भजन हे श्रद्धा, अध्यात्म आणि एकात्मतेचे प्रेरणादायी माध्यम .!

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन .. चंद्रपूर ग्रामीणमधील 30 भजन मंडळांना साहित्याचे वाटप .! 

चंद्रपूर (वि.प्र.) : भजन हे केवळ भक्तिगीत नसून ते समाजात श्रद्धा, एकात्मता व अध्यात्म जागविणारे, समाजाच्या एकतेचे प्रेरणादायी माध्यम आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर तालुक्यातील भजन साहित्य वाटपाचा कार्यक्रम तुकुम येथील अय्यप्पा मंदिर सभागृहात पार पडला. त्यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार बोलत होते.
विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत त्यांनी चंद्रपूर ग्रामीणमधील 30 भजन मंडळांना साहित्याचे वाटप केले. कार्यक्रमाची सुरुवात आ. मुनगंटीवार यांनी स्वतः ‘केशवा माधवा… तुझ्या नामात रे गोडवा’ हे भजन गाऊन केली. आयोजकांच्या आग्रहावरून त्यांनी भजन सादर केले. 
कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा नेते रामपाल सिंग, श्रीनिवास जंगमवार,नामदेव आसुटकर, मनोज मानकर, शांताराम चौखे, फारुख शेख,गौतम निमगडे, चंद्रकांत धोडरे, देवानंद थोरात, रूद्रनारायण तिवारी,नागेश कडूकर,अनिताताई भोयर, रोशनी खान, केमाताई रायपुरे, वनिता आसुटकर, गीताताई वैद्य, गीता सिंग, अरविंद बोरकर,अमोल जगताप,अतूल पिल्लरवार,मुक्ता येरगुडे, सुरेखाताई थोरात, मोनी आसवानी, रंजनाताई किन्नाके, दयानंद बंकुवाले, शंकर खत्री,घनश्याम यादव आदींची उपस्थिती होती.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘भजनामुळे धार्मिक व अध्यात्मिक भावनेने वातावरण भारावून जाते. भजनाला अध्यात्म्याची किनार असून ते प्रत्येक संकटावर मात करण्याची प्रेरणादायी ऊर्जा आहे. समाजात श्रद्धा, एकात्मता व अध्यात्म जागविण्याचे सामर्थ्य भजनामध्ये दडलेले आहे. हाच भक्तिभाव जोपासण्यासाठी भजन मंडळांना आवश्यक साहित्य समर्पित करीत आहे.’ भजन मंडळांना मिळालेल्या या साहित्यामुळे भक्ती सेवेला नवी ऊर्जा व प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मतदारसंघातील विकासकामांसह धार्मिक-सांस्कृतिक क्षेत्रात अभिमानास्पद कार्य:

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, मतदारसंघात अनेक विकासात्मक कामे केली आणि पुढेही करत राहील. छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला. तसेच भजन मंडळांना सभागृहासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला. अयोध्येच्या राम मंदिरात काष्ठ पाठविण्याचे सौभाग्य मिळाले, याचा मला अभिमान आहे.’ संसद भवनाचे दरवाजे तसेच पंतप्रधानांच्या कार्यालयातील खुर्ची ही आपल्या मतदारसंघातील बल्लारपूरच्या लाकडापासून तयार झाली आहे, ही गौरवाची बाब आहे. भीमाशंकर येथे ज्येष्ठ नागरिकांना थेट मंदिरात जाण्याची व्यवस्था तसेच महादेव वन परिसरात सोयी-सुविधा निर्माण करण्याचे तसेच कोराडी येथे 200 कोटी रुपये खर्च करून आई जगदंबा मंदिराचे भव्य बांधकाम आणि पंढरपूर येथे तुळशी वृंदावन उभारण्याचे भाग्य लाभले असल्याचेही ते म्हणाले. 
याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनहून भारतात आणण्याचा मान, नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आणि अमरावती विद्यापीठाला वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांचे नाव देण्याचे सौभाग्य लाभले.याशिवाय मोझरीच्या विश्वस्त मंडळावर आजीवन ट्रस्टी आणि उपाध्यक्ष म्हणून कार्य करण्याची संधी ही माझ्यासाठी आयुष्यातील अमूल्य ठेवा असल्याचे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

---------------

मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलणार .!

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास .. शैक्षणिक-सामाजिक प्रगतीच्या माध्यमातून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार .. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्वप्नातील समाज घडवण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन .. चंद्रपूर येथे विदर्भस्तरीय मातंग समाज प्रमुख कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीचे आयोजन ..!!
चंद्रपूर, दि.15 : मातंग समाजाचे हक्क, समाजाची शैक्षणिक उन्नती आणि सामाजिक प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना गती देत समाजाच्या सबलीकरणासाठी तसेच सर्वांगीण विकासासाठी अथक व सातत्यपूर्ण प्रयत्न करणार आहे. समाजाच्या शैक्षणिक उन्नती व सामाजिक प्रगतीसाठी ठोस पावले उचलणार आहे, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. समाजाच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेत संसदीय आयुधांचा प्रभावी वापर करून ठोस प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
चंद्रपूर येथील हॉटेल तिरुपती क्राऊन येथे विदर्भस्तरीय मातंग समाज प्रमुख कार्यकर्त्यांची संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. या संवाद बैठकीला डॉ. गोपाल मुंधडा, वामन आमटे, परिमल कांबळे, श्री. गायकवाड, गजानन शिंदे, राजेश आमटे तसेच विदर्भातून आलेल्या मातंग समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘मातंग समाजाचे प्रतिनिधी काही मागण्या व संकल्प घेऊन आले आहेत. त्यांच्या मागण्या विधानसभेत मांडून चर्चा घडवून आणण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी मी त्यांच्या पाठीशी पूर्ण शक्तीने उभा आहे. 1 ऑगस्ट 2019 रोजी, शताब्दी वर्षानिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पोस्ट तिकीट काढले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्वप्नातील समाज घडवण्यासाठी दायित्व स्वीकारून ठाम संकल्प करण्याची आज अत्यंत आवश्यकता आहे.’
जोपर्यंत राज्यातील सर्व समाजघटकांचा संतुलित विकास होत नाही, तोपर्यंत कोणताही समाज, राज्य किंवा देश प्रगतीच्या मार्गावर जाऊ शकत नाही. यासाठी समाजात नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी निर्माण करणारे उद्योजक तरुण घडविण्याची गरज आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विदर्भस्तरीय, जिल्हास्तरीय व मंडळस्तरीय समित्या स्थापन कराव्यात आणि त्या समाजातील पदवीधरांनी राज्यातील विविध योजनांचा अधिकाधिक लाभ घेऊन समाज परिवर्तनासाठी सक्रिय प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ‘समाजाला योग्य दिशा देण्यासाठी स्पर्धा परीक्षा, व्यवसाय, नोकरी आणि महिला सक्षमीकरणासाठी सक्षम संघटन करणे अत्यावश्यक आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य हे प्रत्येक समाजाचे मुलभूत अधिकार आहेत; ते मिळवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजे.’ मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करून, त्यांची पूर्तता करण्यासाठी विविध संसदीय आयुधांचा उपयोग करेल. विविध शासकीय योजनांचा योग्य लाभ घेतल्यास समाज वेगाने प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करू शकेल. असा विश्वास देखील आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".