एक दुर्दैवी पंतप्रधान !!

मुंबई (जगदीश काशिकर) - कुठल्याही देशाचा पंतप्रधान हा त्या त्या देशाचा अभिमान असतो पण अपवाद आहे तो भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचा. कुठल्याही नालायक माणसाची अवहेलना झाली नसेल, एवढी निंदा नालस्ती आपल्या देशातील लोकांनी मोदींची केली आहे. विषेश म्हणजे आपल्यातील कित्येकांनी त्याचा प्रतिवाद केला नाही हा आमचा कर्मदरिद्रीपणा. देशातील अनेक पुढारी अत्यंत गरिबीतून उच्च स्थानी पोचले पण मोदी चहा विकत होते याचे मात्र पुरावे मागितले गेले.ए मेरे वतन के लोगो या गाण्याच्या वेळी नेहरू रडले तर ते किती हळव्या मनाचे असे कौतुक पण एखाद्या ठिकाणी मोदींचे डोळे पाणावल्यास ते मगरीचे अश्रू. एक दिवस कुणी भेट म्हणून दिलेला दहा लाखांचा सूट घातला तर हे सुटाबुटाचे सरकार म्हणून हिणवले गेले पण नंतर त्याच सुटाचा लिलाव करून आलेले साडेतीन कोटी नमामि गंगे ह्या प्रकल्पाला दिले ह्याचा मात्र उल्लेख नाही.

आमच्या लहानपणी नेहरूंच्या जीवनावर आधारित एक चित्र पहायला मिळे, त्यांत नेहरूंच्या पाळण्यातील चित्रापासून पार प्रधानमंत्री होई पर्यंतचा प्रवास दिसे, हा कौतुकाचा विषय पण मोदी स्वतःच्या आईला भेटून नमस्कार करतानाचा फोटो दिसला की, मोदी स्वतःच्या खासगी आयुष्याचे प्रदर्शन करतात हा आरोप अगदी ठरलेला.भारताच्या चांद्रयान मोहिमेला अपयश आले त्याला मोदींना जबाबदार धरले गेले. काय तर म्हणे मोदी रात्रभर शास्त्रज्ञां सोबत स्वतःचे कौतुक करीत बसले व तेथील शास्त्रज्ञांचे लक्ष विचलित झाले त्यामुळे यान भरकटले.एकदा कुणीतरी मोदी चरख्यावर सूतकताई करतांनाच फोटो प्रसिद्ध केला तर केवढा गहजब. मोदी महात्मा गांधींची बरोबरी करु पहात आहेत. कहां राजा भोज कहां गंगू तेली. अशी संभावना केली गेली. निंदकांना त्या चरख्यावर फक्त मोदी नको होते. साबरमतीच्या आश्रमात कुणी गेल्यास त्याच चरख्यावर प्रतिभाताई पाटील आणि अमिताभ बच्चन सूतकताई करतानाचे फोटो आश्रमात लावलेले दिसतील. गूगलवर किंवा YouTube वर हे फोटो उपलब्ध आहेत. कदाचित प्रतिभाताई आणि अमिताभ म.गांधीच्या बरोबरीचे असतील.

मा.मोदी आणि जसोदाबेन परस्पर संमतीने अलग झाले असतांना अनेक नतदृष्टांनी मोदींनी पत्नीला वार्‍यावर सोडले असा बोभाटा सुरू केला व जसोदाबेन यांना मोदींविरुध्द उचकवण्याचा प्रयत्न केला पण जसोदाबेन यांनी स्वतः खुलासा करीत खडसावले तेव्हां प्रकरण शांत झाले.  2020 साली जय भगवान गोयल नावाच्या मोदीप्रेमीने "आजके शिवाजी नरेंद्र मोदी" नावाचे पुस्तक लिहिले आणि मोदींच्या द्वेषाने पछाडलेल्यांचा पार्श्वभाग जळून खाक झाला. यामधे मोदींचा कोणताही सहभाग नसताना स्वतःला शिवाजी महाराज समजता काय ? लायकी आहे का? वगैरे मुक्ताफळे उधळली गेली. त्यापूर्वी छ. शिवाजी महाराजांशी स्व. यशवंतराव चव्हाण (प्रतिशिवाजी) तसेच मा. शरदराव पवार ( जाणता राजा) अशी तुलना केली गेलीच होती. पण नरेंद्र मोदी? अरे हट्. परिणामी ते पुस्तक बंदी घालून मागे घेतले गेले.

आत्ता आत्ता बाजारात एक पुस्तक बाजारात आले आहे. पुस्तकाचे नाव आहे "लाचित बरफुकन आसामचे शिवाजी" लेखक सुज्जकुमार भुयां अनुवादक विजय लोणकर.हे पुस्तक मोदी द्वेषींच्या नजरेस पडले नाही की ते मोदीं संदर्भात नाही म्हणून दुर्लक्ष केले जात आहे. गूगलवर ह्या पुस्तकाची देखील माहिती उपलब्ध आहे.NRI PM म्हणून हेटाळणी , सर्जीकल आणि एअर स्ट्राईकचे पुरावे मागणे, मणीशंकर अय्यरनी नीच म्हणने, सोनिया गांधींनी मौतका सौदागर म्हणने, राहुल गांधींनी चौकीदार चोर है म्हणून अपमान करणे, बायको सांभाळता येत नाही तो देश काय सांभाळेल असा मनोभंग करणे, साप विंचवाची उपमा देणे इथपर्यंत मोदी विरोधकांची मजल गेली.असे घाव सोसत हा माणूस थोडाही विचलित न होता 18/18 तास काम करीत देश सेवा करीत आहे. जगात देशाची मान उंचावून स्वतःच्याच देशात खाली मान घालून सहन करीत आहे.

2002 पासून एकही सुटी न घेता स्वतःच्या खाण्यापिण्याचा खर्च स्वतःच्याच पगारातून करीत आहे. परदेशात जाताना मुद्दाम रात्री प्रवास करून विमानात झोप घेऊन परदेशातील हाॅटेलचा खर्च वाचवतो आहे. दिवाळीत सुटी न घेता सैनिकांचे मनोबल वाढवतो आहे. ऐन सत्तरीत तरुणासारखा तडफेने धावतो आहे.कोणत्या मातीचा बनला असेल हा माणूस?आदरणीय लोकनायक,जननायक, प्रमुख सेवाप्रधान, हृदस्पंदन माननीय हिंदुस्थानचे पंतप्रधान श्री. नरेंद्र दामोधरदास मोदींजीना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.