जिल्हाधिकाऱ्यांकडे केला 50 हजारांचा धनादेश सुपूर्द..!
भद्रावती (ता.प्र.) - चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. दरवर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाल्याने सर्वत्र शेतीचे व शेतमालाचे अपारीमित नुकसान झाले आहे. त्यामुळे संकटग्रस्त या शेतकऱ्यांच्या मदतीकरिता विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अॅड मोरेश्वर टेमुर्डे पुढे सरसावले.आणि आपल्या ८१ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून मदत म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे पूरग्रस्त निधी म्हणून 50 हजाराची मदत त्यांनी सुपूर्द केली.वरोरा - भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट आले आहे. दुबार पेरणी झाली. दुबारपेरणीही नष्ट झाली आहे .खरिपातील तूर, कापूस व सोयाबीनचे पीक पाण्याखाली बुडल्याने शेतकऱ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. या शेतकऱ्यांना काही आर्थिक मदत व्हावी म्हणून विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेन्ट) वरोरा च्या वतीने 50 हजार रुपये मदत म्हणून धनादेश देण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांच्यासह भद्रावती येथील विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नामदेव उमाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
"त्या कुकर्मी अधीक्षकाला फाशी देण्याची मागणी" ..!
भद्रावती तालुक्यातील घमाबाई निवासी आश्रम शाळा येथे १३ वर्षीय मुलीवर शाळेतील अधिक्षकांने वारंवार अत्याचार केला. ही पवित्र अशा शिक्षण क्षेत्राला कलंकित करणारी बाब आहे. या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर त्या अधीक्षकाला फाशी देण्यात यावी , अशी मागणी समाजमनात करीत आहे . तसेच या शाळेची सखोलपणे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.भंडारा येथील महिलेवरिल अत्याचाराचे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असतानाच आता तांडा बरांज येथिल घमाबाई निवासी आश्रम शाळेच्या 53 वर्षीय अधीक्षकाला आठवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे .
चांगले शिक्षण मिळावे यासाठी मागच्या महिन्यात ७ जुलैला भद्रावती तालुक्यातील या आश्रम शाळेत पीडित मुलीचे नाव दाखल करण्यात आले होते . मात्र अल्पावधीतच ४ ऑगस्टला अचानक आश्रम शाळेतून तिच्या वडिलांना बोलाविण्यात आले. तुमच्या मुलीची प्रकृती बरोबर नाही असे सांगून, सोबत शाळा सोडण्याचा दाखला घेऊन जा असे सांगण्यात आले . पालकांनी टीसी मागणी साठी कोणताही अर्ज शाळेला दिला नव्हता हे विशेष. मुलीला सोबत घेत वडील हिंगणघाट येथे पोहोचले . पीडित मुलीचे आई वडील हिंगणघाट येथे भाड्याच्या घरात राहत .एक-दोन दिवस उलटल्यानंतर घर मालकीण यांनी मुलीच्या प्रकृतीची विचारपूस केली. याबाबत विचारणा केली तेव्हा तीच्यावर अत्याचार झाल्याचे सदर धक्कादायक प्रकार समोर आला. याबाबत हिंगणघाट येथे पोलिसात तक्रार देण्यात आली .व वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात त्या मुलीला नेण्यात आले . मात्र पोलीस प्रशासन व रुग्णालयाने सदर प्रकरणी हायगय केली. अत्याचाराचे प्रकरण आमदार समीर कुणावार यांच्या कानी पडतात त्यांनी तत्काळ उपजिल्हा रुग्णालय गाठत संपूर्ण प्रकरण जाणून घेतले .
आमदार रुग्णालयात पोहोचल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर व अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी रुग्णालयात दाखल झाले. पोलीस प्रशासन व रुग्णालय प्रशासनाने हयगय केल्याने आमदार चांगले संतापले . लगेच त्या मुलीची पुन्हा वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तपासणीनंतर सदर गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मात्र घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली असल्याने सदर प्रकरण भद्रावती पोलीस ठाण्यात वळता करण्यात आले. भद्रावती पोलिसांनी पास्को, ॲट्रॉसिटी व अत्याचाराचा गुन्हा आश्रम शाळा अधीक्षक 53 वर्षीय संजय एकनाथ इटनकर यांच्यावर दाखल केला व अटक केल्याची माहिती मिळाली आहे .सदर प्रकरण आरोपी अधीक्षक इटनकर यांनी पीडीतेला चाकूचा धाक दाखवीत अनेकदा अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली. या आधी आतापर्यंत अशा किती मुलींवर अत्याचार किंवा छळणी झाली आहे याचा तपास भद्रावती पोलीस करीत आहे .
आमदार कुणावार त्यांच्या आक्रमकतेमुळे सदर प्रकरण उघडकीस आले ,अन्यथा हे प्रकरण दाबण्यात आले असते अशी जनसामान्यात चर्चा सुरू आहे.ही संस्था राजकीय पुढारी असलेले पवार यांची असल्याचे समजते.या आरोपात प्राचार्यांनी टीसी दिल्यामुळे ते सुद्धा या प्रकरणात गुंतले तर नाही ना? अशी शंका व्यक्त केली जाते. तेव्हा त्यांचीही कठोर चौकशी व्हावी. या कुकर्मी अधीक्षकांना फाशी व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ही मागणी जनसामान्यांत जोर धरत आहे.
"माजरी परिसरात पुरपरिस्थिती गंभीर" - पळसगाव येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याकरिता एनडीआरएफचे तीन बोट तैनात..
सततच्या पावसामुळे व पुरस्थितीमुळे शेतपीकाचे नुकसान झालेल्या संतप्त पळसगाव येथील नागरिकांनी बोट मध्ये बसण्यास नकार दिला, वारंवार पुर येत असल्याने घर सोडून किती वेळा सुरक्षित ठिकाणी जाणार असा सवाल संतप्त नागरिकांनी केला गावकऱ्यांची पुनर्वसनाची मागणी भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी बोटद्वारे प्रवास करून पळसगाव येथील पुरग्रस्त नागरिकांना भेट दिली. नागरिकांना वेकोलिच्या मदत केंद्रात आश्रय घेण्याचे आवाहन केले. पुरपीडितांना योग्य ती मदत करण्याचे जिल्हाधिकारी तहसीलदार आणि जिल्हा प्रशासनाला सूचना केल्यात्या नंतर पाटाळा गावाला भेट देऊन पूरपरिस्थिती ची पहाणी केली. सुधीरभाऊ मुनगंटीवार वार सोबत बोलणे करून माजरी परिस्थिती महापूर बाबत माहिती दिली व सुधीरभाऊ मुनगंटीवार एक दोन दिवसात स्वता दौरा करून तात्काळ मदतीचे अश्वास दिले यावेळी डॉ. भगवान गायकवाड, माजी जि.प.प्रवीण सुर, सुदर्शन समाजचे प्रदेश संगटक राजेश रेवते यांच्यासह अनेक गावकरी नागरिक उपस्थित होते.

