शेगांव (वि.प्र.) - कोल्हापूर येथील श्रीधर गोविंद काळे यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. ते इंग्रजी शाळेत शिकले. मॅट्रिक पास झाले पण इंटरच्या परीक्षेत नापास झाले. एकदा वर्तमानपत्र वाचता वाचता त्यांनी केसरी मध्ये ओयामा आणि टोगो यांचे चरित्र वाचले आणि जपान मध्ये जाऊन यंत्रविद्या शिकावी अशी स्फूर्ती त्यांना आली. जसा ओयामा-टोगो यांनी जपानचा अभ्युदय घडवून आणला त्याप्रमाणे आपणही भारताचा उद्धार करावा, असा विचार त्यांच्या मनाने केला. परंतु परदेशात जाणार कसे ? त्यासाठी भरपूर पैसा हवा. तो तर नाही. कुणाकडून मदत मिळण्याची आशा देखील नव्हती. अशा विचारातच ते एकदा त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी भंडारा येथे गेले. तो मित्र मन्रो हायस्कूलमध्ये शिक्षक होता.
ते दोघे कोल्हापूरला जाताना मध्ये शेगावला उतरले आणि गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी गेले.
त्यावेळी गजानन महाराजांनी सांगितलेल्या ज्ञानाने श्रीधरांच्या चित्तात विचारक्रांती झाली. महाराजांचे शब्द म्हणजे ईश्वरमुखातून आलेले शब्द ब्रह्म होते. त्यात परिवर्तनाची क्षमता होती. महाराजांचा एक एक शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य. कारण महाराज स्वतः 'प्रत्यक्ष ब्रह्म' होते. त्यांचे शब्द मौनातून उमटलेले, साकारलेले, आत्म्यात शक्ती ओतणारे आणि चैतन्याचा साक्षात्कार करणारे होते.
महाराजांच्या वचनावर श्रीधर काळे यांनी विश्वास ठेवला. महाराजांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होते. त्या आशीर्वादाच्या बळावर त्यांचा भाग्योदय झाला. श्रीधर बी ए, एम ए झाले आणि शिवपुरी येथे कॉलेजमध्ये प्रिन्सिपल म्हणून नियुक्त झाले. ज्यांचा संतांवर विश्वास आहे, संतांवर श्रद्धा आहे, त्यांच्या भाग्याला तोटा नाही.
सद्गुरु गजानन महाराज म्हणतात की, भौतिकशास्त्राहून योगशास्त्र श्रेष्ठ आहे. योग म्हणजे आत्म्याचा परमात्म्याशी संयोग. आपल्यातील जीवाचे विश्वातील परमात्म्याशी मिलन, एकता घडवून आणण्याची शास्त्रीय प्रक्रिया. त्यासाठी शास्त्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला गेला आहे. हे देखील विज्ञानच आहे. परंतु त्यामध्ये अज्ञेयाचा शोध आहे. भौतिकशास्त्र जास्त मानत नाही किंवा जे नाही असे मानते आणि जे जाणवलेच जाऊ शकत नाही त्याच्या शोधाचे शास्त्र म्हणजे योगशास्त्र आहे.
श्रीधर गोविंद काळे आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तांची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पहावा.