तीन दिवसांपासून भद्रावती तालुक्यातील चिरादेवी-गवराळा मार्ग बंद!

कायमस्वरूपी तोडगा काढण्याची स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवि शिंदे यांची मागणी....आता निवेदनाचा फार्स न करता थेट आंदोलन होईल..!

भद्रावती (ता.प्र.) - सध्या सुरु असलेली पाऊसाची झळ कधी संपणार, कधी हा एकदाचा पाऊस थांबेल, असा सवाल चिरादेवी, ढोरवासा, तेलवासा, पिंपरी गावातील नागरिक विचारत आहे. कारण सततच्या पावसामुळे तेलवासा रेल्वे भुयारी पुल गेट क्रमांक ३६ मधे पाणी साचल्याने भद्रावती शहराशी तब्बल १२ गावांचा संपर्क तुटला आहे. ही समस्या दरवर्शीचीच झाली आहे. त्यामुळे या समस्येवर तात्पुरती मलमपट्टी न लावता कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी येथील स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवि शिंदे यांनी केली आहे. वेकोलिच्या कोळसा खाणीने वेढलेल्या भागात रेल्वेचा भुयारी मार्ग आहे. त्यातूनच पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पावसाळा आला की, चिरादेवी, ढोरवासा, चारगाव, तेलवासा, पिपरी, कोची, घोनाड, मुरसा यासह 12 गावांचा संपर्क दरवर्षी तुटत असतो. अनेकदा दोन ते तीन दिवस या गावाला जाणारा रस्ता बंद असल्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. याही वर्षी हीच अवस्था आहे. चिरादेवी-गवराळा हा तालुक्याला जोडणारा मार्ग रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे मागील तीन दिवसांपासून बंद आहे. या पुलाखाली पाणी साचल्याने चिरादेवी, ढोरवासा, तेलवासा, पिंपरी येथील नागरीकांना रहदारी साठी मोठी कसरत करावी लागत आहे. व भद्रावती शहरातील आवागमन बंद झाले आहे. 

मुलांच्या शिक्षणासाठी भद्रावती हे एकमेव स्थळ आहे. या पुलाखाली कधी कमरेभर तर कधी माणूस भर पाणी साचून राहते. परंतु शिक्षणामध्ये खंड पडेल किंवा आपला अभ्यासक्रम मागे पडेल या भितीने शाळकरी मुलामुलींना रेल्वे रुळावरून धोकादायक प्रवास पार करावा लागत आहे. सुसाट वेगाने येणाऱ्या रेल्वे गाडीला बघून डोळ्याची पापणी न हलवता आपले वाहन रुळावरून बाहेर काढावे लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणी दुग्ध व्यवसायिक, भाजीपाला व्यवसायिक आणि शहरात कामाला येणाऱ्या नागरिकांच्या कामामध्ये खोळंबा झाला आहे. नदिजवळील गाव असल्यामुळे पावसाळ्यात साथीचे आजार काही नवीन नाही. दरवर्षीच्या या त्रासाने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. रेल्वे प्रशासनाला किमान दोन महिन्यासाठी " रेल्वे गेट सुरू करा..."? असे कित्येकदा येथील अन्नदाता एकता मंचचे अनुप खुटेमाटे व गावातील नागरिकांनी निवेदन देवून सुद्धा लक्ष दिले नाही. स्थानिक तहसीलदारांना सुद्धा निवेदन दिले आहे. मात्र कोणतीच कार्यवाही नाही. इतक्या अडचणी येत असताना हा सगळा प्रकार रेल्वे प्रशासन आणि तालुका प्रशासन उघड्या डोळ्यांनी बघत आहे. नागरीकांचा जास्तच रोष झाल्यास तात्पुरती डागडुजी केल्या जाते, जेसीबीद्वारे गाळ काढल्या जातो. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नाही. मागील वर्षी स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील रेल्वे अधिकाऱ्यांशी बैठक घेवून सदर प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या होत्या, मात्र त्यावर पुढे काहीच झाले नाही. निवेदन देणे भरपूर झाले मात्र आता निवेदनाचा फार्स न करता थेट आंदोलन होईल, असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद करुन रेल्वे प्रशासन व तालुका प्रशासनाने ताबडतोब त्या १२ गावांचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा मोठे आंदोलन उभे करु असा इशारा स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवि शिंदे यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.