शेगांव (वि.प्र.) - शेगावहून १५ किलोमीटर अंतरावर मन नदीच्या काठी कवठा व बहादुरा ही छोटी दोन खेडी आहेत. बहादूरा आहे गाव बाळापूर या तालुक्यात आहे. या छोट्याशा खेडेगावात इसवीसन १८२१ साली चैत्र शुद्ध पंचमीला सखाराम माळी यांचा जन्म झाला. त्यांच्या घरात वारकरी संप्रदायाचा पगडा असल्याने दरवर्षी पंढरपूरच्या वारीची प्रथा होती. त्या काळानुसार सखाराम पाटलांचा लहानपणीच विवाह झाला. वयाच्या ४० वर्षापर्यंत त्यांना मूलबाळ होते. दरवर्षी पंढरपूरची वारी करण्याचा त्यांचा नेम त्यांनी कधी चुकविला नाही. एक दिवस पंढरपुरास येऊन त्यांनी विठ्ठला साकडे घातले,"हे पांडुरंगा, दीनांच्या नाथा! मला माझा वंश चालण्यासाठी एखादा मुलगा दिल्यास मी ताबडतोब संन्यास घेईल". काही दिवसांनी त्यांच्या पत्नीस दिवस गेले. पांडुरंगाने आपले ऐकले याची त्यांना खात्री झाली. आपण पांडुरंगा जवळ 'मुलगा झाल्यास संन्यास घ्यायचे' बोललो होतो याचीही आठवण त्यांना झाली. मुलगा जन्माला येण्याच्या आधीच त्यांनी संन्यास घ्यायचे ठरवले. एक दिवस पत्नीला सांगून अंगावरचा कपड्यानिशी त्यांनी गृहत्याग केला. जाण्यापूर्वी त्यांनी पत्नीला सांगितले की आपल्याला मुलगा झाल्यास त्याचे नाव पंढरी ठेवावे. त्याकाळी प्रवासाची साधने नव्हती. ते प्रथम पंढरपूरला आले व विठ्ठलालाच त्यांनी सांगितले की 'आता मी पूर्णपणे आपला झालो आहे. संन्यास धर्माचे मी काटेकोरपणे पालन करील'. हाती पताका आणि मुखाने विठ्ठलाचा जयघोष करीत ते अनेक तीर्थक्षेत्री पायी फिरले. त्यांना एक सोबती मिळाले ते म्हणजे नाथ महाराज. दोघेही अनेक तीर्थक्षेत्रे पायी फिरले व केवळ भिक्षेवर ते उदरनिर्वाह करीत असत. बारा वर्षे सतत फिरत राहून ते नाशिकला आले असताना त्यांचे सोबती नाथ महाराजांनी त्यांना आठवण करून दिली की, सखाराम, मुलाच्या भेटीस जातोस की नाही. तेव्हा त्यांना कळले की आपला मुलगा बारा वर्षाचा झाला असेल. त्यांना गृहत्याग करून जवळजवळ एक तप लोटले होते.
इकडे इसवीसन १८६२ म्हणजेच आषाढ शुद्ध दशमीला सखाराम माळी यांना पुत्ररत्न झाले. त्याचे नाव वडिलांनी सांगितल्याप्रमाणे 'पंढरी' ठेवले गेले. सखाराम माळी व नाथ महाराज मुक्काम, दर मुक्काम करीत आपल्या गावी बहादूर येथे आले व गावाबाहेरील हनुमान मंदिरात थांबले. गावात कोणी संन्यासी गोसावी आले आहेत म्हणून गावातील लोक दर्शनास आले. समवयस्क, म्हाताऱ्या लोकांनी सखाराम बुवांना त्यांचा चेहरा मोहरा बदलला असला तरी अचूक ओळखले. गावात चर्चा सुरू झाली. त्यांची पत्नी आपल्या बारा वर्षाच्या पंढरीला घेऊन हनुमानाचा मंदिरात गेली. तिनेही आपल्या पतीस ओळखले आणि सर्वांनी त्यांना घरी येण्यास विनंती केली. 'पण मी संन्यास घेतला आहे. त्यामुळे मी आता घरी येणार नाही' असे पत्नीला त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पुढे काही दिवसातच म्हणजेच फाल्गुन शुद्ध दशमीला ते अनंतात विलीन झाले. मारुती मंदिरातच त्यांना समाधी देण्यात आली. गावकऱ्यांनी त्यांची समाधी जीर्णोद्धार करून जतन केली आहे.
त्याकाळच्या चालीरीतीप्रमाणे पंढरी माळी यांचा विवाह बालपणीच पिंप्राळा गावातील पाटलांच्या मुलीसोबत झाला होता. त्यांची पत्नी पुतळाबाई ही श्रीमंत घराण्यातील होती. पंढरी पाटील हे सर्वसाधारण शेतकरी असले तरीही सत्यवचनी व धार्मिक प्रवृत्तीचे होते. घराण्याचा परंपरेप्रमाणे त्यांच्या घरी दरवर्षी पंढरपूरच्या वारीची प्रथा होती. ते स्वभावाने प्रेमळ परंतु अबोल होते. पिंप्राळा हे गाव शेगाव हून अगदी जवळ आहे. पत्नीस तिच्या माहेरी घेऊन जाणे व तेथून आणणे या माध्यमाने त्यांचे शेगावला जाणे येणे होत असे. शेगावातील मारुती मंदिर (सीतामाता मंदिर) हा त्यांच्या येण्या जाण्याचा रस्ता होता. प्रवास बैलगाडीने असायचा. महाराजांचा मुक्काम शेगावातील मारुती मंदिरातच असल्याने जाता येताना ते महाराजांचे दर्शन घेऊनच पुढे जायचे. दोघेही पती-पत्नीचे श्री गजानन महाराजांवर श्रद्धा होती. पुतळाबाईंच्या वडिलांकडेही पांडुरंग हे आद्य दैवत असल्याने त्यांच्यावरही बालपणापासून वारकरी संप्रदायाचा पगडा होता. सासरची मंडळी ही वारकरी संप्रदायाची असल्याने दुग्ध शर्करा योग घडून आला होता. पंढरी पाटील यांना नंतर 1910 मध्ये एक मुलगा झाला. त्याचे नाव सदाशिव. महाराजांच्या कृपेने वंशाचा वारस लाभला. ही केवळ महाराजांची कृपा होती. अशा या थोर गजानन भक्ताचा पंढरपूर वारीचा नेम अखेरपर्यंत कायम राहिला. महाराजांच्या सेवेत त्यांनी कमतरता ठेवली नाही.
शके १८२४ आषाढ शुद्ध एकादशी, इसवीसन १९०२ (दिनांक १६/०७/१९०२) बुधवार. आषाढी एकादशी. पंढरी पाटील (माळी) सालाबादाप्रमाणे पंढरपूरला पोहोचले. सर्व माणसे कुकाजी पाटलांच्या वाड्यावर उतरत असत त्याचप्रमाणे पंढरी पाटील देखील नेहमी तेथेच उतरत असत. संत श्री गजानन महाराज व त्यांच्या सोबतीची जवळपास ५० माणसे या वाड्यातच मुक्कामासाठी असत. त्यावर्षी पंढरपुरात मरीची (कॉलरा) साथ पसरली होती. दुर्दैवाने कवठेबहादूरचे पंढरी माळी मरीने आजारी झाले. त्यावेळेला श्री गजानन महाराजांनी या कवठेबहादूरच्या पंढरी पाटील वारकऱ्याचे गंडांतर टाळले. महाराजांनी त्या वारकऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि क्षणार्धात त्यांच्या उलट्या व ढाळ बंद होऊन शक्ती वाटू लागली व तो लगेचच उभा राहिला.
संतांनी ज्याला सावरले त्याला यम कसा खेचून येईल? तो वारकरी घटकेत पहिल्यासारखा होऊन महाराजांसोबत चालू लागला. शेगावहून त्या वारकऱ्यास बहादूर या त्याच्या गावी पोहचते केले गेले. पंढरी माळी यांना महाराजांनी वाचविले व आपल्या सोबत शेगाव पर्यंत आणले ही चर्चा सर्वत्र पसरली. बहादूर गावातील लोकांनाही समर्थांच्या कृपेची महती कळली. पुतळाबाईंनी महाराजांचे मनोमन आभार मानले कारण महाराजांनी तिचे सौभाग्य राखले होते.
महाराज म्हणतात की "संकटकाळी कुणालाही एकटे सोडून जाऊ नये. आपल्या प्रांतातील माणसाविषयी आपल्या मनात प्रेम असले पाहिजे". आज मात्र तसे दिसत नाही. आपण शेजाऱ्यासही ओळख द्यायला तयार नसतो. जर एखादा संकटात असेल तर आपण त्याचे कडे प्रेमाने किंवा सहानुभूतीने न पाहता उलट उपहासाने बघून तेथून चालते होतो. त्यांच्याकडे न पाहता आपण तोंड लपवतो. महाराजांना ते मान्य नाही. आपल्या प्रांत प्रेमातच राष्ट्रप्रेम लपलेले आहे. आपण केवळ स्वतःचाच स्वार्थ पाहतो. त्यामुळे प्रांत तर दूरच पण आपल्या गावाचाही विचार आपल्या मनाला स्पर्शून जात नाही. परस्परांमधील प्रेमातच सर्व काही आहे. शेजाऱ्या पाजाऱ्यांची सुखदुःखे, आजूबाजूस असलेल्या माणसांच्या मरण यातना बघून ज्याच्या मनात सहानुभूती निर्माण होत नाही, त्यांच्याविषयी ज्यांना प्रेम वाटत नाही तो राष्ट्रप्रेमी असूच शकत नाही.
कवठे-बहादूर चा वारकरी पंढरी पाटील (माळी) आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.