसे गाव. तेथे दत्ताचे अतिशय सुंदर देवस्थान आहे.
शेगांव (वि.प्र.) - महाराजांच्या अनेक भक्तांपैकी एक परशुराम देशमुख हे दत्तभक्त असल्याने त्यांना एकदा विटखेड या गावी दत्त मंदिरात जाण्याची इच्छा झाली. त्यांनी महाराजांना विटखेडला यात्रेसाठी येण्याची विनंती केली. महाराजांनी प्रसन्न होऊन होकार दिला. आणखी तीन-चार भक्तसुद्धा त्यांच्यासोबत येण्यासाठी तयार झाले. सर्वजण बैलगाडीने यात्रेसाठी निघाले. चैत्र शुद्ध पौर्णिमा. चंद्राचा स्वच्छ प्रकाश आणि सोबत गजानन महाराज हा अमृतयोगच म्हणावा लागेल. दूर अंतरावर विटखेड दिसू लागले. गावापासून थोड्या अंतरावरच समर्थांनी बैलगाडी थांबवली. रस्त्याच्या जवळच एका बाजूला असलेल्या शेतात एक कडुनिंबाचे झाड होते. या झाडाखाली बैलगाडी उभी केली. सर्वजण बैलगाडीतून उतरले. जमिनीवर चादर अंथरून महाराजांची बसण्याची व्यवस्था केली.
महाराज वृक्षाखाली निदानंदात बसले. जवळच परशुराम देशमुख उभे होते. इतर सर्वजण दर्शनासाठी गेले. महाराज परशुरामबापूंना म्हणाले, "अरे! बापू तू दर्शनाला गेला नाहीस! जा दर्शन करून ये!" त्यावर बापू म्हणाले, "महाराज, आपणच माझ्यासाठी सर्व काही आहात. मग तेथे दर्शनाला जाऊन काय करू? आपणच चालते-बोलते दत्त आहात." महाराज म्हणाले, "अरे मी तुझ्या विनंतीवरून येथे आलो आणि तू मात्र दर्शनालाही जात नाहीस. याला काय म्हणावे?" खरे पाहता इतर सर्वजण दर्शनासाठी गेले असताना महाराजांना एकटे सोडून जाणे, बापूंना योग्य वाटत नव्हते. ते महाराजांना म्हणाले, "सद्गुरुनाथा! दत्तप्रभू आणि तुम्ही काही भिन्न नाही. तेव्हा माझी एक इच्छा आहे, ती म्हणजे सगुण दत्तदर्शनाची. ती तेवढी पूर्ण करा." बापू निष्ठावंत दत्तभक्त होते, हे महाराजांनी ओळखले होते. त्यांचा शुद्ध भाव पाहून महाराज प्रसन्न झाले. महाराजांनी पद्मासन घातले आणि दत्ताचा धावा केला.
हातात झोळी आणि कमांडलू घेऊन प्रत्यक्ष दत्तप्रभू तेथे प्रगट झाले. त्यांच्यासोबत चार कुत्रे सुद्धा होते. हे दृश्य पाहून बापूंचे नेत्र दिपून गेले. गजानन महाराजांनी 'दर्शन घे' म्हटल्यावर त्यांना भान आले. बापूंनी दत्तप्रभूंचे प्रत्यक्ष दर्शन घेतले. दत्ताचे रूप डोळ्यात साठवले आणि लगेच महाराजांच्या चरणी सुद्धा मस्तक ठेवले. त्यानंतर दत्तप्रभू गुप्त झाले. बापूंना त्यांचे जीवन धन्य झाल्याचा आनंद झाला. सद्गुरूंनी आपली इच्छा पूर्ण केली आणि आपल्या जन्माचे सार्थक केले. असे त्यांना वाटू लागले.
या दत्तदर्शनातून दुसरी आणि महत्त्वाची उपलब्धता म्हणजे दत्तप्रभू प्रकट झाले ते चार कुत्र्यांसोबत या चार कुत्र्यांपैकी दोन कुत्रे लगेच पुढे येऊन समोर पद्मासन घालून बसलेल्या श्री गजानन महाराजांचे पाय चाटू लागले आणि पुढे महाराजांसोबत राहिले. हे दोन्ही कुत्रे महाराजांचे अतिशय लाडके होते. यापैकी एकास 'मोतीराम' या नावाने महाराज संबोधत. महाराज मोतीरामला कुरवाळत असतानाचा फोटो उपलब्ध आहेच.
सद्गुरूंनी अनेक भक्तांना अनेक देवतांच्या रूपात दर्शने दिली आहेत. हे दत्तदर्शन महाराजांनी वेगळ्या प्रकारे घडवून आणले. महाराजांनी दत्तांना आवाहन केल्याबरोबर साक्षात दत्तप्रभू तेथे प्रकट झाले. केवढा हा अधिकार आणि भक्ताची इच्छा पूर्ण करण्याची केवढी ही समर्थता! दत्त दर्शनासाठी भक्त व्याकुळ झाला आहे आणि खरोखरच तो त्या योग्यतेचासुद्धा आहे, मग त्यावर कृपा करण्यासाठी विलंब कशाला? किती हा कृपाळूपणा!
आजही महाराज आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करत आहेत. ते इतके उदार आहेत की आपल्यावर ते तत्क्षणीच कृपा करतात. महाराज मातृहृदयाचे आहेत. मग तेथे कशाचे उणे राहील? मात्र त्यासाठी भक्तीची तळमळ अंतःकरणातून येणे आवश्यक आहे. अशी तळमळ आणि श्रद्धा असली की कृपेचा तोटा उरत नाही. अशा या थोर सद्गुरूंची कृपा आपणही प्राप्त करून घेऊया.
परशुराम देशमुख आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.