शेगांव (वि.प्र.) - शेगाव येथे जानराव देशमुख नावाचे एक भले गृहस्थ राहत होते. एकदा ते कसल्याशा व्याधीने अंत्यवस्थ झाले. रोग बळावला व शरीरात शक्ती राहिली नाही. वैद्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली परंतु त्यांना यश आले नाही. डॉक्टरांनी त्यांची नाडी बघून सांगितले की,"या व्याधीवर आता काहीही इलाज नाही. यांचा जीव वाचण्याची शक्यता उरलेली नाही. आम्ही प्रयत्न केले तरी त्यामध्ये आम्हाला यश येणे आता शक्य वाटत नाही".
त्यांच्या आप्तांना जानरावांच्या अंतसमयी श्री गजानन महाराजांची आठवण झाली. शेवटचा प्रयत्न करून बघावा म्हणून महाराजांच्या कानावर ही गोष्ट घालावी असे ठरले. त्यानुसार घाई घाईने त्यांच्यातीलच एक नातेवाईक बंकटलालांच्या घरी आला. जानरावाची सर्व हकीकत त्याने बंकटलाल यांस कथन केली व "कृपा करून जानराव देशमुखांसाठी मला महाराजांचे चरण तीर्थ द्या. ते त्यांच्यासाठी अमृत म्हणून सिद्ध होईल व ते वाचू शकतील". असे तो नातेवाईक म्हणाला. तेव्हा बंकटलाल त्यास म्हणाले,"महाराजांचे चरण तीर्थ देणे मला शक्य होणार नाही तेव्हा तुम्ही माझ्या वडिलांना (भवानीराम) विनंती करा म्हणजे ते तुम्हाला नक्कीच मदत करतील."
भवानीराम सज्जन गृहस्थ होते तसेच ते मनाने दयाळू देखील होते. दुसऱ्याचे दुःख पाहून त्यांनाही दुःख होईल. त्यांनी त्या माणसाचे बोलणे ऐकले व त्यांना दया आली. त्यांनी एका भांड्यातून पाणी घेतले व त्यात आपल्या हाताने महाराजांच्या पायाचा अंगठा बुडविला.व "हे तीर्थ जानरावास देतो" अशी विनंती केली. महाराजांनीही मान तुकवून तीर्थ देण्यास संमती रूपाने होकार दिला.
त्या नातेवाईकाने आनंदाचे भरात व एक दिलासा मिळाल्यागत समर्थांचे चरणतीर्थ घाईघाईने नेऊन जानराव देशमुखास पाजले. तीर्थ प्यायला बरोबर घशाची घरघर बंद झाली व थोड्या अवधीतच जानराव हात हलवू लागले. त्यांची चेतना परत आली व डोळे किंचितसे उघडून ते आजूबाजूस पाहू लागले. अशाप्रकारे तीर्थामुळे त्यांना तात्काळ प्रचिती आली. शोकाकुल अवस्थेत बसलेल्या तेथील मंडळींना ही आनंद झाला व सर्वांना महाराजांचा अधिकार कळला. त्यानंतर औषधे बंद करून तीर्थावर भिस्त व श्रद्धा ठेवली गेली. जानरावांस त्यायोगे पुन्हा एकदा आरोग्य मिळाले.
पुढे जानरावांकडून निरोप आला की "आम्हाला योगेश्वराचे दर्शन घडवा". तेव्हा भवानीराम यांनी जानरावांच्या विनंतीला मान दिला व ते महाराजांना म्हणाले "महाराज जानरावांकडे चलता का?'. महाराज लगेचच होकार देत उठले व भवानीरामांच्या मागे चालू लागले. महाराजांच्या दर्शनाने सर्व आप्तमंडळी आनंदून गेली व सर्वांनाच महाराजांच्या दर्शनाचा योग घरबसल्या आला होता.
अवघ्या आठ दिवसात जानराव देशमुख पूर्ववत झाले आणि भवानीराम अग्रवाल यांच्या घरी ते महाराजांच्या दर्शनासाठी आले.
त्या प्रसंगापासून महाराजांच्या नावाने गावातील लोक नवस करू लागले व भंडारे करू लागले. महाराजांचा उदो उदो होऊ लागला. श्री दासगणू महाराजांनी हा प्रसंग फार वैशिष्ट्यपूर्ण शैलीने मांडला आहे. ते लिहितात, येथे एक शंका सहजपणे उद्भवू शकते ती म्हणजे शेगावात श्री गजानन महाराजांसारखा संत आहे. याचा अर्थ तेथील कोणीही यम सदनी जाणार नाही, मृत्यू पावणार नाही. परंतु हा कुतर्क आहे. संत निसर्गाप्रमाणे वागतात. ते मृत्यू टाळत नाहीत. ते संकटाचे निवारण करतात. याचे रहस्य एवढेच आहे की संत गंडांतर टाळतात. ते टाळणे सत्पुरुषांना अशक्य नाही.
जगात मृत्यूचे तीन प्रकार आहेत - अध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक अध्यात्मिक मृत्यू - हा मृत्यू वरील तीनही मृत्यूंमध्ये श्रेष्ठ व बलवान आहे. हा कशानेही टाळत नाही व तो कोणासही टाळता येऊ शकत नाही. तो अटळ आहे.
आधिभौतिक मृत्यू - हा मृत्यू कूपथ्यातून ओढावतो. औषधांच्या सहाय्याने याचा परिवार करता येतो. मात्र औषध देणाऱ्या त्या क्षेत्रातील तज्ञ असणे जरुरीचे आहे. ज्याला औषधांचे परिपूर्ण ज्ञान आहे असा वैद्य, डॉक्टर भेटल्यास आधिभौतिकाचा नाश होऊ शकतो.
आधिदैविक मृत्यू -हा मृत्यू नवसांद्वारे टाळता येतो. हा गंडांतर स्वरूपाचा मृत्यू आहे. जानरावांचा मृत्यू याच प्रकारचा होता.
गंडांतरामुळे येणारा मृत्यू संत निवारू शकतो. मात्र त्यांच्यावर श्रद्धा असणे महत्त्वाचे असते. संतांवर आपली खरी खरी श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे. अन्यथा असे घडत नाही. श्रद्धा जशी महत्त्वाची आहे तसेच त्या संतांमधील संतत्वही महत्त्वाचे. ज्याला नवस केला आहे तो खरा संत असला पाहिजे. षडविकार धुतल्या शिवाय अंगी खरे साधुत्व येत नाही. खरे साधू सापडणे ही अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. खऱ्या साधूची प्राप्ती झाली तरी त्यांच्यावर आपली श्रद्धा असणे हेही तितकेच महत्त्वाचे ठरते. सर्व भार संतांवरच सोपविला गेल्यास कोणत्याही प्रकारचा किंतू मनात न ठेवता त्यांना शरण जाणे व त्यांच्याकडून इच्छित ध्येय साध्य करणे अशक्य नाही. श्री गजानन महाराज हे वेशधारी साधू नाहीत. त्यांच्या ठाई कसलाही भेद नाही. फक्त आपली त्यांच्यावरील श्रद्धा किती व कशी आहे, एवढेच ते पाहतात व त्याप्रमाणे आपल्यावर कृपा करतात. त्याकाळच्या सर्वांनी म्हणजे विशेष करून इतर संतांनी त्यांचा सर्वश्रेष्ठ अधिकार मान्य केला होता. महाराजांची काया ब्रह्मरूप होती. ते चालते बोलते ब्रह्म होते. त्यांच्या प्रत्येक कृतीत व शब्दात फार मोठे संदर्भ लपलेल्या दिसतात.
जानराव देशमुख महाराजांच्या चरणतीर्थाने बरे झाले याचा गलबला सर्व गावभर झाला. त्या कारणांनी महाराजांनाही पेच पडला. त्यांना प्रसिद्धी नको होती. उगीचच भक्तांची गर्दी वाढवणे त्यांना मान्य नव्हते म्हणूनच या प्रसंगापासून ते थोडेसे उग्र बनले. उपाधी मागे लागू नये म्हणून त्यांनी वरपांगी कडकपणा धरला. महाराजांकडे दूरदृष्टी होती. ते शिस्तप्रिय होते.
आज आपण सर्वत्र उपाधीचा टिळा लावून फिरणारे संत पाहतो व त्यांच्या भोवती असलेल्या प्रापंचिकाचा गराडाही पाहतो. या गराड्यात कोणीही काहीही मागितल्याशिवाय राहत नाहीत. हे सर्व भक्तगण भौतिकाच्या जाळ्यात अडकलेले जीव असतात. सत्याचा शोध असलेला भक्त देवाधिकांकडे व संतांकडे काही मागताना सापडणे दुर्लभ आहे. कोणालाही खऱ्या सुखाची गरज वाटत नाही किंवा खरे सुख कोणते व ते कशात आहे याची पुसटशीही कल्पना त्यांच्या बुद्धीत उपजत नाही. संतांनाही अशा भक्तांची संख्या वाढविण्याची इच्छा नसते. जे खऱ्या अर्थाने भक्त आहेत त्यांच्यावरच संतांची कृपा होत असते. मन ईश्वरचरणी रंगले पाहिजे.
श्री जानराव देशमुख आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्रकोष' हा ग्रंथ पहावा.