श्री गजानन महाराज भक्तांची मांदियाळी - पुष्प अठ्ठेचाळीसावे - विनायकराव आसिरकर

शेगांव (वि.प्र.) - श्री गजानन महाराजांनी यादवराव सुभेदारांना ज्यांच्या घरी जाऊन दर्शन देऊन कृपा केली ते म्हणजे विनायकराव आसिरकर. विनायकरावांच्या सुनबाई मंगलाताई दत्तात्रय आसिरकर यादेखील महाराजांना खूप मानतात. त्या आसिरकर घराण्याची वंशावळ देखील या लेखासोबत फोटोत देत आहे. 
विनायकराव मोरेश्वर आसिरकर यांचे वास्तव्य वर्ध्याला मालगुजारीपुरा या ठिकाणी होते. एकदा काही कामानिमित्त यादवराव सुभेदार हे वर्ध्याला गेले. ते विनायकराव आसीरकर यांच्या घरी उतरले.
त्या ठिकाणी एक भिकारी भिक्षा मागायला आला. त्याचा पोशाख मराठी माणसासारखाच होता. हातात एक मोठी काठी आणि डोक्यावर बनातीची मळकट अशी टोपी होती. त्याचे शरीर कंपवायुने वरचेवर थरथर कापत होते. यावरून त्याचे वय बरेच होते, याची खात्री पटते. त्या भिकाऱ्याचा असा अवतार पाहून व तो एकदम आत येऊन ओसरीच्या पायऱ्या चढायला लागलेला पाहून विनायकराव आसिरकर पार भडकले.
"अरे! ओसरीची पायरी चढू नकोस. आला तसाच, मागल्या दारी परत जा! तिकडे तुला भिक्षा मिळेल यावेळी येथे थांबू नकोस!" , असे विनायकराव आसिरकर त्या भिकाऱ्याला म्हणाले.
विनायकराव आसिरकर यांनी त्या आत येणाऱ्या भिकाऱ्याला चांगलेच दरडावले पण तो काही एक ऐकण्याचा मनस्थितीत नव्हता किंवा त्याला ऐकायचे नव्हते. सहसा असे झाल्यावर भिकारी थांबणे कठीणच. पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही भिकाऱ्याची एकदम घरात शिरण्याची हिंमत होत नाही. पण हा भिकारी काही एक विचार न करता घरात शिरून ओसरीची पायरी चढताना घरमालकाने दटावल्यावर देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ओसरीत जेथे यादव गणेश सुभेदार बसलेले होते त्यांच्याजवळ जाऊन बसला. ही घटना आश्चर्यजनक आहे. एकतर यादवराव हे फार मोठे व्यक्तिमत्व व त्यात देशस्थ विद्वान ब्राह्मण. दुसरे असे की, हा प्रसंग ज्यांच्या घरी घडला आहे तो देखील प्रचंड पंडित्य असलेली ब्राह्मण व्यक्ती व अशा ब्राह्मणाच्या घरात काही एक विचार न करता हा भिकारी शिरतो व एका मोठ्या व्यक्ती सन्निध जावून बसतो हे एकंदर आश्चर्यच आहे. साधारण भिकाऱ्याचे हे काम नाही.
यादवराव मनात विचार करतात की, हा भिकारी तर फारच लोचट दिसतो. नको म्हणत असता येथे येऊन बसला. यादवराव सुभेदार त्याला न्याहाळून पाहतात तर तो शेगावचा राजयोगी असावा असा भास झाला. त्याच्या दृष्टीस अत्यंत तेज होते. बोलण्याची तऱ्हा व स्वर महाराजांसारखाच होता. फक्त फरक एवढाच की, त्याच्या शरीराला कंप होता. एकंदर त्याच्या चेहऱ्यावरचे तेज, भावमुद्रा व बोलणे बिलकुल महाराजांसारखेच होते. हे सर्व पाहून यादवराव घोटाळे व विचार करू लागले की,"यास जर गजानन मानले तर ते समाधीस्थ होऊन बरीच वर्षे झाली. आता आमच्या दृष्टीस ते कसे बरे पडतील? काही असो या भिकाऱ्यास गजानन महाराज समजून कसलाही उहापोह न करता दोन पैसे देऊन टाकावेत."
वास्तविक पाहता यादवरावांसारख्या भक्तासाठी महाराजांना वर्ध्याला आसिरकरांच्या घरी जावे लागले. महाराज आपल्या भक्ताला कसे सांभाळतात याचे हे उत्तम उदाहरण. मी तुझा आराध्यच आहे ही जाणीवही ते भक्ताला करून देतात. आपला भक्त चिंतेत आहे, त्याला यातून सोडवण्यासाठी त्याचेवर कृपा करावी लागली. यावरून महाराज कृपाळू व भक्तांना सांभाळणारे आहेत परंतु त्याच योग्यतेचे भक्त सुद्धा असावे लागतात हे सिद्ध होते.
यादवराव सुभेदारांच्या निमित्याने श्री गजानन महाराज यांची पदकमले विनायकराव आसिरकर यांच्या घराला लागली. त्यार्थी आसिरकर हे देखील त्याच योग्यतेचे महाराजांचे भक्त होते हे कळून येते.
श्री विनायकराव आसिरकर आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्त मंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.





Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.