व्यावहारीक बाजारूपणा साहित्यात येणे समर्थनीय ठरू शकत नाही- गंगाधर मुटे
भद्रावती (ता.प्र.) - “साहित्य कसे असावे हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही पण; साहित्य् कसे असू नये याची मात्र हक्काने मिमांसा करता येते. ज्या समाजात आपण जगतो त्या समाजासाठी एखादे साहित्य पुरक नसले तरी मारक मात्र असता कामा नये. मानवी समाजाच्या जिवनप्रवाहाला कुंठीत करणारे आणि समाजाच्या उत्कांतीला विकृत दिशा देणारे साहित्य असेल तर त्याला कडाडून विरोध करण्याची जबाबदारी सर्वांनी उचलली पाहीजे. खपेल ते पिकेल असा व्यावहारीक बाजारूपणा साहित्यात येणे कदापिही समर्थनीय ठरू शकत नाही.” असे परखड विधान ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर मुटे यांनी स्मृतिगंध काव्य संमेलनात बोलतांना केले. दिनांक 19 मार्च ला स्व. विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठान भद्रावतीच्या वतीने आयोजीत सहाव्या विदर्भ स्तरीय स्मृतिगंध काव्य संमेलनात संमेलनाध्यक्ष पदावरून ते बोलत होते. यावेळी काव्यमंचावर संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तीर्थराज कापगते नागपूर, आचार्य ना.गो.थुटे वरोरा, प्रख्यात कादंबरीकार डॉ. अनंता सूर वणी, सामाजीक कार्यकर्ते ऍड. भुपेंद्र रायपुरे ईत्यादी मान्यवरांची प्रमूख उपस्थिती होती.
आपले विचार मांडतांना श्रीयुत गंगाधर मुटे पुढे म्हणाले की, ’’स्वत:ची अभिव्यक्ती प्रकट करण्यासाठी साहित्त्य असते. प्रेक्षकांच्या फर्माईशीनुसार ऍटम पेश करणे, असा साहित्याचा तमाशा होणे समाजाच्या आरोग्याला कधीही पुरक ठरणार नाही. याची जाणीव ठेऊन सृजकांनी सामाजीक जाणीव स्विकारण्याचा प्रयत्न केला पाहीजे.”
या संमेलनाच्या निमित्ताने उद्घाटनपर मनोगत व्यक्त् करतांना ज्येष्ठ समीक्षक डॉ. तीर्थराज कापगते म्हणाले की, “कवी हा द्रष्टा असतो. तो देवाचा लाडका आहे. जगाची वेदना, संवेदना जागृत करण्याचे काम कवी करीत असतो. रसिक हा मुका कवी असतो आणि कवी हा बोलका रसीक असतो. त्यामुळे कवींची समाजाला फार गरज आहे”, असे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी केले.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये संमेलनाध्यक्ष गंगाधर मुटे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रीत कवींचे बहारदार कविसंमेलन संपन्न झाले. विदर्भातील प्रतिभाशाली कवींनी आपल्या सादरीकरणाने या काव्य रसिकांची मने जिंकली. संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात ज्येष्ठ गझलकार राजेश देवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्मृतिगंध गझल मैफिल संपन्न झाली. याप्रसंगी राम रोगे नांदाफाटा, सुरेश शेंडे गडचिरोली या मान्यवर गझलकारांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. मैफिलीमध्ये विदर्भातील प्रथीतयश गझलकारांचा समावेश होता. सर्वच गझलकारांच्या बहारदार सादरीकरणाने संमेलनात रंगत भरली.
संमेलनाच्या चवथ्या सत्रामध्ये ज्येष्ठ कवी दिपक शिव आनंदवन यांच्या अध्यक्षतेखाली खुले कवी संमेलन पार पडले. यावेळी काव्यमंचावर विवेक पत्तीवार चंद्रपूर, शंकर लोडे चंद्रपूर, निरज आत्राम वरोरा, माधव कौरासे भद्रावती ईत्यादी ज्येष्ठ कवींची प्रमुख उपस्थिती होती. खुल्या कवी संमेलनात देखील नवोदितांनी आपल्या काव्य प्रतिभेणे रसिकांची मने जिंकली.
उद्घाटन सत्राचे सुत्रसंचालन डॉ. ज्ञानेश हटवार यांनी केले. निमंत्रीतांच्या कवीसंमेलनात अभय दांडेकर हिंगणघाट, यांच्या सुत्रसंचलाने रंगत भरली तर सुनिल बावणे बल्लारपूर यांनी आपल्या बहारदार सुत्रसंचलनाने गझल मैफिल सजविली. आरती रोडे वरोरा यांच्या सुत्रसंचलनाने खुल्या कविसंमेलनाला चार चांद लावले. आभार डॉ. सुधीर मोते व प्रवीण आडेकर यांनी मानले. यावेळी दिवसभर चाललेल्या भरगच्च काव्य संमेलनात कवी , रसीक, श्रोत्यांनी मोठ्या संखेत हजेरी लावली.सकाळी 11वाजे सुरु झालेले कवीसंमेलन रात्री 9 वाजे पर्यंत लावला हे या काव्य संमेलाचे विषेश.