श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी - पुष्प एक्कावन्नावे - गोविंदबुवा टाकळीकर

शेगांव (वि.प्र.) - कृष्णभक्तीचा परंपरागत वारसा लाभलेल्या घराण्यात हरिनारायण महाराजांच्या तृतीय चिरंजीवांच्या म्हणजे विश्वनाथ क्षीरसागर (टाकळीकर) आणि भागीरथीबाई यांच्या पोटी गोविंद बुवांचा जन्म झाला. हे घराणे नाथ संप्रदायाच्या अनुग्रह पद्धतीने चाललेले होते. गोविंद बुवांचा जन्म झाला तेव्हा कोणी अनाहुताने येऊन त्यांच्यासाठी "विठ्ठलभट" हे नाव सुचवले आणि लहान बालकास बघून भविष्यवाणी केली की "हा बालक कृष्णउपासक होईल, गीता-भागवताचे अध्ययन करेल. सर्व प्राणीमात्रांसाठी अन्नदान करेल. साधूसंतांचा मेळ करून भजन कीर्तन करेल. लोकांना धर्ममार्गाला लावून सकलांचा उद्धार करेल." 
गोविंदबुवा पाच वर्षाचे असताना व्रतबंध झाल्यावर त्यांनी यज्ञोपवीत धारण केले आणि गायत्री मंत्राचे पुरश्चरण केले. बालपणापासूनच त्यांना कृष्णाविषयी प्रेम होते. त्यांचे बालपण भक्तीमय होते. शास्त्र अभ्यास, गीता, भागवत-कथा या गोष्टींचा त्यांच्यावर पगडा होता. बालपणापासूनच त्यांना प्रासादिक वाणी लाभली होती. 
ते आपल्या प्रासादिक वाणीमुळेच विदर्भात त्याकाळी विख्यात कीर्तनकार म्हणून गाजले आणि क्षीरसागर या आडनावाने ओळखले न जाता 'गोविंद महाराज टाकळीकर' या नावाने प्रसिद्धीस पावले. पूर्वीच्या काळी वाहनांची सुविधा नसूनसुद्धा गोविंद महाराजांची दूरदूरच्या ठिकाणी कीर्तने होत असत. त्यांना 'लोकप्रिय कीर्तनकार' असे संबोधणे वावगे होणार नाही. शेगाव येथेही त्यांचे कीर्तन होत असे. मोट्यांच्या शिवमंदिरात हा कीर्तनाचा कार्यक्रम होत असे. मोटे यांची गोविंद बुवांवर चांगलीच भक्ती होती. गोविंदबुवा समर्थांच्या कृपेस प्राप्त असलेली व्यक्ती होते. त्यांच्या जीवनातील गजानन महाराज भेटीचा प्रसंग त्यांच्या आयुष्यासाठीसुद्धा अतिमहत्त्वाचा होता, हे खरे. 
बार्शीटाकळी येथे विद्रुपा नदीकाठी असलेल्या खोलेश्वर मंदिराच्या परिसरात गोविंदबुवांची समाधी आहे. या खोलेश्वर मंदिराला प्राचीन इतिहास आहे. या शिवमंदिराची खोली नदीच्या पात्रापेक्षासुद्धा थोडी जास्त खोल आहे. मंदिरातील शिवलिंगाच्या खाली पाण्याचा जिवंत झरा असून त्यातून सतत पाणी येत असते. अशा खोलेश्वराच्या शेजारी टाकळीकरांची समाधी बांधलेली आहे. हे स्थान अकोल्यापासून मंगळूरूपीर रोडवर अठरा किलोमीटर अंतरावर आहे.
गोविंदबुवा टाकळीकर आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.