मुंबई (जगदीश काशिकर) - सात वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.. संसदेचं कामकाज दुपारच्या जेवणासाठी थांबलं होतं. मोदीजी अचानक संसदेच्या कँटीनमधे दाखल झाले..एका टेबलापाशी खुर्चीवर जाऊन बसले.. 'सर, आपण काय खाणार?' असा प्रश्न विचारला गेला तेव्हा म्हणाले.. "तुम्ही जे केलं असेल तेच द्या!" 28 रु. ची शाकाहारी थाळी जेवले.. हे सारं भारीच आहे. पण मोदींचं 'मोदीपण' दिसतं ते पुढच्या प्रसंगात..''सर, 'अभिप्राय वही'त आपण काही लिहावं..!" अशी विनंती झाल्यावर मोदींनी जे लिहिलं ते बापजन्मात अन्य कुणालाच जमणार नाही...
मोदींनी लिहिलं.. 'अन्नदाता सुखी भव!' - आमच्या हिंदू संस्कृतीच्या महावाक्यांपैकी हे एक वचन. 'भारतीय सभ्यतेची' ओळख करुन देणारं. मोदींनी हे अभिमानानं लिहिलं. 2014 पूर्वी, हिंदू संस्कृतीचा असा उघड गौरव करायला उच्चपदस्थ नेत्यांना भिती वाटायची.. पण मोदींनी हे बदलून टाकलं...अमेरिकन अध्यक्षांनी आयोजित केलेल्या भोजनप्रसंगीही, 'माझा नवरात्रीचा उपवास आहे' हे ठासून सांगावं मोदींनीच. 'व्हाईट हाऊस'मधे, काचेच्या निमुळत्या चषकांतून 'फसफसणारे पेय' न घेता 'फळांचा रस' घेणारे फक्त मोदीच! 'अष्टांगयोग' ही हिंदू संस्कृतीचीच देणगी आहे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींनीच ठसवलं. योग परंपरेच्या उगमाचं खोटं श्रेय लाटण्याचा प्रयत्न अन्य काही शक्ती गेली अनेक वर्षं करत होत्या. मोदींच्या प्रयासामुळे या गोष्टीला ब-यापैकी पायबंद बसला.
ते जिथे जातील तिथे आपला 'अमीट ठसा' उमटवतातच. 'देशासाठी अपार मेहनत घेऊनही यशापासून वंचित राहिलेल्यांना धीर देणं' ही तर त्यांची खासियत.. मग ते 'इस्रोचे शास्त्रज्ञ' असोत वा 'महिला हॉकी संघ' असो....प्रत्येकाची जातीनं चौकशी.. ती ही वरवरची नव्हे.. तपशीलात शिरुन! गेल्या 8 वर्षांमधे मोदींनी अनेक सूक्ष्म पण महत्वाचे बदल घडवून आणले आहेत. मोदींच्या वतीने जनसामान्यांना जी पत्रं येतात त्यावरही 'मोदीपणाचा' ठसा दिसून येतो.एखाद्या व्यक्तीला पंतप्रधान निधीतून मदत केल्यास, "ही मदत जनतेच्या पैशातून करत आहोत" हे आवर्जून आणि नम्रतेनं नमूद केलेलं असतं. मुलगा पंतप्रधान असला तरी स्वतःच्या जुन्या सामान्य घरात राहणाऱ्या आईचे' संस्कार त्यांच्यावर आहेत.. 'मोदीपण' हे त्याचंच फलीत असावं.आम्ही गेली 8 वर्षं, या मोदीपणाच्या प्रेमात आहोत व पुढेही राहू.