स्प्राउट्स Exclusive
मुंबई (जगदीश काशिकर) - ऑनलाईन बेटिंग म्हणजेच जुगार खेळणे, हे भारतामध्ये बेकायदेशीर आहे. भारतात अशा जुगार चालवणाऱ्या कंपनीच्या मालकाने त्याच्या वाढदिवसानिमित्त दुबईमध्ये पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीज उपस्थित होते. वास्तविक या मालकावर मुंबईत बलात्कारासारख्या गंभीर गुन्हा दाखल आहे. तरीही हा मोकाट फिरत आहे. या पार्टीचा व्हिडीओ 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आला आहे. 'लायन बुक', अंबानी बुक, महादेव बुक, रेड्डी अण्णा बुक, मँगो ७७७ बुक, एस डी ऑनलाईन बुक अशा विविध बुकी कंपन्या सध्या भारतात ऑनलाईन बेटिंग चालवत आहेत. हा सारा धंदा बेकायदेशीरपणे चालवला जातो. भारतातील इंटरनेट जाणणाऱ्यांपैकी ४० टक्के युजर्स हे ऑनलाईन बेटिंग खेळतात. यातूनच कोट्यवधी रुपयांची काळी माया या कंपन्या गोळा करतात. यातील लायन बुक या कंपनीचा मालक हा हितेश खुशलानी ( Hitesh Khushalani ) आहे. खुशलानी याच्यावर मुंबईत बलात्कार केल्याचा आरोप आहे. हा कथित बलात्कारी सध्या दुबईमध्ये वास्तव्यास असल्याचे समजते.
मध्यंतरी दुबई येथे खुशलानी यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टी आयोजित करण्यात आलेली होती, या पार्टीचा व्हिडीओ 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्वेस्टीगेशन टीमच्या हाती आलेला आहे. या पार्टीमध्ये संजय दत्त, सुनील शेट्टी ( Suniel Shetty ), शमिता शेट्टी, उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela ), नरगिस फाखरी ( Nargis Fakhri), आफताब शिवदासानी (Aftab Shivadasani ) सारखे असंख्य चित्रपट कलाकार उपस्थित होते. खुशलानी सारखा कथित बलात्कारी आरोपी दुबईत खुलेआम फिरत आहे आणि भारतात ऑनलाईन बेटिंगचा धंदा चालवतो, त्याचे ऑनलाईन प्रमोशनही नामांकित चित्रपट कलावंत करीत आहेत. हे प्रमोशन सोशल मीडियावरुन खुलेआम होत आहे.
मुंबई पोलिसांना हा हितेश खुशलानी अद्याप सापडत नाही, हे हास्यास्पद आहे. खुशलानी यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहणाऱ्या या कलावंतांची चौकशी का होत नाही, त्यांना चौकशीसाठी का ताब्यात घेतले जात नाही, त्याच्या कंपनीने प्रायोजित केलेल्या चित्रपटावर अद्याप बंदी का घातली जात नाही, हे सारे संशयास्पद आहे.अभिनेता सैफ अली खान व हृतिक रोशन या कलाकारांचा विक्रम वेधा (Vikram Vedha) हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाला 'लायन बुक' या बुकी म्हणजेच ऑनलाईन बेटिंग खेळणाऱ्या कंपनीने प्रायोजित केले आहे. भारतात ऑनलाईन बेटिंग खेळण्यावर बंदी आहे, त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही 'स्प्राऊट्स'च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने केली होती. तशी तक्रारही केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याकडे केली आहे, मात्र सरकारने याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे आढळून आले आहे.