नरेंद्र दामोदरदास मोदी!! बस्स नाम हि काफी है .!

जीवेत शरद: शतम् मोदीजी!!

मुंबई (जगदीश काशिकर) - कित्येक वर्ष राम, कृष्ण,विष्णू ह्या सगळ्या देवांना मानणाऱ्या, त्यांचे विचार आचरणात आणणाऱ्या लोकांना भक्त म्हणायचे आता आपल्या आदरणीय पंतप्रधानांना मानणाऱ्या, त्यांचे विचार,आचार आवडणाऱ्या लोकांना भक्त म्हटलं जातं! बरं, त्यात गंमत अशी की त्यांच्या समर्थकांना भक्त अशी उपमा देऊन विरोधकांनीच त्यांना देवत्व बहाल केलंय! मला आठवतंय, 2014 च्या निवडणुकांच्या आधीच्या निवडणुकांना कोण उभं आहे.. कुणाच्या किती जागा आहेत वगैरे गोष्टींत सामान्य जनतेला फारसं काही देणं घेणं राहील नव्हतं.'हे असंच चालायचं' अशी काहीशी मानसिकता झालेले माझ्यासारखे कित्येकजण कर्तव्य म्हणून मतदान करायला जायचे. सुशिक्षित तरुण वर्ग तर मतदानाच्या बाबतीत अतिशय निरुत्साही होता.पण 2014 मध्ये ते आले... आणि त्यांनी काय जादू केली की तरुण वर्ग सोडाच पण ज्यांना निवडणूक म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाही ती छोटी छोटी मुलं "अब की बार मोदी सरकार" अशा घोषणा देत होती. ते भाषण करायला उभे राहिले की सभेत उसळलेला उत्साह बघताना अंगावर काटा यायचा!! 

ते वातावरणच भारलेलं होतं! मोदीजी पंतप्रधान झाल्यावर सामान्य जनतेला बऱ्याच गोष्टींमध्ये रस वाटू लागला. आधी पंतप्रधान परदेश दौऱ्यावर गेले कधी..आले कधी..तिथे काय झालं हे सगळं ना माध्यमं दाखवत होती (काही विशेष घडत नसावं) ना त्यात सामान्य जनतेला रस होता.आता मात्र त्यांचे परदेश दौरे गाजायला लागले. कित्येक ठिकाणी त्यांचं होणारं स्वागत बघून ,त्यांना दिला जाणारा मान बघून भारतीयांच्या माना ताठ झाल्या. त्यांच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करत त्यांनी कित्येक देशांबरोबर मैत्रीचे संबंध वाढवले!आपल्यावर शेकडो वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना त्यांच्या पार्लमेंटमध्ये जाऊन संबोधित करणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान ठरले.एकामागून एक संकटं झेलत भारताला पुढे न्यायची त्यांची जिद्द बघून आपण अक्षरशः नतमस्तक होतो.भारताच्या सैनिकांवर झालेल्या हल्ल्यांनंतर "सौगंध मुझे इस मिट्टी की" हे म्हणत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे कठोर निश्चयी भाव प्रत्येक भारतीयाला आश्वस्त करत होते.पाकिस्तान आणि भारताच्या मध्ये बोलण्यासाठी कोणत्याही तिसऱ्या देशाची आवश्यकता नाही हे अमेरिकेच्या राष्टाध्यक्ष महोदयांना त्यांनी हसत हसत आणि तितक्याच ठामपणे सांगितलं.

अशक्य वाटणाऱ्या कित्येक गोष्टी त्यांनी शक्य करून दाखवल्या.370 कलम रद्द करून आज सतत धगधगत असणाऱ्या काश्मीरच्या नंदनवनाला पुन्हा एकदा स्वर्गीय रूप प्राप्त करून दिलं.रामाची अयोध्या सजली!कित्ती ताकद आहे त्यांच्या बोलण्यामध्ये हे वारंवार अनुभवायला मिळतं. Lokdown व्हायच्या आधी एक दिवस त्यांनी जनता कर्फ्यु पाळण्याचं आवाहन केलं होतं..कोणतीही जबरदस्ती नाही..फक्त जनतेसमोर येऊन परिस्थिती समजावून सांगत केलेलं आवाहन! ..आणि 135 कोटींचा देश त्या रविवारी स्तब्ध होता !! हा माणूस एवढं कळकळीने सांगतोय म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर प्रसंग आहे हे कळून सगळा देश थांबला! लहान मुलं तर 'मोदी आबांनी सांगितलंय ना मग घरातून बाहेर जायचं नाही ' असं मोठ्याना सांगत होती! हा आहे विश्वास!

सध्याच्या भीषण आर्थिक परिस्थितीतून फक्त आपला देशच नव्हे तर सगळं जग जातं आहे. पण माझ्यासारख्या सामान्य माणसाचा माझ्या पंतप्रधानांवर पूर्ण विश्वास आहे ...ते नक्की देशाला चीनच्या आर्थिक गुलामगिरीतून बाहेर काढून एक नवीन आत्मनिर्भर भारत तयार करतील.मोदींजींबद्दल किती लिहावं! खूप काही आहे लिहिण्यासारखं पण मी असं लिहीत गेले तर दिवस कमी पडेल !!त्यांचं वक्तृत्व...त्यांची सलग 2 -2 तास बोलण्याची( सुसंबद्ध) ताकद ...त्यांचं राष्ट्रप्रेम...त्यांचं सैनिकांवरच प्रेम...त्यांची राष्ट्रनिष्ठा... त्यांचा योगाभ्यास...त्यांची राजनीती...त्यांचं टीका करणाऱ्यांना योग्य कृतीने उत्तर देणं...त्यांचं रामासमोर नतमस्तक होणं.. त्यांचं लष्कराची ताकद वाढवणार धीरोदात्तपणे केलेलं भाषण ..त्यांचं कुटुंबप्रमुख म्हणून भारतीयांशी संवाद साधणं..हे आणि अशा कित्ती गोष्टींवर बोलू! किती लिहू!!.. थोडं राखून ठेवतो 2024 च्या निवडणुकीनंतर त्यांचं अभिनंदन करायच्या लेखासाठी !!तर माझ्यासारख्या भक्तमंडळींच्या देवाचा आज जन्मदिवस!! आज आम्हा भक्तमंडळींची परमेश्वराकडे एकच प्रार्थना -- तुझ्या देवत्वाचा अंश असलेल्या आमच्या ह्या निष्कलंक पंतप्रधानांना उदंड निरोगी आयुष्य लाभू दे!!

सहकार्य : यशश्री मनोज भिडे, दापोली

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.