जुलै २०२२ च्या पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद .. वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याचे फलीत..!
बल्लारपुर (का.प्र.) - चंद्रपूर जिल्हयातील चिचपल्ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी जुलै २०२२ च्या पुरवणी अर्थसंकल्पात १४ कोटी ०१ लक्ष ४७ हजार रू. निधीची तरतूद करण्यात आली आहे. वने व सांस्कृतीक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे.चिचपल्ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र हा श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. सन २०१४ मध्ये वनमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांपैकी बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राची निर्मीती हा एक निर्णय होता. चंद्रपूर जिल्हयामध्ये काही समाज पारंपरीकरित्या बांबुपासून वेगवेगळया रोजच्या वापराच्या वस्तु बनविण्याचा व्यवसाय करतात. महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर व परिसरात बांबूचे मोठया प्रमाणात उत्पादन होते. मात्र काही समुदायापुरता मर्यादीत झालेला उद्योग विस्तारीत करणे आणि यामध्ये नव्या तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे होते. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री म्हणून वनविभागाच्या अंतर्गत येणा-या महाराष्ट्र बांबू विकास मंडळामार्फत चंद्रपूरमध्ये चिचपल्ली परिसरात बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची सुरूवात केली. या संशोधन केंद्रामध्ये २ वर्षाच्या अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली असून महाराष्ट्राच्या विविध भागांतील मुलांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. या ठिकाणी तयार करण्यात आलेला तिरंगाध्वज व अन्य भेट वस्तु मोठया प्रमाणात महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झाल्या असून प्रधानमंत्री श्री. नरेंद्रभाई मोदी यांनी देखील येथे तयार झालेल्या तिरंग्याचे कौतुक केले आहे. चंद्रपूर जिल्हयात कायम स्वरूपी एक मोठे प्रशिक्षण व संशोधन केंद्र निर्माण झाले आहे. हा परिसर भारताच्या ईशान्यपुर्वेकडील राज्याला जोडला जात असून रोजगार व कौशल्य निर्मितीसाठी हे केंद्र नावलौकीकास आले आहे.सदर मंजूर १४ कोटी ०१ लक्ष ४७ हजार रू. निधीअंतर्गत या प्रकल्पातील बांबु कामावर फायर रिटारडंट पॉलीश करणे, आग प्रतिबंधक योजनेनुसार कार्यशाळा इमारत व स्वयंपाकगृह इमारतीचे बांधकाम करणे व विद्युत विषयक कामे करण्यात येणार आहे. वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतुन साकारलेल्या या महत्वपूर्ण प्रकल्पासाठी १४ कोटी ०१ लक्ष ४७ हजार रू. इतका निधी मंजूर झाल्याने या प्रकल्पाशी संबंधित कामांना गती प्राप्त होणार आहे.