शेगांव (वि.प्र.) - आत्माराम भिकाजी देशपांडे हे अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उच्च प्रांतिक अधिकारी होते. ते कायस्थ प्रभू जातीचे असून सदाचारसंपन्न गृहस्थ होते. त्यांना संतांविषयी प्रेम व भक्ती होती. मोठ्या अधिकार पदावर असूनही त्यांना त्याचा अहंकार नव्हता. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत धार्मिक असे होते. अमरावतीमध्ये आत्माराम भिकाजी देशपांडे यांचे दोन मोठे बंगले होते. बंगल्याच्या भोवती 33 एकर जमिनीमध्ये फळांचा मोठा बगीचा होता. आत्माराम पंतांचे निवासस्थान म्हणजे महाराजांचे अमरावती मधील हक्काचे निवासस्थान असायचे. महाराज केव्हा येतील याचा नेम नसे. तेथे मुक्काम करूनच महाराज अन्यत्र ठिकाणी जात असत. महाराज आले की त्यांची उत्तम व्यवस्था केली जात असे. घरात मोठा उत्सव असल्यासारखे स्वरूप येत असे. महाराजांचा मुक्काम असेपर्यंत अन्नदानाच्या पंगती उठत.
आत्माराम पंतांचे एकमेव चिरंजीव कृष्णराव देशपांडे, हे देखील श्री गजानन महाराजांचे निस्सीम भक्त होते. महाराज तर कृष्णराव यांना 'बाबा" म्हणायचे आणि त्यांच्याकडे मुक्कामाला आले की म्हणायचे "बाबा मी आलो". कृष्णरावांना इतर सर्व लोक देखील 'बाबा' या नावाने संबोधत असत. कृष्णरावांच्या दिवाणखान्यात महाराजांसाठी एक वेगळी गादी तयार केलेली होती. महाराज त्या गादीवरच बसत असत व विश्राम करीत असत. मात्र तेथे बसणे व आराम करणे हे महाराजांचा लहरीवर अवलंबून असे. आत्माराम भिकाजी सुत म्हणजेच कृष्णराव यांची पत्नी कृष्णाबाई ही नानासाहेब चिटणीसांची मुलगी. नानासाहेब चिटणीस हे इसवी सन १८५० च्या अगोदर पासून नागपूरचे राजे भोसले यांचे मंत्री होते. सर गंगाधरराव चिटणीस आणि सर शंकरराव चिटणीस हे दोघे कृष्णा बाईचे सख्खे भाऊ. दोघेही देवभक्त. भावांप्रमाणे बहीणही धार्मिक व श्रद्धाळू होती. धर्म संस्कारात वाढलेली असल्याने देशपांडे कुटुंबीयांशी त्यांचे सख्य जडले. दोन्हीही कुटुंब धर्म व परमार्थ विचारांची होती. कृष्णाबाई कुटुंबीयांच्या संत सेवेचा वारसा जपणाऱ्या होत्याच. त्यांच्या वडिलांकडेही संतांचा मानसन्मान, पूजाच्या होत असे त्यामुळे त्यांना या कार्यात विशेष आनंद होत असे. गंगाधर राऊत चिटणीसांकडे प्रज्ञाचक्षु संत श्री गुलाबराव महाराज उन्हाळ्यात मुक्कामास येत. कृष्णाबाईंच्या आईस संत ताजुद्दीन महाराज आपल्या आईप्रमाणे मानित असत. ते अनेक वेळा चिटणीसांकडे येत असत. संत 'श्री सोनाजी महाराजांनी' स्वतःचा मठ चिटणीसांकडे स्थापन केला. आजही हा मठ 'सोनाजी महाराजांची वाडी' या नावाने चिटणीसपूरा ,महाल ,नागपूर येथे प्रसिद्ध आहे.अशा या संतकृपा असलेल्या चिटणीस कुटुंबाचा अमरावतीच्या देशपांडे कुटुंबीयांची संबंध जुळून येणे ही गोष्ट पूर्वजन्मीच्या पुण्याईच्या खुणा स्पष्ट करणारी ठरते. कृष्णाराव यांना दोन मुले माधवराव उपाख्य सख्याहरी आणि मनोहरराव. माधवरावांना वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत श्री गजानन महाराजांची प्रत्यक्ष सेवा घडली. मनोहरराव हे मात्र लहान होते.
श्री गजानन विजय अध्याय क्रमांक दहा मध्ये जे वर्णन आले आहे तो प्रसंग शके १८२८ अश्विन शुद्ध ९, बुधवार दि. २६.०९.१९०६ रोजी घडला. आत्माराम पंत महाराजांच्या दर्शनासाठी शेगावी आले व नवरात्र पूजनासाठी महाराजांना अमरावती घेऊन गेले. त्यांच्या कुळाचाराप्रमाणे होणाऱ्या नवरात्रीच्या समारंभासाठी महाराज ही आनंदाने अमरावतीला गेले. महाराजांच्या कुटुंबीयांवर विशेष प्रेम होते. महाराज तिथे गेल्यानंतर त्यांचे जसे पूजन झाले त्याचे समर्पक वर्णन संत कवी श्री दासगणू यांनी गजानन विजय ग्रंथात केले आहे. सद्गुरूंच्या पूजनाचा झालेला समारंभ डोळ्याचे पारणे फेडणारा होता. प्रत्यक्ष स्वर्गीय आनंद. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी निर्गुणाने सगुण होऊन हा विदेही अवतार धारण केला होता. तो सोहळा पाहणाऱ्यांना सुखाची कोणती अनुभूती झाली असेल हे त्यांनाच ठाऊक. त्याचे वर्णन करण्यास शब्दही थिटे पडतात. अशाप्रकारे महाराजांचे पूजन आत्माराम भिकाजी देशपांडे यांच्या घरी झाली. या पूजनाच्या वेळी बाळाभाऊ तेथे हजर होते. यावेळीच गणेश आप्पांसारखे निस्सिम सेवक, बाळाभाऊंसारखे समर्पण करणारे शिष्य महाराजांच्या सेवेत समाविष्ट झाले हे न विसरण्यासारखे आहे. बाळाभाऊ प्रभू व कृष्णराव देशपांडे हे एकमेकांचे आत्ते- मामेभाऊ होते.
कृष्णरावांचे चिरंजीव मनोहरराव यांना बालपणी महाराजांचे दर्शन घडले. महाराजांच्या पाद्यपूजन सोहळा समयी ते चार वर्षाचे असावेत. त्या संतदर्शनाने, आशीर्वादाने व घराण्याच्या सुसंस्कारांनी मनोहरराव ही ईश्वर भक्त बनले. ते सतत श्रीरामाचानामाचा जप करीत असत. त्यांनी वीस वर्षात 13 अक्षरी तारक मंत्राचा 25 लाख इतका जप लिहून चाफळ येथे श्री रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या श्रीराम मंदिरात अर्पण केला. तेथे सव्वा कोटी वेळेला तेरा अक्षरी तारक मंत्र लिहिलेल्या साहित्याची खोली तयार केली आहे. त्यात एक पंचमांश जप एकट्या मनोहररावांचा आहे. त्या खोलीस भक्तगण आजही प्रदक्षिणा घालतात. त्याव्यतिरिक्त त्यांनी साडेसात कोटी रामनामाचा जप केला होता. त्यांना श्रीराम प्रभूंचे प्रत्यक्ष दर्शन घडले होते. त्यांची पत्नी राधाबाई ही देखील फार धार्मिक व श्रद्धाळू होती.
अशा भाग्यवान आई-वडिलांच्या घरात जन्म लाभलेले राजाराम हे परमार्थ पुण्यकार्यात अग्रेसर आहेत. परम पूजनीय अच्युत महाराजांचा त्यांना सहवास लाभला आहे. राजाराम देशपांडे यांनी सांगितल्याप्रमाणे, कृष्णराव देशपांडे यांच्याकडे अमरावती येथे गजानन महाराजांचा मुक्काम असे. त्यावेळी अनेक लीला व चमत्कार घडत असत. अनेकांचे रोग केवळ दर्शनाने बरे होत असत. अनेकांच्या मनोकामना पूर्ण होत असत. भोजनाची पंगत सुरू असताना कितीही लोक जेवून गेले तरी अन्न कमी पडत नसे. त्याचप्रमाणे महाराज आले म्हणजे आजूबाजूचे मळ्यातील पक्षी पशु सुद्धा निर्भय होऊन महाराजांच्या जवळ येऊन बसत असत. अशावेळी त्यांना त्यांचा आहार देण्यात येत असे. प्रत्येक भक्तगण काही ना काही मागणे घेऊन येत असे आणि प्रत्येकावर महाराजांची कृपा होत असे. नागपूरच्या श्री राजाराम देशपांडे यांच्या सारख्या भाग्यवान माणसाकडून ही माहिती उपलब्ध झाली. संतांची त्यांच्यावर कृपा आहे. हा संतकृपेचा वारसा असून तो पुण्याईने प्राप्त होतो. महाराजांच्या कृपा प्रसादाचा हा महिमा आहे. प्रत्यक्ष संतांची कृपा ज्या घरावर होते त्या घरात येणारे जीव परमार्थात, भक्तीत, संत सेवेत कसे तत्पर असतात याचा प्रत्यक्ष दाखला आजही आत्माराम पंत भिकाजी देशपांडे यांच्या वंशजांच्या रूपाने दिसून येतो.
आत्माराम भिकाजी सुत - श्री. कृष्णराव देशपांडे आणि इतर श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित "श्री गजानन महाराज चरित्र कोश" हा ग्रंथ पहावा.