महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेत्तर सेना व रात्रशाळा कृती समितीचे शासना विरोधात "एक दिवसीय धरणे आंदोलन" संपन्न...!
नागपुर (प्रा.राहुल जी.गौर) - महाराष्ट्र राज्यातील १६५ रात्रशाळा व रात्र कनिष्ठ महाविद्यायलातील अर्धवेळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्ती सुधारणा करित दि. १७ मे २०१७ रोजी तत्कालीन शासनाने पारित केलेल्या शासन निर्णयामुळे राज्यातील जवळपास १३०० वरील रात्रशाळेत दुबार सेवा करणाऱ्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवा सदर शासन निर्णयामुळे समाप्त होत. केवळ रात्रशाळेत कार्यरत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वाढिव कार्यभारानुरूप वाढिव वेतनश्रेणी, इतर भत्ते व निवृत्ती वेतनाचे लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला होता. परंतु शिक्षण विभागातील अधिकारी वर्गाची शासन निर्णय कार्यान्वित होण्यासाठी असलेली उदासीनता व असहकार, मुंबईतील एका शिक्षक आमदाराचा सर्व पक्षीय असलेला वरचष्मा व शासन निर्णयातील त्रूट्यांची शासना कडून न झालेली पुर्तता. यामुळे सदर शासन निर्णय रात्रशाळेतील अर्धवेळ कर्मचाऱ्यांसाठी "टांगलेला गाजरच" ठरलेला होता. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेत्तर सेनेच्या माध्यमातून मा. उच्च न्यायालय नागपूर खंडपिठात अर्धवेळ कर्मचाऱ्यांनी व रात्रशाळेतून निवृत्ती उपरांत शासन निर्णयाचे अनुषंगाने लाभ न मिळालेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शासना विरोधात सन २०२० रोजी याचिका दायर केलेली होती. परंतु "कोरोना प्रादुर्भाव" व "न्यायालयात असलेली न्यायाधिशांची कमतरता" तसेच न्यायालयातील वाढलेल्या पिटिशनची संख्या याचा फायदा घेत शासन प्रतिनिधी म्हणून शिक्षण सचिवांनी याचिकेतील नोटिसींना न दिलेले उत्तर यामुळे याचिका मा. न्यायालयात रेंगाळत पडलेली असून, यात राज्यात झालेले तडकाफडकी सत्ताबदलचा फायदा घेत गैरपद्धतीने दि. १७ मे २०१७ चा शासन निर्णय अधिक्रमीत करीत मावळत्या सरकारने दि. ३० जून २०२२ रोजीचा शासन निर्णय काढून रात्रशाळा अर्धवेळ शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांंच्या आनंदावर विर्जन टाकण्याचे काम शासनाकडून झालेले आहे. भरीस-भर शिंदे सरकारनेही चालू अधिवेशनात नवीन शिक्षण मंत्री, मा. दिपक केसरकर यांनी ३० जूनच्या शासन निर्णयाची कुठलीही शहानिशा न करता व मा. उच्च व मा. सर्वोच्च न्यायालयात या अगोदर दिलेल्या आदेशाचा तसेच नव्याने दायर उच्च न्यायालयातील याचिकांचा कुठलाही विचार न करता विधानपरिषदेत दि. ३० जुन २०२२ च्या शासन निर्णयाला कायम ठेवत. रात्रशाळा अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या जखमांना मिठ चोळण्याचे काम केलेले आहे. या सर्व बाबींचा विचार होवून महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेत्तर सेना, शिक्षक परिषद समर्थीत रात्रशाळा कृती समीती व भारतीय जनता पार्टी शिक्षक सेलच्या पांठिंब्याने आज दि. २० आॕगस्ट २०२२ रोजी नागपूरातील संविधान चौकात "डाॕ. बाबासाहेब आंबेडकर" यांचे पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करीत दि. ३० जून २०२२ चा शासन निर्णय रद्द करण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन संपन्न झाले. या प्रसंगी नागपूर विभागाचे विधानपरिषद शिक्षक आमदार मा. ना. गो. गाणार, म.न.शिक्षक शिक्षकेत्तर सेनेचे राज्य सरचिटणीस श्री. महेश जोशी व शरद भांडारकर, भाजप शिक्षक सेलचे श्री. अनिल शिवणकर, कृती समितीचे अध्यक्ष श्री. सुनिल ठाणेकर, मनसे शिक्षक सेनेचे श्री. नितिन किटे, श्री. जावेद शेख, श्री. विश्वास रामटेककर तसेच असंख्य रात्रशाळा अर्धवेळ मुख्याध्यापक श्री. बोरूडकर सर, श्री. जैन सर, श्री. पोपटे सर, सौ. निकिता चामट मॕडम, सौ. डुमरे मॕडम, सौ. मोहोड मॕडम तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व निवृत्त रात्रशाळा शिक्षक हजर होते.