सांस्कृतिक विभागाने जनसंपर्कावर भर देण्याच्या सूचना.. ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार ..!
बल्लारपुर (का.प्र.) - जगातील सर्वात मूल्यवान प्रसाधन म्हणजे हास्य, ते जनतेच्या चेहऱ्यावर फुलविण्यासाठी सांस्कृतिक विभागाने कार्यरत राहावे असे उद्गार आज सांस्कृतिक कार्यमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे काढले. विधान भवन येथे सांस्कृतिक कार्य विभागाची स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमांसंदर्भात तपशीलवार आढावा बैठक आज सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली, तेव्हा ते बोलत होते.या बैठकीस सांस्कृतिक कार्य सचिव, सह सचिव आणि या विभागाचे विविध वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा संदर्भात विविध कार्यक्रमांचे तपशीलवार नियोजन शासनाच्या विविध विभागांनी करणे अपेक्षित असून त्याचा पाठपुरावा सांस्कृतिक कार्य विभागाने करायचा आहे. त्यासंदर्भात श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विविध सूचना अधिकाऱ्यांना आज केल्या. सांस्कृतिक कार्य विभागाने जनसंपर्कावर भर दिला पाहिजे, या विभागाचे कार्य जनतेच्या दृष्टीने महत्वाचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले. सांस्कृतिक कार्य विभागाचे काम जनतेशी थेट जोडणारे आहे, याचे भान राखावे आणि विभागाने कामाचा वेग वाढवावा असेही निर्देश त्यांनी दिले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवासंदर्भात विविध उपक्रम सीएसआर मधून राबविण्यासाठी केंद्रशासनाची परवानगी मिळविण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी येवेळी सांगितले.
"स्वनाथ फाउंडेशन च्या कार्यक्रमास भेट" - अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या स्वनाथ फाउंडेशनच्या प्रतिपालकत्व सप्ताह या कार्यक्रमास आज दुपारी श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली. 18 वर्षांवरील अनाथ मुलांना पालक मिळण्यास अडचणी येतात. या मुलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांना पालक मिळवून देण्यासाठी स्वनाथ फाउंडेशन काम करते. त्यांचे कार्य समाजाला अत्यावश्यक आहे, या मुलांनी स्वतः चे कर्तृत्व फुलवावे, अशा शब्दात श्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. या मुलांना काहीही मदत लागल्यास मी मदतीसाठी सदैव उपलब्ध असेन असे आश्वासनही श्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी या स्वनाथ मुलांना दिले.