मुंबई (जगदीश काशिकर) - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चुलत भगिनी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले आहे की यंदाही पवार कुटुंबाची दिवाळी एकत्रच होणार आहे. राजकीय संबंधात कितीही वितुष्ट आले असले तरी कौटुंबिक संबंधात काहीही फरक पडणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी केलेले हे विधान त्यांची राजकीय परिपक्वता दाखवणारे आहे यात शंकाच नाही. सुप्रियाताईंनी राजकारणापलीकडे जाऊन संबंध जपता येतात हे इथे अधोरेखित केले आहे. विशेषतः आज महाराष्ट्रात राजकीय संबंध ताणले की व्यक्तिगत संबंधातही कसे ताणतणाव निर्माण होतात याची अनेक उदाहरणे बघायला मिळतात.
या पार्श्वभूमीवर सुप्रियाताईंच्या या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
आज महाराष्ट्रात अनेकांचे राजकीय संबंध आणि त्यामुळे व्यक्तिगत संबंधही असेच ताणले गेलेले दिसतात. मात्र इतिहासात डोकावल्यास राजकीय संबंध आणि व्यक्तिगत संबंध यातली सीमारेषा निश्चित ओळखून जपलीही जात होती. याची अनेक उदाहरणे सांगता येतील. अगदी ताजे उदाहरण सांगायचे झाल्यास सुमारे सतरा अठरा वर्षांपूर्वी म्हणजे २००६ साली ज्यावेळी भाजप नेते प्रमोद महाजन हे सख्या भावाने झाडलेल्या गोळ्यांमुळे हिंदुजा हॉस्पिटलमध्ये मृत्यूची झुंज देत होते, त्यावेळी त्यांना भेटायला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख पोहोचले. हॉस्पिटलमध्ये प्रमोदजींचे शालक गोपीनाथजी मुंडे उपस्थित होते. त्यावेळी विलासराव काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि गोपीनाथजी भाजपचे पक्षनेते, त्यामुळे त्या दोघांचीही विधिमंडळात किंवा बाहेर रस्त्यावरही कशी तू तू मै मैं चालायची हे माध्यमांनी आणि जनसामान्यांनीही अनुभवले होतेच. मात्र विलासराव हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचले आणि त्यांनी गोपीनाथजींच्या खांद्यावर हात ठेवला. त्यावेळी गोपीनाथजी विलासरावांना मिठी मारून ढसाढसा रडले. त्यावेळी विलासराव राजकीय विरोध विसरून गोपीनाथजींना धीर देत होते.हे दृश्य वृत्तवाहिन्यांनी संपूर्ण देशात दाखवले होते. इथे हे दोघेही नेते आपले राजकीय भांडण विसरले होते, आणि व्यक्तिगत मैत्री हीच त्यांनी डोळ्यासमोर ठेवली होती.
असे अजूनही काही किस्से सांगता येतील. जुन्या पिढीतील कडवे कम्युनिस्ट नेते भाई ए बी बर्धन हे बरीच वर्ष नागपुरात होते. त्या काळात भारतीय जनता पक्षाचे मूळ रूप असलेल्या जनसंघाच्या घणाघाती नेत्या म्हणून सुमतीबाई सुकळीकर ओळखल्या जायच्या.
सुमतीबाई आणि भाई बर्धन हे दोघेही व्यासपीठावरून एकमेकांचे वस्त्रहरण करण्याचे काम करायचे. मात्र प्रत्यक्ष आयुष्यात ताई सुकळीकरांनी बर्धन यांना भाऊ मानले होते आणि बर्धन यांनीही ते नाते अखेरपर्यंत जपले. बर्धन आपल्या राजकीय व्यापात व्यस्त असतात आणि त्यांना मुलीसाठी स्थळे बघायला वेळ होत नाही म्हणून सौभाग्यवती बर्धन यांनी ताई सुकळीकरांकडे तक्रार केली होती. आणि हे कळताच आधी बर्धन यांची कान उघडणी करणे आणि मग बर्धन यांच्या कन्यासाठी स्थळे बघणे हे काम त्यांनी सुरू केले, आणि त्या कन्येचे लग्न लावूनच ताई सुकळीकर थांबल्या होत्या. ही माहिती आजही जुन्या पिढीतले पत्रकार आणि राजकारणी देतात.
बर्धन ज्यावेळी नागपूर सोडून दिल्लीला स्थलांतरित झाले, त्यावेळी त्यांनी ताईंच्या घरी जाऊन त्यांचा निरोप घेतला होता. नंतर जेव्हा जेव्हा बर्धन नागपूरला यायचे तेव्हा ताईंच्या घरी आवर्जून जायचे आणि रक्षाबंधनाचे दिवस असले तर आवर्जून ताईंकडून राखी बांधून घ्यायचे. एकदा एका पत्रकाराने त्यांना याबाबत छेडले असता ती माझी बहीण आहे, बहिणीकडे जाण्यात कसले राजकारण आले असे वर्धन यांनी सुनावले होते..
भाजप नेते नितीन गडकरी यांनीही असे राजकारणापलीकडले मैत्र कायम जपले आहे. ज्यावेळी गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडले गेले, त्यावेळी भाजप कार्यालयातून ते सरळ कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात गेले होते. त्या ठिकाणी वयोवृद्ध नेते भाई बर्धन यांना भेटून त्यांचे आशीर्वादही घेतले होते.
नितीन गडकरी आणि शरद पवार यांची मैत्रीही अशीच जगजाहीर आहे दोघेही कायम विरोधी पक्षात राहिले मात्र दोघांनीही आपले मैत्र आज पर्यंत जपले आहे. काही वर्षांपूर्वी गडकरींनी सहकारी तत्त्वावर उभा केलेला पूर्ती उद्योगसमूह प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला होता. त्यावेळी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार होते. गडकरी पवारांकडे गेले आणि पूर्ती समूहाची अडचण सांगितली. त्यावेळी पुर्तीवरील कर्जासाठी आपण आपली व्यक्तिगत मालमत्ताही तारण म्हणून ठेवली आहे, ही माहितीही गडकरींनी पवारांना दिली. हे कळताच पवार गडकरींना चांगलेच रागवले. नितीन राजकारणात आणि समाजकारणात अशी व्यक्तिगत मालमत्ता तारण ठेवणे चुकीचे आहे.
आज केली पण भविष्यात अशी चूक करू नको, असा दम भरून कृषी मंत्रालयात अडकलेले काही पूर्तीचे ऑर्डर्स पवारांनी तातडीने रिलीज करायला सांगितले आणि पुर्तीला संकटातून बाहेर काढले होते. हा किस्सा गडकरींचे तत्कालीन खाजगी सचिव सुधीर दिवे यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितला होता.
विधिमंडळाचे अधिवेशन चालू असते तेव्हा नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या विदर्भ एक्सप्रेस ला आमदारांसाठी एक विशेष कोच लागतो. या कोच मधून एखाद्यावेळी प्रवास करावा. विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे जे आमदार परस्परांचे अक्षरशः कपडे फाडत असतात, तेच आमदार रात्री घरी जाताना एकत्र बसून सहभोजन करतात. काही शौकीन आमदार रात्रभर पत्तेही खेळतात. ज्यांनी या कोचमधून नियमित प्रवास केला आहे ते असे अनेक किस्से सांगतील.
तर असे आहेत हे राजकीय मंडळींचे राजकारणापलीकडले स्नेहबंध. आज महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत गढूळ झाले आहे. सख्खे चुलत भाऊ, सख्खे काका पुतणे, सख्खे चुलत बहीण भाऊ परस्पर विरोधात उभे ठाकले आहेत. अशावेळी असे राजकारणापलीकडले स्नेहबंध जपले जाणे अत्यंत गरजेचे आहे. असे संबंध जपले गेले तरच विकासाचे राजकारण करता येईल. अन्यथा अराजक निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.