श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी - पुष्प पंचावन्नावे - डॉक्टर परांजपे, नागपूर

शेगांव (वि.प्र.) - गजानन महाराज नागपूरला बुटींच्या वाड्यात असताना बुटींनी त्यांच्या सेवेमध्ये कशाचीही कमतरता ठेवली नव्हती. महाराजांच्या पंक्तीला रोज शे-दोनशे भक्तगण असत. सर्वांना बसण्यासाठी शिसमचे पाट आणि भोजनासाठी चांदीचे ताट, पंचपक्वानांची मेजवानी असा थाट असे. महाराजांच्या स्नानासाठी बुटींनी चांदीचे घंघाळ आणले होते. 
एक दिवस नागपूरचे डॉक्टर परांजपे दर्शनासाठी वाड्यात आले. जेव्हा त्यांनी गजानन महाराजांचे दर्शन घेतले, तेव्हा त्यांच्या मनात आले की, "महाराज चौफेर भटकतात. त्यामुळे त्यांच्या पायावर धुळीची पुटे चढतात. जर आपल्या घरी महाराज आले, तर गरम पाण्याने आणि साबणाने त्यांना आंघोळ घालून त्यांचे पाय घासून स्वच्छ करता येतील." पण हे उघडपणे सांगण्याची त्यांच्यात हिम्मत नव्हती. दर्शन घेऊन ते परत गेले. परंतु 'आपल्या हातून महाराजांची स्नान घडेल का?' अशी कालवा कालव मनात सुरू झाली.
दुसऱ्या दिवशी बुटींच्या वाड्यात नेहमीप्रमाणे स्नानाची तयारी झाली. चांदीचे घंघाळ गरम पाण्याने भरून ठेवण्यात आले. महाराजांच्या अंगाला सुगंधी तेल लावण्यात आले. भक्तगण महाराजांच्या अंगावर घंघाळातील पाणी ओतणार, तोच गजानन महाराज जोराने "टांगा, टांगा" असे ओरडू लागले. गोपाळरावांनी घाईघाईने एक माणूस टांगा आणण्यास धाडला. तोपर्यंत घंघाळ बाजूला सारून महाराज बाहेर आले आणि समोर उभ्या असलेल्या टांग्यात बसले. टांगा चालू लागला. शुक्रवार तळ्यापाशी डॉक्टर परांजपे यांचे घर होते. महाराजांनी टांगा थांबवला आणि टांग्यातून उतरून परांजपेंच्या घरात येऊन सरळ न्हाणीघरात शिरले. डॉक्टर परांजपे आणि त्यांच्या पत्नीस महाराज आल्यामुळे अतिशय आनंद झाला. त्यांनी सुगंधी द्रव्याने महाराजांना स्नान घातले आणि त्यांचे अंग पुसून त्यांना न्हाणी घराच्या बाहेर आणले. महाराजांना गंध लावून त्यांची पूजा केली आणि नैवेद्याचे पात्र त्यांच्यासमोर ठेवले. त्यांना भोजन करण्यासाठी विनवू लागले. परंतु महाराज भोजनाचे ताट बाजूला सारून तडक बाहेर पडले, टांग्यात बसले आणि पुन्हा गोपाळरावांच्या घरी परत आले. येथे भोजनाची तयारी सुरू होतीच. सर्वजण त्यांची वाट पाहत होते. महाराजांनी पंगतीत बसून भोजनात सुरुवात केली.
डॉक्टर परांजपे आणि त्यांच्या पत्नीला गजानन महाराज आपल्या घरी आल्याने धन्यता वाटली. सद्गुरूंनी त्यांच्या मनातील भाव जाणून ही लीला केली. ते अंतर्ज्ञानी असल्याची खूण उभयतांना पटली. केवळ दृढ श्रद्धेमुळे महाराजांनी इच्छेची पूर्तता केली. महाराज त्रिकालज्ञ आहेत आणि तत्क्षणी पावणारे, कृपा करणारे आहेत. भक्ताच्या मनात जर शुद्ध भाव आणि उत्कट इच्छा असेल तर त्याची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. महाराज त्याची इच्छा पूर्ण करतातच.
डॉक्टर परांजपे आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.