भद्रावती (ता.प्र.) - ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महामंडळातर्फे गठित करण्यात आलेल्या स्थळ निवड समितीतर्फे २३ रोजी सर्वानुमते मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर या संस्थेची शिफारस केली आणि साने गुरुजींच्या कर्मभूमीत संमेलन घेण्यास अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मान्यता दिली.
पुण्यात आज झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत अमळनेरचा प्रस्ताव अंतिम करण्यात आला. महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, प्रकाश पागे, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, जे.जे. कुलकर्णी, दादा गोरे, डाॅ. विद्या देवधर, अ.के. आकर, प्रकाश गर्गे, दगडू लोमटे आदींची उपस्थिती होती. या संमेलनासाठी खान्देशातील अमळनेर, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि औदुंबर (सांगली), तर मराठवाड्यातून जालना जिल्ह्यातूनही प्रस्ताव होता. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, महामंडळाचे उपाध्यक्ष रमेश वंसकर, प्रदीप दाते, डॉ. किरण सगर, सुनीताराजे पवार आणि डॉ. नरेंद्र पाठक यांच्या समितीने अमळनेर येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली होती.
खान्देशातील यापूर्वीची संमेलने वर्ष क्रमांक स्थळ ..
१९३६ २२ जळगाव
१९४४ २९ धुळे
१९५२ ३५ अमळनेर
१९८४ ५८ जळगाव
साने गुरुजींच्या कर्मभूमीत, संत सखाराम महाराजांच्या पुण्यभूमीत आणि श्रीमंत प्रताप शेठजी व अझीम प्रेमजी यांच्या उद्योगभूमीत ९७ वे साहित्य संमेलन होणार आहे. ही मोठ्या अभिमानाची बाब आहे. संमेलन यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी साऱ्या अमळनेरकरांनी घेतली, ही आनंदाची बाब आहे.
डॉ. अविनाश जोशी,अध्यक्ष,म.वा.मंडळ, अमळनेर, जि.जळगाव.
तिन्ही संस्थांची संमेलन आयोजनाची तयारी व कार्यक्षमता यांचा विचार करून स्थळनिवड समितीने सर्वांनुमते अमळनेरची शिफारस केली. महामंडळाने त्याला मान्यता दिली.
उज्ज्वला मेहेंदळे, कार्यवाह, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ७१ वर्षांनी अमळनेरमध्ये संमेलन यापूर्वी अमळनेर येथे १९५२ मध्ये संमेलन भरले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष कृ.पां. कुलकर्णी होते.
त्यामुळे तब्बल ७१ वर्षांनंतर पुन्हा अमळनेरला संमेलन घेण्याची संधी मिळाली आहे. गेल्या चार- पाच वर्षांपासून तेथून प्रस्ताव येत होता. नियोजन क्षमता पाहून त्यांची निवड करण्यात आली.