चंद्रपूरच्या ‘फ्लाईंग क्लब’साठी ना. सुधीर मुनगंटीवार यांचा दिल्लीत पाठपुरावा .!

ऐरो क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजीवप्रताप रुडी यांच्यासोबत चर्चा .. 2 विमानांची लीज वाढवून देण्यासंदर्भात मुंबई येथे लवकरच बैठक .!

चंद्रपूर (वि.प्र.) : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या चंद्रपूरच्या ‘फ्लाईंग क्लब’ने आता उड्डाण घेतले आहे. नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी ना. श्री. मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करण्यात येत आहे. त्यासाठी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार दिल्लीमध्ये पाठपुरावा करत आहेत. महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन लवकरच या प्रकल्पाला गती मिळण्यासाठी त्यांनी पाऊल टाकले आहे.
पहिल्या टप्प्यात 10 प्रशिक्षणार्थ्यांना येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ऑक्टोबर 2023 रोजी नागपूर फ्लाईंग क्लबच्या ‘सेस्ना – 172 आर’ या चार आसनी विमानाचे मोरवा विमातनळावर प्रात्यक्षिकसुध्दा घेण्यात आले. तसेच मोरवा येथे धावपट्टी, संरक्षण भिंत व इतर अनुषंगीक कामेसुध्दा करण्यात आली आहे. आता अंतिम टप्प्यात असलेल्या फ्लाईंग क्लबच्या कामाला गती मिळावी, तसेच लवकरात लवकर येथे वैमानिकाचे प्रशिक्षण सुरू व्हावे, यासाठी ना. मुनगंटीवार यांनी नुकतीच दिल्ली येथे ऐरो क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय उड्डाण मंत्री राजीव प्रताप रुडी यांच्याशी चर्चा केली.
डीजीसीने काढलेल्या तांत्रिक मुद्द्यांची तातडीने पूर्तता करण्यासंदर्भात तसेच एरो क्लब ऑफ इंडिया यांनी नागपूर फ्लाईंग क्लबला लीजने दिलेल्या 2 विमानाची लीज वाढवून देण्यासंदर्भात राजीव प्रताप रुडी यांच्यासोबत मुंबई येथे बैठक घेण्यात येणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याला वैमानिक होण्यासाठी 200 तास फ्लाईंग अवर्स पूर्ण करणे आवश्यक आहेत. मात्र नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे मोठ्या संख्येने होत असलेल्या विमानांच्या आवागमनामुळे वैमानिक प्रशिक्षणासाठी फ्लाईंग अवर्स पूर्ण होण्यास विलंब होतो. त्यामुळे नागपूर येथील फ्लाईंग क्लबसाठी पर्यायी ऑपरेशनल बेस म्हणून वेगळ्या धावपट्टीची गरज आहे. याबाबत चंद्रपूरातील मोरवा विमानतळाचा पर्याय शोधण्यात आला असून विद्यार्थ्यांना वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक बाबींची मोरवा येथे  पूर्तता करण्यात येत आहे. 
याच अनुषंगाने ऑक्टोबर 2023 मध्ये मोरवा विमानतळ येथे विमानाची प्राथमिक चाचणी करण्यात आली होती. फ्लाईंग क्लब संदर्भात अनुषंगिक कामांच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 10 जानेवारी 2024 रोजी मुंबई येथे बैठक घेतली होती. मोरवा विमानतळावर ज्या तांत्रिक बाबींची पूर्तता अद्याप बाकी आहे, त्या अनुषंगाने महाराष्ट्र विमान प्राधिकरण, विभागीय आयुक्तालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद या यंत्रणांनी त्यांना सोपविलेली कामे वेळेत मार्गी लावावीत. 
भारतीय विमान प्राधिकरणाची ज्या बाबींना परवानगी आवश्यक आहे, ती मिळण्याबाबत तात्काळ पाठपुरावा करावा. तांत्रिक मान्यतेच्या अनुषंगाने ज्या बाबींची पूर्तता करण्याबाबत भारतीय विमान प्राधिकरणाने कळविले आहे, त्या बाबी पूर्ण कराव्यात, अशा सुचना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या.

मुल येथे सुरू करावे पॉलिटेक्निक कॉलेज! .. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे मागणी .. .. अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा ..!

मुल :  मुल तालुक्यात खाणकाम व्यवसायावर आधारित उद्योग व्यवसाय सुरू होत आहेत. त्यामुळे उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे आणि स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात बुधवारी (ता. २७) मुंबई येथे मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण सहसचिव संतोष खोरगडे यांच्यासोबत बैठक घेऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच उच्च व तंत्रशिक्षण प्रधान सचिव यांच्याशी ना. श्री. मुनगंटीवार यांनी फोनवर सकारात्मक चर्चा केली. 
चंद्रपूर जिल्हात ठिकठिकाणी खाणीचे उत्खनन सुरू असल्याने या जिल्ह्याला औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख प्राप्त आहे. मुल तालुक्यामध्ये खाणकाम व्यवसाय व त्यावर आधारित उद्योग सुरू होत आहेत. त्यामुळे या उद्योगांना कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात गरज भासू लागली आहे. परंतू या ठिकाणी उच्च तांत्रिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे उद्योगांना स्थानिक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. उच्च व तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी तालुक्यातील युवकांना इतर शहरांमध्ये जावे लागते. त्यामुळे या विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी गैरसोय होत आहे. परिणामी स्थानिक विकासावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उद्योगासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता तसेच स्थानिक युवकांना तांत्रिक शिक्षण मिळून रोजगार उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने मुल येथे एक शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याबाबत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना केली आहे.
यासंदर्भात ना.श्री. मुनगंटीवार यांच्यासोबत फोनवर झालेल्या चर्चेला चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. तसेच प्रशासनाला पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे लवकरच मुल येथील पॉलिटेक्निक कॉलेजचा मार्ग मोकळा होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.