बल्लारपुर (का. प्र.) : विकासासाठी अग्रेसर असणारे आणि नाविण्यपूर्ण योजना जिल्हयात आणून आपला ठसा उमटविणारे राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मूल शहराकरीता एक नवी घोषणा केली आहे. मूलच्या शैक्षणिक वैभवात भर टाकण्याकरीता नवे पॉलीटेक्नीक कॉलेज सुरू करण्यांचा त्यांनी संकल्प केल्याने, मूल शहर शैक्षणिकदृष्ट्या प्रगत होणार आहे.
नाम. सुधीर मुनगंटीवार यांचा नुकताच एक व्हिडीओ प्रसारीत केला आहे. आपल्या शैक्षणिक कार्यातील योगदान सांगताना ते म्हणतात, मी प्राध्यापक झालो नाही, मात्र गोंडवाना विद्यापिठाची निर्मीती केली, नागपूर विद्यापिठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नांव तर अमरावती विद्यापिठाला वैराग्यमुर्ती गाडगे महाराज यांचे नांव देण्यास सरकारला बाध्य केले. पुणे विद्यापिठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापिठ असे नामकरण करवून घेतले तर, चंद्रपूर जिल्हयातील 1500 शाळांना इ—लर्नींग देण्यांचा निर्णय घेतला. 500 कोटी रूपयाचे एसएनडीटी विद्यापिठाचे उपकेंद्र चंद्रपूर जिल्हयात सुरू करण्यांचे भाग्य मला लाभले. 263 कोटी रूपये टाटा ट्रस्ट कडून चंद्रपूरच्या शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या विकासासाठी उपलब्ध करून दिले. मूल येथे कृषी महाविद्यालय आणले असे सांगत त्यांनी भविष्यात मूल शहरात पॉलीटेक्नीक कॉलेज आणणार आहे. आपण जेथे हात टाकतो, ते काम आपण पूर्ण करतो हे सांगत, मूल शहरात नवे पॉलीटेक्नीक कॉलेजची निर्मीती होणार याची खात्री दिली आहे.
शैक्षणिक वातावरण नसलेल्या मूल शहरात कृषी महाविद्यालय सुरू झाल्यांने, मूलच्या शैक्षणिक विकासात चांगलाच बदल घडून आला. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे पॉलीटेक्नीक कॉलेजचे स्वप्न पूर्ण झाल्यास, मूल शहर शैक्षणिक विकासात आणखी अग्रेसर ठरणार आहे.