शेगांव (वि.प्र.) - माधव मार्तंड जोशी नावाचे रेवेन्यू ऑफिसर सरकारी नोकरीवर होते. त्यांचा महाराजांवर पूर्ण भरवसा होता. ते महाराजांच्या निष्ठावंत भक्तांपैकी एक होते. कळंब कसुरा या गावातील जमिनीची मोजणी करण्यासाठी जोशी आले होते. दिवसभर जमिनीची मोजणी केली. अस्तमानाच्या समयी त्यांना शेगावला महाराजांच्या दर्शनासाठी जाण्याची इच्छा झाली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे शिपायाने दमणी जुंपून आणली. जोशी दमणीत बसले आणि शेगावच्या रस्त्याचा प्रवास सुरू झाला. पुढे मन नदीपाशी येताच अकस्मात वादळ आले. नदीच्या पैलतटावर जाण्यासही अवसर राहिला नाही. मुसळधार पाऊस कोसळू लागला. नदीला भयंकर पूर आला. अशावेळी महाराजांच्या दर्शनाला आपण चाललो आहोत आणि त्यांच्याशिवाय आपल्याला वाचवणारा दुसरा कोणीही नाही, हा दृढ विश्वास जोशी साहेबांना होता. भक्ती आणि श्रद्धेतून वाढलेला हा विश्वास अधिकच जागरूक झाला. जोशीसाहेब महाराजांचे स्तवन करू लागले, "समर्था, तुझी सत्ता अगाध आहे तुला जे वाटेल ते कर, तार किंवा मार." असे बोलून त्यांनी शिपायाला बैलाचे दोर सोडून देण्यास सांगितले. दोघांनीही डोळे मिटून घेतले आणि सर्व कार्यभार महाराजांवर सोपवला.
यालाच म्हणतात निष्ठेचे बळ. विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे प्रयत्न पांगळे होतात. मात्र निष्ठेला मर्यादा नसतात. जोशी यांची निष्ठा बळकट आणि न भंगणारी होती. म्हणूनच क्षणात आश्चर्यकारक घटना घडली.
" अशा महापुरातूनी | पैलतटा पावली दमणी | उभी राहिली येऊनि | सडके वरी शेगावच्या ||" (गजानन विजय)
तो प्रकार पाहून जोशीसाहेब आणि शिपाई कुतुबुद्दीन आनंदून गेले. समर्थांच्या अगाध सत्तेची प्रचिती आली. पुरामध्येही आपल्या भक्तांना बुडू न देता महाराजांनी त्यांचे रक्षण केले. जोशी शेगावला आले. महाराजांचा समाधीचे भावभक्तीने दर्शन घेतले. दुसरे दिवशी बराच दानधर्म केला.
भक्ताचा भगवंतावर विश्वास हवा. भगवंतालाही अशा भक्ताचा शोध असतो. भक्ती असली की भरवसा आलाच. खऱ्या भक्तीमध्ये भगवंतावर जीव ओवाळून टाकावा लागतो. समर्पण करावे लागते. येथे बुद्धी सोबतच मनाचा निर्धार आवश्यक आहे. भक्ती निरपेक्ष आणि शुद्ध समर्पणाच्या भावनेतून आकाराला आली पाहिजे. येथे अपेक्षा चालत नाही.
आपण मन, बुद्धी आणि चित्त यांनी गजानन महाराजांच्या जेवढे जवळ जाऊ तेवढा त्यांच्या कृपेचा आणि शक्तीचा आपल्याला प्रत्यय येतो.
माधव मार्तंड जोशी आणि श्री गजानन महाराजांच्या इतर भक्तमंडळींची अधिक माहिती जाणण्याकरता श्री दासभार्गवजी लिखित 'श्री गजानन महाराज चरित्र कोश' हा ग्रंथ पाहावा.