शेगांव (वि.प्र.) - वर्धा येथील सरकारी दवाखान्यात डॉक्टर गोविंद विठ्ठल गाडे हे नोकरी करत असत. ते एक ईश्वरभक्त आणि सज्जन व्यक्ती होते. त्यांनी सेवा व्रताचा अंगीकार केला होता. त्यांनी केलेल्या सेवेमुळे त्यांना ब्रिटिश सरकारने रावसाहेब ही पदवी दिली होती. त्यांनी जीवनात शास्त्र-मूल्ये जोपासली आणि ईश्वरास आपले करून घेतले होते. त्यांच्या त्या भक्तीला प्रसन्न होऊनच गजानन महाराजांनी एक चमत्कार केला.
डॉक्टर गाढे यांची मुलगी उपवर झाली होती. तेव्हा तिच्यासाठी डॉक्टरांनी वर संशोधन करणे सुरू केले. पुढे अकोला येथील दिगंबर यांच्याशी डॉक्टर साहेबांच्या मुलीची पत्रिका जुळली आणि लग्न ठरले. सन १९०४ मधली ही घटना. वैभव संपन्न घरातील लग्नाचा हा सोहळा अवर्णनीय असा होता. त्या वैभवानुरूप भव्य मंडप सजावट केली होती. लग्न सोहळा पार पडला आणि मंडपात जेवणाची तयारी सुरू झाली. त्यावेळी वर पक्षाकडील मंडळींनी डॉक्टरांना श्लोक म्हणण्याचा आग्रह केला. डॉक्टर हे प्रख्यात गायक सुद्धा होते त्या अनुषंगाने ही विनंती रास्तच होती. डॉक्टरांना स्वरवाद्यांनी उत्तम साथ दिली. चार चरणातील समयोचित राग आळवून त्यांनी 'सीताकांत जय जय राम' आरोह-अवरोहातून विस्तारित असताना मंडपात एकच खळबळ उडाली; कारण सर्वांना एक दिगंबर व्यक्ती मंडपात येताना दिसली.
अकोल्याच्या मंडळींनी गजानन महाराजांना लगेच ओळखले. त्यांनी वधुपक्षातील मंडळींना हेच ते शेगावचे गजानन महाराज असल्याचे सांगितले. प्रत्येकाला या कार्याला गजानन महाराजांचा शुभाशीर्वाद मिळाल्याचा आनंद झाला. महाराजांना आदरपूर्वक आत बोलावण्यात आले. त्यांना पितांबर नेसायला दिले आणि त्यांची पूजा केली. पितांबर नेसलेल्या मस्तकावर केशरी गंध आणि गळ्यात तुळशी फुलांची माळ घातलेल्या गजानन महाराजांनी डॉक्टरांना आलिंगन दिले. हा प्रसंग अकोल्याच्या लोकांसाठी नवीनच होता. महाराजांनी डॉक्टरांना आलिंगन द्यावे ही गोष्टच निराळी होती. डॉक्टरांचे शास्त्रशुद्ध आचरण संतपुरुषात गणना व्हावी असेच होते. त्यांच्या रोमारोमात सेवावृत्ती भिनली होती. म्हणूनच शेगावचे जीवनमुक्त योगसम्राट गजानन महाराज त्यांना भेटायला आले होते. त्यांची भक्ती पाहूनच गजानन महाराज यांच्यावर प्रसन्न झाले. अशा थोर भक्ताला आपल्या हृदयाला लावून त्यांचे स्थान किती उच्च दर्जाचे आहे, हेच गजानन महाराजांनी जणू लोकांना दाखवून दिले. भक्तीच्या बळावर शेगावचा देव त्यांना भेटायला आला होता.
महाराजांसाठी चांदीच्या वाटीतून लाडू आणि जिलबीचा नैवेद्य आणण्यात आला पण महाराजांनी तो अव्हेरला आणि "भाकर आणा, भाकर आणा" असा घोषा लावला. बड्या घरच्या या श्रीमंतांच्या लग्नात भाकरी कशी मिळणार. शेवटी बगीच्यातील माळ्याच्या झोपडीतून पीठ मागवून भाकरी करण्यात आली महाराजांच्या समोर चुन-भाकरीचा नैवेद्य ठेवण्यात आला.
डॉक्टर गाढे यांची भक्ती श्रेष्ठ दर्जाची होती. त्यांच्या भावपूर्ण गायनाचा झंकार ऐकत महाराज मंडपाच्या प्रवेशद्वारावर हजर झाले. त्यांची पूजा स्वीकारली आणि त्यांच्यावर कृपा करून तेथून निघून गेले.
परशुराम देशमुख आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.