धनोजे कुणबी समाजातर्फे कृषी महोत्सव व सरपंच मेळाव्याचे आयोजन .!
चंद्रपूर (वि.प्र.) : मातीची सेवा करणारा धनोजे कुणबी समाज आहे. हा समाज सदैव शेतकऱ्यांसाठी कार्य करत असतो. आता शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचविण्याची आवश्यकता आहे. मी महाराष्ट्राच्या जाहीरनामा समितीचा अध्यक्ष झालो, तेंव्हा त्यात ‘मिशन जय किसान’चा समावेश केला. शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल होणार नाही, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील रयतेचं राज्य प्रस्थापित होऊ शकत नाही. कारण शेतकऱ्यांच्या समृद्धीमध्येच देशाच्या प्रगतीचा मार्ग आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
धनोजे कुणबी समाज मध्यवर्ती समिती, पुरस्कृत धनोजे कुणबी समाज मंदिर, लक्ष्मीनगर, चंद्रपूर द्वारा आयोजित भव्य कृषी महोत्सव सोबतच सरपंच मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित या कार्यक्रमाला आमदार देवराव भोंगळे,आमदार करण देवतळे, धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम सातपुते, सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र कराळे, कृषी महोत्सव समितीचे प्रमुख श्रीधर मालेकर, भाजप महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, मनोहरराव पाऊणकर, विनोद पिंपळशेंडे, संदीप वायाळ, नरेंद्र जिवतोडे, देवानंद वाढई, प्रदीप महाकुलकर, नंदकिशोर वाढई, सुरेश ठिकरे, देवाभाऊ पाचभाई, अनिल डहाके तसेच समाजातील सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे देखणे आयोजन केल्याबद्दल श्री. सातपुते व त्यांच्या चमूचे कौतुक आ. श्री. मुनगंटीवार यांनी केले.
शेतीचे सरासरी क्षेत्र कमी होणे चिंतेची बाब आहे. १९७०-७१ मध्ये ४९ लक्ष ५१ हजार शेतकरी होते. आज १ कोटी ५२ लक्ष ८५ हजार शेतकरी आहेत. शेती क्षेत्र तेवढेच आहे, शेतकऱ्यांची संख्या वाढली. पूर्वी ४.२१ हेक्टर सरासरी जमीन होती, आता १.३१ हेक्टर आहे. आता शेतीचे तंत्रज्ञान बदलले नाही, तर शेतीचे मोठे नुकसान होईल. उत्पन्न वाढणे गरजेचे आहे. यासाठी जाहीरनाम्यात अनेक गोष्टी सुचवल्या होत्या. आता मिशन जय किसान पुढे न्यायचे आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी विधानसभेत लढत राहणार आहे. कर्जमुक्तीचा विषय असो किंवा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्याची योजना असो, प्रत्येक बाबतीत पाठपुरावा करणार आहे, असा शब्दही आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिला.
सरकारी मदत नसताना आपल्या समाजाला संघटित करत, शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी भव्य कृषी महोत्सव आयोजित करण्याच्या धनोजे कुणबी समाजाच्या कार्याला शुभेच्छा देणे माझे कर्तव्य होते. हे कर्तव्य पूर्ण करण्यासाठीच मी इथे आलोय, असे सांगत भविष्यात कुठलीही मदत लागली तर मी समाजाच्या पाठिशी आहे, असा विश्वास श्री. मुनगंटीवार यांनी दिला.
सरपंच हा गावाचा मुख्यमंत्रीच :
सरपंच मेळाव्यासारख्या कार्यक्रमांतून संवाद होतो, चर्चा होते आणि त्यातून समाधानाकडे जाता येते. चौदा कोटी लोकसंख्येत २७ हजाराच्या आसपास सरपंच असतात. त्यामुळे सरपंच हा गावाचा मुख्यमंत्रीच असतो. पण पदाचा किती आणि कसा उपयोग करायचा, हे आपल्यालाच ठरवायचे असते. सरपंच पद किती कालावधीचे आहे, हे महत्त्वाचे नाही. आपल्या कामाला आपण किती न्याय देतो हे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
सौभाग्यशाली जिल्हा :
आपला जिल्हा तर तसाही सौभाग्यशाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गावाला आता पैशांची कमतरता नाही. प्रत्येक ग्रामपंचायतीला वाचनालय मिळाले आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये ई-लर्निंगची सोय केली. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून गावांपर्यंत शाळा पाठवली, याचाही त्यांनी उल्लेख केला. संरपंचांना आपलं मत नोंदविण्याची सोय केली पाहिजे. एखाद्या सरपंचाने चांगले काम केले असेल तर त्याचा सत्कार व्हायला हवा. त्यादृष्टीने सरपंच संमेलनात नियोजन करायला हवे, अशी सूचना आ. श्री. मुनगंटीवार यांनी केली.
सरपंचांच्या मानधनात वाढीसाठी पुढाकार :
मी अर्थमंत्री असताना सरपंचांचे एक शिष्टमंडळ भेटायला आले होते. सरपंचांच्या मानधनात वाढ व्हावी अशी मागणी त्यांनी केली होती. मी त्याची दखल घेत दोनशे कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. त्यानंतर वाढ होण्याच्या दृष्टीकोनातून निर्णय करण्यात आला. पुढेही सरपंचांना योग्य सन्मान मिळेल आणि कार्याची गती वाढावी यासाठी कायदे केले जातील, असा विश्वासही आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिला.