भद्रावतीत दिनांक 16 मार्चला आठवे स्मृतिगंध काव्यसंमेलन .!

ज्येष्ठ समीक्षक दा.गो.काळे यांची अध्यक्षता आमदार करण देवतळे करतील उद्घाटन .. स्व. विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठानचे आयोजन .!

भद्रावती (वि.प्र.) : स्व. विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठान भद्रावतीच्या वतीने स्थानीक श्री मुरलीधर पाटील गुंडावार सभागृह येथे रविवार दिनांक 16 मार्च 2025 ला आठवे स्मृतिगंध काव्यसंमेलन संपन्न होत आहे. नवोदीत व प्रथितयश काव्यप्रतिभेचा सन्मान आणि मराठी काव्य रसिकांच्या आस्वादकतेस प्रोत्साहन देण्यासाठी ह्या संमेलनाचे प्रयोजन आहे. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व प्रख्यात समीक्षक दा. गो. काळे, शेगाव (बुलडाणा), यांच्या अध्यक्षतेखाली मा. आमदार करण देवतळे वरोरा, यांच्या शुभहस्ते या नियोजीत संमेलनाचे उद्घाटन सकाळी ठिक 10.30 वा. संपन्न होत आहे. यावेळी प्रमूख अतिथी म्हणून ज्येष्ठ सहित्यिक आचार्य ना.गो.थुटे वरोरा, डॉ. बळवंत भोयर ज्येष्ठ साहित्यिक नागपूर, श्रीपाद जोशी ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रपूर, डॉ. विशाखा कांबळे प्रख्यात कवयित्री नागपूर, ज्येष्ठ सामाजिक कार्येकर्ते प्रा. धनराज आस्वले भद्रावती, अनिल धानोरकर माजी नगराध्यक्ष भद्रावती, ईत्यादी मान्यवरांची उपस्थिती राहील. या सत्राचे सूत्रसंचालन सौ केशनी ज्ञानेश हटवार या करणार आहेत.
मनातील भावाशय अर्थवाही व उचित शब्दांची योजना करीत सौंदर्यपुर्ण आणि घाटदार रितीने व्यक्त करणाऱ्या काव्यप्रतिभेला प्रस्तूत काव्य संमेलन समर्पित असून, कवी आणि काव्य रसिकांसाठी हे संमेलन आनंदपर्वणीच असते. या एकदिवसीय काव्यसंमेलनात दोन कविसंमेलने व एका गझल मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. भरगच्च चार सत्रांमध्ये होत असलेल्या या साहित्यसोहळ्यात वाङ्मयीन चिंतनासोबतच काव्यामृताचे रसग्रहन होणार आहे. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात संमेलनाध्यक्ष दा. गो. काळे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रीत कवींचे बहारदार कविसंमेलन संपन्न होत आहे. या प्रसंगी नामवंत कवी डॉ. बळवंत भोयर नागपूर, आचार्य ना. गो. थुटे वरोरा, डॉ. विशाखा कांबळे नागपूर, पुनीत मातकर गडचिरोली, इरफान शेख चद्रपूर, डॉ. किशोर कवठे राजुरा, या मान्यवरांची प्रमुख उपस्थिीती राहणार आहे. विदर्भातील प्रतिभाशाली कवी या संमेलनाला उपस्थित राहणार असून, मराठी काव्यरसिकांना ही एक मोठी पर्वणीच असणार आहे. तिसऱ्या सत्रात, प्रख्यात गझलकार रामकृष्ण रोगे नांदाफाटा, यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रीत कवींची गझल मैफिल सजणार आहे. या मैफिलीमध्ये प्रतिथयश गझलकार जयवंत वानखेडे कोरपना, सुरेश शेंडे गडचिरोली, प्रवीण तुराणकर राजुरा, गौतम राऊत ब्रम्हपूरी, मंगेश जनबंधू ब्रम्हपूरी यांची उपस्थिती राहणार आहे. या निमित्ताने बहारदार गझलांचा आस्वाद गझल रसिकांना घेता येणार आहे. संमेलनाच्या चौथ्या सत्रात ज्येष्ठ कवी बी. सी. नगराळे चंद्रपूर, यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय कवी संमेलन संपन्न होत आहे. या कविसंमेलनात देखील प्रतिथयश कवींची कविता व नवोदीत काव्यप्रतिभेची जुगलबंदी काव्यरसिकांना अनुभवता येणार आहे. या प्रसंगी प्रख्यात कवी पंडित लोंढे वरोरा, तनुजा बोढाले चंद्रपूर, संगिता धोटे राजुरा, भारती लखमापूरे वरोरा, शंकरराणा वाणी भद्रावती, विवेक महाकाळकर भद्रावती हे मान्यवर कवी मंचावर उपस्थित असतील.
स्मृतिगंध काव्यसंमेलनाचे सदर आयोजन हे विदर्भस्तरीय असून, विदर्भातील प्रख्यात साहित्यिक व कवींचा मेळा या निमित्ताने भद्रावती नगरीमध्ये भरणार आहे. मायबोली मराठी व मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या काव्यरसिकांनी तसेच नवोदितांनी या काव्यसंमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्मृतिगंध काव्य संमेलनाचे संयोजक प्रवीण आडेकर यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".