"एक चेहरा हैं, जो आँखो में बसा रहता हैं,.. एक तसब्बुर हैं, जो तन्हा होने नहीं देता!" आपल्या जीवनात असंख्य असे क्षण येतात की ते मनाच्या पटलावर कधीच पुसट होत नाहीत तसेच अशा ही व्यक्ती आपल्या जीवनात येतात की आपण त्यांना कधीच विसरू शकत नाही. त्या व्यक्तींच्या सोबत घालवलेले क्षण , त्यांनी आपल्याला दिलेला आनंद हा कधीच क्षणभंगुर नसतो.धकाधकीच्या जीवनात कधी त्यांची आठवण राहत नाही, पण जेव्हा कधी त्यांची नावे ऐकण्यात येतात तेव्हा त्या नावासोबत त्या व्यक्तीचे दिसणे, वागणे, स्वभाव आणि त्यांच्या सोबत घालवलेले असे अनेक क्षण आठवतात आणि मनाला सुखद करून जातात .जर त्या व्यक्ती आपल्याला लहानपणीशी निगडीत असतील तर त्यांना विसरणे शक्य होत नाही.लहानपणी त्या व्यक्तीचा ठसा आपल्या मनावर असा काही उमटतो की तो कधीच पुसट होत नाही मग ती आपली नातेवाईक,मित्र-मैत्रिणी, शेजारीपाजारी नसले तरी ते सतत मनात असतात. कोणतेच नाते नसलेल्या या अगदी जवळच्या वाटणाऱ्या व्यक्ती मुळेच आज आपणही भूतकाळ आठवणी ठेवतो. "कालिदास मामा" मी वसमत ला असताना जवळपास 60 ते 65 वयाच्या जोडपे राहत होते त्यांचे घर ब्राह्मण गल्लीतील एकदम कोपऱ्यात. त्यांचे नाव "कालिदास मामा" स्वभावाने गमतीदार त्यांच्या हालचाली वागणे पाहून प्रथमदर्शी ते वेडे वाटायचे, पण जसे जसे त्यांच्या संपर्कात आले तसे तसे त्यांच्या स्वभावाचा उलगडा झाला. त्यांना मूलबाळ नसल्यामुळे त्यांनी स्वतःला लहान मुलासारखे बनविले होते.इतर लहान मुलांना मुद्दाम छेडणे,हसविणे हे त्यांचे काम, पण त्यांच्याशी निगडित असलेली एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ते म्हणजे प्रत्येकाला गल्लीत आले की ते कोणाकडे आले कोणाशी बोलत आहेत या सर्वांकडे नजर ठेवणार . मला याआधी ते खूप विचित्र वाटले पण नंतर लक्षात आले की जसे घरच्या मोठ्या व्यक्ती घरातल्या प्रत्येकाची काळजी करतो तसेच ते कालिदास मामा कोणाच्या घरी कोण जात आहे ( नवीन माणूस ) याची काळजी करतात. आज ते त्या ठिकाणी राहात नाहीत, पण आजही गल्लीत प्रवेश केला की त्यांची आठवण प्रकर्षाने होते. मनात वाटायचे खरच त्यांच्यामुळे आपण किती बिनधास्त राहत होतो. "बाबू" आमच्या मागच्या गल्लीत राहयचे. माझ्या सासऱ्यांचे मित्र परिस्थितीमुळे गरीब आणि एकटे पडलेले. सर्वजण त्यांना वेडे म्हणायचे. आमच्याकडे रोज जेवायला यायचे.फाटके, मळके कपडे, केस वाढलेले, दाढी वाढलेली. मिळेल ते खायचे पण एकही शब्द न बोलता कोणी कितीही बोलले तरी फक्त हसून दाद द्यायचे.त्यांचे अक्षर अगदी मोत्यासारखे पण दुर्देवी नशीब ! त्यांच्यासाठी आमच्याकडे त्यांचे एक मोठी वाटी आणि ताठ होती जेवायला. त्यांचा तो शांत स्वभाव,सत्य परिस्थिती ओळखून वागणे कधी कधी पाहायला असहनीय व्हायचं. आजही जेव्हा जेव्हा मोठेवाटी बघितली की माझा मुलगा म्हणतो ही तर बाबू ची वाटी आहे. असा हा बाबू आमच्या सर्वांच्या मनात घर करून गेला. "चांदोबा गुरुजी" माझ्या पुतण्याला शिकवायला घरी एक शिक्षक यायचे इंग्रजांनी तरी काय बोलता येईल तेवढी इंग्लिश बोलायचे. डोक्यावर टोपी आणि टोपी वर रुमाल बांधायचे, नेहमी मळके कपडे, चप्पलला पीन,डोळ्याला चिपडे असा त्यांचा अवतार. सर्वजण त्यांना चांदोबा म्हणून चिडवत असे त्यावर ते रस्त्यावरचे दगड फेकून लोकांना मारायचे नंतर कळलं की त्यांना चांदोबा नावाचे मासिक खूप आवडायचे म्हणून त्यांचे नाव चांदोबा. कितीही हुशार असले तरी राहणीमान मुळे कोणी बोलत नसतं त्यांना. वाचकहो, तुम्हांला आठवते का ते चांदोबा मासिक ? या मासिकाचे नाव आणि इंग्लिश या गुरुजींची खुप आठवण करुन देते आणि त्यांचा तो अवतारही आठवतो आणि कपड्यांवरून बुद्धिमत्ता कशी ठरवतात हेच कळत नाही "कचरू" मी भारत विद्यालय मध्ये असताना कचरू ला पाहिलं मी पहिल्यांदा. खरंतर वयाने तो खूप मोठा पण एक आपुलकीने,प्रेमाने त्याला सर्व एकेरी नावाने बोलायचे. नाव कचरू म्हणजे जो आपल्याला नकोसा वाटणारा शब्द, पण हा कचरू मात्र सर्वांना हवाहवासा वाटणारा होता.प्रत्येक ऋतूतील फळांचा आस्वाद त्याच्याकडून मिळायचाच. कधीच पैशासाठी भुणभुण नाही, भांडण नाही. त्यांची बनियन आणि पट्टी असलेली चड्डी यावर तो फळे विकायला बसायचा, पण मला तरी आठवत नाही की त्यांच्या राहणीमानावर कोणी हसले असेल कारण त्यांच्या राहणीमानात पेक्षा त्यांचा स्वभाव सर्वांना जवळ येण्यास भाग पाडायचा पण आज याच राहणीमानाला जास्त महत्त्व दिले जाते माणसांपेक्षा.विचार कितीही चांगले असो, बुद्धिमान, प्रेमळ कितीही असो पण राहणीमान खराब असेल तर आज लोक त्यांना महत्व देत नाहीत. वाचकहो, कालिदास मामा, बाबू चांदोबा गुरुजी, कचरू या व्यक्ती दिसायला राहणीमानात जरी अजागळ असतील तरी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना त्यांच्या जीवनातील अस्मरणीय व्यक्ती झाल्या ते त्यांच्या बुद्धीने स्वभावाने आणि वागणुकीने. अशा सर्व व्यक्तींसाठी मानाचा मुजरा.! "सफर हैं जहाँ तक आप हो, नजर वही तक हैं जहां तक आप हो, हजारो लोग देखे इस जीवन में लेकिन पहचान एकमात्र आप हो।" सौ.स्मिता लक्ष्मीकांत मोहरीर ...✍️ नांदेड.