बल्लारपूर (का.प्र.) : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरात मंजूर करण्यात आलेल्या बस आगाराच्या कामाला गती मिळाली आहे. आज, सोमवार ७ जुलै २०२५ रोजी विधानभवन, मुंबई येथे परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला आमदार आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुल शहरातील मंजूर कामाला गती देण्यासाठी विधानभवन मुंबई येथे आयोजित बैठकीस डॉ.माधव कुशेकर (उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक),श्री.दिनेश महाजन (जनरल मॅनेजर बांधकाम),श्री.नितीन मैंद (व्यवस्थापक वाहतूक) आदिंची उपस्थिती होती.
बैठकीत मुल बस आगारासंबंधी रखडलेली कामे, जागेची अंमलबजावणी, कार्यान्वयनातील अडथळे आणि विभागीय समन्वय या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुल बस आगाराचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी सबंधित विभागाला आदेश परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी दिले.
मुल तालुक्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून, आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे रखडलेल्या आगार प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळणार आहे. बल्लारपूर विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी आ. मुनगंटीवार सातत्याने प्रयत्नशील आहेत, हे विशेष.