दोनशेहून अधिक लोकांनी घेतली कर्करोग आजाराबाबत माहीती.!

११० पुरुष-महिलांनी केली मोफत तपासणी .. लवकरात लवकर उपचार केले तर कॅन्सर सारखा आजार सुध्दा बरा होऊ शकतो - डॉ. आशीष बारब्दे

भद्रावती (ता.प्र.) - विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथे दिनांक २१ सप्टेंबर २०२२ ला मोफत कॅन्सर रोग निदान आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भद्रावती आणि योद्धा संन्याशी स्वामी विवेकानंद पालक मित्र मंडळ, भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. तपासणी शिबिराकरिता मूख, स्तन, गर्भाशय कॅन्सरची तसेच मधुमेह, हेपीटायटस बी. सी., रक्तदाब आणि नेत्र रोगाची मोफत तपासणी करण्यात आली.मोफत तपासणी शिबिराकरिता प्रामुख्याने टाटा केअर प्रोग्रामचे डॉक्टर आशीष बारब्दे, डॉक्टर वैदही लोखंडे, डॉक्टर सुरज साळुंखे, अपर्णा चालूलकर, धम्मज्योती मुरमडकर, वनिता थुल, आरती भटेले आणि नेत्ररोगतज्ञ डॉक्टर अक्षय चव्हाण यांची उपस्थित होती.कॅन्सर केअर प्रोग्राम चंद्रपूरचे डॉक्टर आशीष बारब्दे यांनी कॅन्सर विषयी विस्तृत माहिती दिली. कॅन्सर कसा होतो, कॅन्सरच्या प्रकाराची माहिती महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच उपस्थित नागरिकांना दिली. लवकरात लवकर उपचार केले तर कॅन्सर सारखा आजार सुद्धा बरा होऊ शकतो. त्याकरिता कॅन्सर विषयीची जनजागृती माहिती असणे खूप गरजेचे आहे. असे डॉक्टर आशीष बारब्दे यांनी सांगितले.

डॉक्टर सुरज साळुंखे यांनी तंबाखू, गुटखा, खर्रा, बीडी, सिगारेट, दारूच्या सेवनाने शरीरावर काय परिणाम होतो, त्याच्यामध्ये कोणते विषारी घटक असतात ज्यामुळे मानवी शरीराला कॅन्सर होऊ शकतो याची सविस्तर माहिती दिली. तसेच महाविद्यालयीन मुला-मुलींना कोणतेही व्यसन करू नये आणि आपल्या पालकांना पण करू देऊ नये. त्यांना कॅन्सर आजाराविषयी माहिती द्यावी आणि पालकांची तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले.डॉक्टर वैदही लोखंडे यांनी मुख, स्तन आणि गर्भाशय कर्करोगाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच कर्करोगाच्या लक्षणाविषयी, आजार होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, अशा अनेक महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.

मोफत कर्करोग निदान तपासणी आणि नेत्ररोग तपासणी शिबिरात लोकमत सखी मंच, महिला बचत गट नगरपालिका भद्रावती, पुरोगामी पत्रकार संघ, वर्चस मल्टीपर्पज सोसायटी भद्रावती, संघर्ष वाहन चालक-मालक संघटना, ग्राहक पंचायत भद्रावती, योद्धा संन्याशी विवेकानंद पालक मित्र मंडळ भद्रावती आणि भद्रावती शहरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.या कार्यक्रमाची उपायोजना आणि नियोजनासाठी प्राचार्य डॉक्टर नामदेव उमाटे, पुरूषोत्तम मत्ते, वामन नामपल्लीवार, पारेलवार सर, अमोल ठाकरे सर, प्रविण रामचंद्र चिमुरकर, वसंत वर्हाटे, तनुगुलवार, किरन साळवी, धनराज आस्वले, तेलंग सर, घोसरे सर, खामकर सर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी महत्वपुर्ण कार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.