एजी पंपासाठी डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ लाभ मिळावा - आ.सुधीर मुनगंटीवार

सौर ऊर्जा वापरणाऱ्या नागरिकांवर अन्याय होऊ नये; ऊर्जा विभागाने स्पष्ट भूमिका घ्यावी .. चंद्रपूरच्या 800 मेगावॉट क्षमतेच्या पावर प्रोजेक्टला गती द्या ..! 

बल्लारपुर (का.प्र.) : ऊर्जा विभागाने सौर ऊर्जा प्रणाली बसविल्यानंतर २४ तास नेट मीटरिंगची सुविधा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी केली होती. मात्र आता सरकार केवळ दिवसा निर्माण होणाऱ्या विजेसाठीच नेट मीटरिंग मर्यादित करण्याचा विचार करत आहे. रात्रीच्या वेळेस ही सुविधा लागू न करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे सौर प्रणाली बसवलेल्या नागरिकांचा अपेक्षा भंग होऊन त्यांची प्रत्यक्षात फसवणूक होईल, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे ऊर्जा विभागाने यासंदर्भातील अस्पष्टता तात्काळ दूर करावी आणि आपली स्पष्ट भूमिका या सभागृहात मांडावी, अशी ठाम मागणी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी (दि. ७ जुलै) विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान केली.
ते पुढे म्हणाले, एजी पंपाच्या संदर्भात अर्धा तास सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांकडून याबाबत दूरध्वनीद्वारे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ज्यांनी एजी पंपासाठी डिमांड भरली आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना तात्काळ एजी पंप देण्यात यावेत, यासाठी संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

चंद्रपूरच्या पॉवर प्रोजेक्टला गती द्या :

चंद्रपूरमध्ये 800 मेगावॅट क्षमतेच्या नवीन वीज संच सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने करण्यात येत आहे, मात्र या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अपेक्षित गती दिसून येत नाही. हा प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्याच्या ऊर्जा निर्मितीतील महत्त्वाचा टप्पा ठरेल. त्यामुळे ऊर्जामंत्री व ऊर्जा राज्यमंत्र्यांना विनंती आहे की, चंद्रपूरच्या 800 मेगावॅट वीज प्रकल्पाला तातडीने वेग देण्यासाठी आवश्यक ती ठोस पावले उचलावीत. अशी मागणी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".