शेगांव (वि. प्र.) - चंदू मुकुंद यांचे घर बंकटलाल अग्रवाल यांच्या घराच्या शेजारी होते. कामातून सवड मिळताच ते महाराजांजवळ येऊन बसत. त्यांची महाराजांवर अतिशय श्रद्धा होती. त्यांची परिस्थिती जेमतेमच होती. पती-पत्नी दोघेही वयस्कर, सात्विक विचाराचे तसेच संतांविषयी आदर बाळगणारे होते. त्या उभयतांना महाराजांचा बराच सहवास लाभला.
१८७९ च्या मे महिन्यातील प्रसंग -
महाराजांच्या सभोवताली बसलेले भक्तगण अतीव आदराने हात जोडून महाराजांच्या चरणांवर आपली दृष्टी ठेवून आपल्या हृदयातील भाव प्रगट करीत होते. कोणी थंडगार असे चंदन महाराजांच्या अंगाला लावत होते. कोणी त्यांना पंख्याने वारा घालित होते. जो तो आपापले भक्ती, पूजा आणि सेवा महाराजांना अर्पण करीत होता. अवर्णनीय असा भावभक्तीचा सोहळा होता. या सर्व मंडळींत चंदू मुकुंद हा भक्त सुद्धा हजर होता. त्याने आणलेले आंबे तो महाराजांना देऊ लागला. तेव्हा महाराज त्याला म्हणाले, हे आंबे मला नकोत, तुझ्या उतरंडीचे दोन कान्हवले आणून दे. संपूर्णपणे विस्मरणात गेलेले कान्हवले त्यांच्या पत्नीला महाराजांनी सांगितलेल्या ठिकाणी घरातच मिळाले आणि ते चंदू मुकुंद यांनी महाराजांना अर्पण केले. हे पाहून तेथे जमलेल्या लोकांनासुद्धा महाराजांच्या अंतर्ज्ञानाचे आश्चर्य वाटले.
महाराज भूत, भविष्य आणि वर्तमान जाणणारे त्रिकालज्ञ संत होते. अंतर्ज्ञानाने त्यांना सर्व काही कळते, याची कल्पना लोकांना आली. महाराजांनी या प्रसंगांमध्ये एक वेगळी लीला केली. येथे त्यांनी आपले खरे स्वरूप प्रगट केले आहे हे सूक्ष्मबुद्धीला जाणवते व ते म्हणजे "गुरु" या शब्दात लपलेले रहस्य. ते स्पष्टपणे सांगतात की,
"जा वेळ करू नको | उगीच सबबी सांगू नको || गुरुपाशी बोलू नको | खोटे वेड्या यत्किंचित ||"
महाराजांच्या या शब्दातून त्यांचे गुरुत्व सिद्ध होते. पण हे गुरुतत्त्व नुसतेच कान फुंकणारे नाही. तर येथे त्यांच्या अधिकार-श्रेष्ठत्वाची महती पटते. ते खरोखरीच सर्व भक्तांचे 'गुरुस्थान' आहे. चंदू मुकुंद हा महाराजांचा निस्सीम भक्त. परंतु त्याच्या भक्तीभावामध्ये कसलाही गाजावाजा नाही. अंत:करणात दृढभाव आणि तोही गुरुभाव व गुरुभक्ती. महाराजांना गुरुस्थानी मानणारा असा हा भक्त. महाराज सर्व काही जाणणारे. चंदूने आपल्या अंगी शिष्यत्व बाणले आहे, हे त्यांनी जाणले होते. या त्याच्या शुद्ध भावाला तोलून मापूनच महाराजांच्या "स्व" वाणीतून "गुरु" हा शब्द प्रगटला. त्यांच्या शब्दातील ही जादू रहस्यपूर्ण आहे. ते स्वतःहून गुरुत्व स्वीकारत नाहीत. तर ते भक्तावरच सोपवतात. ज्याचा जसा भाव असेल, श्रद्धा असेल किंवा विश्वास असेल त्याप्रमाणे ते आपले रूप प्रगट करतात आणि तशी कृपा त्या व्यक्तीवरही करतात.
चंदू हा इतर भक्तांच्या तुलनेत सर्वसाधारण परिस्थिती असलेला, परंतु त्याने आपल्या भावभक्तीतून महाराजांचे गुरुत्व प्रगट केले. तसेच स्वतःचे शिष्यत्वही लपवले नाही. अगदी मनाच्या कप्प्याकप्प्यातून अढळविश्वासाने जे महाराजांना गुरु मानतात, त्यांच्यासाठी आजही महाराज त्यांचे गुरुच आहेत.
बुद्धिवादी व्यक्ती म्हणू शकते की गजानन महाराज तर समाधिस्त झालेत. ते कसे गुरु होऊ शकतात?
पण गुरु हे तत्व आहे, तो देह नाही. दुसरे असे की महाराज आजही आहेत. ही संजीवन समाधी आहे. आजही त्यांचा देह जसाच्या तसाच समाधीस्थ आहे. संजीवन समाधीत असलेल्या देहाला कशाचीही बाधा होत नाही. आपली भक्ती आपण फक्त बुद्धीच्या चौकटीतून हृदयाच्या कप्प्यात मुक्तपणे उतरू द्यावी म्हणजे झाले. मग कृपेचा तोटा राहणार नाही.
ध्यान मूलम् गुरोर्मुर्ती पूजा मुलं गुरोपदम् | मंत्र मूलं गुरोर्वाक्यम् मोक्षमूलम् गुरो:कृपा ||
असा चंदू मुकुंद चा दृढभाव होता. अन्यथा महाराजांनी आपले गुरुपद प्रगट केलेच नसते. त्यालाही थोर भाग्य असावे लागते. अनंत जन्माच्या पुण्याईनेच हे फळ आहे असे म्हणावे लागते. चंदूने अर्पण केलेल्या दोन कान्हवल्यातून महाराजांनी त्याला अर्धा कान्हवला प्रसाद म्हणून दिला, अशी होती महाराजांची कृपा.
चंदू मुकुंद आणि इतर श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित "श्री गजानन महाराज चरित्र कोश" हा ग्रंथ पहावा.