श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळ तर्फे सामाजिक सहल.!

बल्लारपुर (का.प्र.) - बल्लारपूर नगर धनोजे कुणबी समाज संचालित संत तुकाराम महाराज सेवा मंडळ बल्लारपूर- बामणी यांचे कडून सामाजिक उपक्रमाअंतर्गत निसर्ग सहलीचे आयोजन करण्यात आले . या वर्षी हि सहल जिवती तालुक्यातील निसर्गरम्य वनराईने आच्छादलेल्या माणिकगड किल्ला येथे काढण्यात आली. या सहलीत 150 समाज बांधवांनी आपल्या धकाधकीचे जीवनातील एक दिवस आनंद, उत्साह व ज्ञानार्जनात घालविला.
या सहलीत सुरुवातीला अंबुजा सिमेंट येथील आकर्षक अशा राधा-कृष्ण मंदिरात भेट देण्यात आली ; त्यानंतर माणिकगड सिमेंट कारखान्या जवळील अमलनाला धरणाच्या विहंगम देखाव्याचा आनंद समाज बांधवांनी घेतला . लगतच्या शंकरदेव मंदिराला भेट देवून अमलनाला धरण येथून 11 कि.मी. अंतरावर असलेल्या व वनविभाग जिवती यांचे देखरेखीत असलेल्या माणिकगड किल्ल्याचे पायथ्याशी पोहोचले. सुरुवातीस पार्किंग स्थळी अतिशय दाटीवाटीने अनेक वृक्ष व त्यावरील लाल तोंडाची माकडे मनमोहक वाटतात. वनविभागाचे परवानगीने तिकीट घेऊन किल्ल्यावर चढण्यास सुरुवात केली . अतिशय मजबूत व सुंदर असा पहिला व दुसरा दरवाजा जो परस्पर समोरासमोर दिसत नाही असा, ओलांडून 3 कि.मी. ची भ्रमंती करण्यात आली त्यात संत्री बुरुज, रेहाळणी बुरुज, तोफ, पाताळ विहीर, निजामगोंदी दरवाजा, राणी महल, राणी तलाव, अतिशय सुंदर बांधकाम असलेली ठिकाणे किल्ल्यात पाहता आली. हा किल्ला 9 व्या शतकात नागवंशीय राजानी बांधला व 12 व्या शतकापर्यंत तेथे त्यांचे वास्तव्य होते नंतर गोंडवंशिय अखत्यारीत हा किल्ला साधारणतः 17 व्या शतकापर्यंत होता. नागवंशिय कुलदेवता माणिक्यादेवी यांचे नावावरून किल्ल्यास माणिकगड असे नाव मिळाले. पार्किंग जवळचे ऐतिहासिक असे हेमाडपंथी बांधकाम असलेले शंकर व विष्णू मंदिर आहे. ते अजूनही चांगल्या स्थितीत आहे. अशा प्रकारे एक दिवसाची सहल जगन्नाथ बाबा मंदिर गडचांदूर येथे सहभोजनाचा कार्यक्रम करून सहल संपन्न करण्यात आली.
सहल यशस्वी करण्यासाठी श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री पी.यु.जरीले , उपाध्यक्ष प्रा. एम.यु.बोंडे, सचिव प्रा. राजेंद्र खाडे, सहसचिव श्रीमती कमलताई वडस्कर , कोषाध्यक्ष श्री विनायकराव साळवे , संचालक श्री मनोहर माडेकर, श्री गजानन घुगुल, श्री शामसुंदर धांडे, श्री किसन पोडे,श्री युगराज बोबडे, श्री भास्कर वडस्कर व युवा आघाडी अध्यक्ष श्री विवेक खुटेमाटे, उपाध्यक्ष श्री प्रविण बरडे, श्री कुणाल कौरासे, सचिव श्री अतुल बांदूरकर , महिला आघाडी अध्यक्ष सौ वंदना पोटे उपाध्यक्ष सौ किरण बोबडे, सचिव सौ सोनाली काकडे तसेच इतर समाजबांधव श्री सूर्यभान मालेकर , श्री अशोक घुंगरुड , व्यवस्थापक श्री चंद्रभान वाढई, सहा. व्यवस्थापक श्री सागर ठावरी , व संत तुकाराम महाराज सेवा मंडळाचे कार्यकारी मंडळाने अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.